भारताची एकात्मता आणि स्वाभिमान खंडित करण्यासाठी परकियांनी अनेक खोटे सिद्धांत मांडले. भेद निर्माण करण्यासाठी वेगवेगळ्या पातळीवर थेरिज पसरवल्या! काही भारतीयांनीही त्यांना उचलून धरले. असाच एक सिद्धांत म्हणजे आर्य आक्रमणाचा सिद्धांत!
संघटित करणाऱ्या, गौरान्वित करणाऱ्या ज्या अस्मिता आहेत, त्यावरच आघात करून वर्गसंघर्ष निर्माण करायचा! समाजाचे विघटन करून सत्ता बळकट करायची ही नीती इंग्रज आणि त्यानंतर डाव्या विचारधारा मानणाऱ्या लोकांनी भारतात जोरदारपणे राबवली. त्याचाच परिणाम म्हणून उत्तर भारत विरुद्ध दक्षिण भारत, हिंदीविरोध अशा काही गोष्टी काहीकाळ या देशात घडल्या. राष्ट्रीयत्व दुबळे करून प्रादेशिक अस्मिता उभ्या करताना ज्या सिद्धांतांचा उपयोग केला त्यात आर्य विरुध्द अनार्य हा एक होता. पण हा सिद्धांतच मुळात चुकीचा आहे, असा निर्वाळा अनेक विद्वान देतात. त्यापैकी एक फ्रेंच विद्वान मिशेल डॅनिनो!
दुसऱ्या प्रकरणात लेखक काही विद्वानांची मतं देतात. पहिल्या प्रकरणात या सिद्धांताचा उगम कसा झाला याची माहिती दिलेली आहे. त्यात वेगवेगळे विद्वान आणि त्यांचे युक्तिवाद आहेत.
माउंट स्टुअर्ट एल्फिन्स्टन- ‘एका मध्यवर्ती केंद्र स्थानापासून आर्यांचा प्रसार झाला.’ हा सिद्धांत म्हणजे मनमानी व समर्थन करताना येण्याजोगे गृहीतक असल्याचे ते म्हणतात. याच प्रकरणात आर्य सिद्धांत मांडणारे मॅक्स मुलर स्वतःचाच सिद्धांत कसा चुकला याचे विवेचन करताना सांगितले आहे. ते म्हणतात, “जेव्हा मी आर्य म्हणतो त्यावेळी मला ना रक्त ना अस्थी ना केसांचा रंग ना कवटीचा आकार अभिप्रेत असतो, तर केवळ जे आर्य भाषा बोलतात ते आर्य, असे मला म्हणायचे असते, हे मी वारंवार स्पष्ट केलं आहे.” १८८८ अर्थात पहिला सिद्धांत मांडला आणि त्याचे खंडन ४० वर्षांनी त्यांनी केलं.

मॅक्स मुलर यांनी भारतीय ग्रंथाच्या कलाविषयी आपल्या प्रसिद्ध अशा घोषणापत्रात सन १८९०मध्ये लिहिले, “जगातील कोणतीही शक्ती हे कधीच निश्चित नाही करू शकणार की वेदांची निर्मिती इस. १००० वर्षांपूर्वी झाली, की १५००, की २०००, की ३००० वर्षांपूर्वी झाली.” स्वतःच्या आत्मचरित्रात त्यांनी या पुढं जाऊन लिहिलं आहे, “वेदांच्या निर्मितीच्या वास्तविक कालासंबंधी म्हणायचे तर… जर आपण तो इसापूर्व ५००० वर्षे निश्चित केला तर मला नाही वाटत त्याचे खंडन करेल.” याच प्रकरणात स्वामी विवेकानंद, स्वामी दयानंद सरस्वती, योगी अरविंद यांचेही मत आणि तर्क दिलेले आहेत.
स्वामी विवेकानंद यांनी आर्य आक्रमण सिद्धांत अनेक वेळा खोडून काढला आहे. यासंदर्भातील त्यांची मतं येथे दिलेली आहेत. देशबांधवांना सावध करताना ते म्हणतात, “जेवढे तुम्ही द्रविडी आणि आर्य तसच, ब्राह्मण आणि ब्रह्मणेतर प्रश्न, या आणि अशा साऱ्या क्षुद्र ,निरर्थक गोष्टीवरून भांडत तंडत बसाल, तेवढे तुम्ही भारताच्या भवितव्यासाठी आवश्यक असणारी शक्ती आणि सामर्थ्याचा संचय करण्यापासून वंचित राहल.”
वरील विवेचन केवळ एका प्रकरणातील आहे. हे लहानसे पण फार महत्त्वपूर्ण माहिती असलेलं पुस्तक आहे. पुढील प्रकरणात पुरातत्वीय पुरावे दिलेले आहेत. विविध ठिकाणचे उत्खनन आणि त्यात सापडलेल्या पुरातन वस्तू, त्यांचे फोटो आणि त्यांचे वर्णन यात वाचायला, पाहायला मिळते. पुस्तकात या प्रकारच्या पुराव्यांचा मोठा भरणा आहे. या पुस्तकाची भाषा अतिशय सोपी आणि सुटसुटीत आहे. विवेकानंद केंद्रद्वारा संचालित शाळांमध्ये हे अभ्यासक्रमात समाविष्ट केलं गेलेलं पुस्तक आहे. स्वतः वाचावे. इतरांना वाचण्यासाठी प्रेरित करावे. हे पुस्तक आपण भेटदेखील देऊ शकतो.
पुस्तकः आर्यांचे आक्रमण – अगा जे घडलेचि नाही!
मराठी अनुवाद: सुहासिनी देशपांडे
प्रकाशन: विवेकानंद केंद्र कन्याकुमारी, मराठी प्रकाशन विभाग
मूल्य: १५०/- टपाल: ४५/- एकूण: १९५/- पृष्ठे: १५६

खरेदीसाठी संपर्कः ग्रंथ संवाद वितरण (8383888148)