फार वर्षांपूर्वीची ही कहाणी आहे. अंबरनाथ त्यावेळी आजच्या इतकं सुधारलेलं/पुढारलेलं नव्हतं. १९७२ साली दी एज्युकेशन सोसायटीच्या महात्मा गांधी विद्यालयातून अकरावी उत्तीर्ण होऊन रमेश मुंबईत सर जे जे स्कूल ऑफ आर्टमध्ये चित्रकलेचं उच्च शिक्षण घेण्यासाठी दाखल झाला. यातून त्याने सुवर्णपदकं पटकावीत पदविका प्राप्त केली. रोज अंबरनाथ येथून खांद्यावर झोळी लटकावून टिपिकल चित्रकार असलेला, पायपीट करीत स्टेशनला जाणे, तिथून लोकल पकडून दादरला आपल्या स्टुडिओत जाऊन कलेची पूजा करीत नवनवीन चित्रांची निर्मिती करणे हा रमेशचा परिपाक. त्याच्या राहत्या घरासमोर शेख नावाचं एक कुटूंब रहात होतं. त्या कुटुंबातील नसीम नामक नवयौवना रमेशच्या पाठोपाठ चालत स्टेशनला जात असे. कधी रमेश पुढे, नसीम मागे तर कधी नसीम पुढे, रमेश मागे. पण एकमेकांशी बोलचाल नव्हती. त्यामुळे लवजिहादसारखा विषयच नव्हता.
काही दिवसांतच रमेशची बहीण आणि नसीम एकमेकींच्या दोस्त बनल्या. ओळख झाली. नसीमने रमेश काय करतो, अशी विचारणा केली. “अरे, वह तो चित्रकार हैं, बहुत अच्छी अच्छी तसवीरे निकालता हैं.”, असं रमेशच्या बहिणीनं नसीमला सांगितलं. मग नसीमनं त्या बहिणीला सांगितलं, “अपने भैय्या को कहो नं की मुझे कमल का चित्र निकालकर दे.” बहिणीनं रमेशला गळ घातली. थोडासा ताठा दाखवून रमेश मग कमळ काढून द्यायला तयार झाला. अत्यंत सुंदर असं कमळ रमेशनं रेखाटलं. नसीमच्या हाती ते ‘कमळ’ पोहोचलं. तिनं त्या कमळाला चुंबन घेत आपल्या ह्रुदयाशी कवटाळलं. इथंच रमेश नसीमच्या कमलांकित प्रेमाला अंकुर फुटले. रमेशचा नसीमसाठी रमा झाला होता आणि नसीमची रमेशसाठी निशू झाली होती. दिवसामागून दिवस जाऊ लागले. रमा निशूच्या प्रेमकहाणीच्या चर्चा सुरू झाल्या. नसीम शेख मुस्लिम आणि रमेश लक्ष्मणराव कुर्जेकर हिंदू. प्रेमकहाणीचं गणित कसं सोडवणार? दोघांच्या घरुन विरोध. नसीमचे अब्बाजान खुदाच्या दरबारी कधीच पोहोचले होते. माँ आणि भावा-बहिणीबरोबर नसीम राहत होती. लक्ष्मणरावांनी रमेशला दम दिला की, जर ती मुस्लिम मुलगी सून म्हणून घरात आणलीस तर तू आमच्यासाठी मेलास म्हणून समज. पण रमा आणि निशू यांचं प्रेम पाक (पवित्र), खरंखुरं होतं. दोघांचे एकमेकांवर निस्सीम प्रेम होते. धर्म आड येत होता.
इकडे रमेशच्या घरी त्याच्या भावांनीही असहकार पुकारला होता. एक भाऊ बायकोबरोबर वेगळा राहत होता. दुसरा भाऊपण बायकोसमवेत वेगळा राहून मद्यधुंद अवस्थेत गोंधळ घालीत होता. रमेशच्या माऊलीची बिचारीची अवस्था अडकित्त्यातील सुपारीसारखी झाली होती. नसीम हटायला तयार नव्हती. “एक बार कुराणशरीफ से अल्लाह का नाम अलग निकाला जायेगा, मगर मेरे दिलसे तुमको कोई भी अलग नहीं कर सकता।” अशी पत्थरकी लकीर तिने आपल्या आयुष्यासाठी खेचून ठेवली होती. ठरलं! रवी, जयसिंग, दीपक, सुनील, सुहास, नाना या सवंगड्यांच्या मदतीनं धाकदपटशा, धमक्या, तंग वातावरणात २३ जून १९८० रोजी रमा आणि निशू एका मंदिरात देवाब्राह्यणांच्या साक्षीनं अग्नीदेवतेला सात फेरे घेऊन विवाहबद्ध झाले. तत्पूर्वी नसीमनं हिंदू धर्मात विधीवत प्रवेश केला. इकडे हिंदूसेनेने अंबरनाथ स्टेशनजवळ या विवाहाची खबर असलेला फलक लावला आणि गावात गहजब झाला. ब्राह्मणाच्या सांगण्याप्रमाणं रमेशनं नसीमचं पूजा असं नामाभिधान केलं. रमा हा निशूच्या प्रेमाचा पुजारीच होता. छोटीशी पर्णकुटी बांधून रमा-निशू राहू लागले.

नसीमच्या घरच्यांनी एव्हाना नसीम आणि रमेशला भरपूर ‘प्रसाद’ दिला होता. नसीमला घरात कोंडून ठेवलं. तिनं अन्नपाणी सोडलं, असे भरपूर प्रसंग दोघांच्या प्रेमकहाणीमध्ये घडले. अखेर प्रेमाने सर्वांवर मात केली. रमाच्या आई-बाबांनी रमेशला पूजेसह स्वीकारलं. जो ‘नफरत’चा छोकरा होता तोच दोघांचा तारणहार बनला होता. रमा-निशूच्या वेलीवर प्रतीक आणि प्रतीक्षा ही सुंदर फुले बहरली. अनेक टक्केटोणपे खात अंबरनाथ, उल्हासनगर, पुणे अशा प्रवासाअंती रमा आणि निशू, प्रतिक- प्रतीक्षासह पुण्याला स्थायिक झाले. संसार हा सुखाचा खराखुरा चित्रपट पुढे सरकत होता. पण म्हणतात ना नियतीच्या मनात काय आहे, कुणी सांगू शकत नाही. सुखी संसारात रममाण असलेली, आपल्या चिल्ल्यापिल्ल्यांना रमासह सर्वोत्तम प्रकारे सांभाळणारी पूजा जारणमारण, करणी-कवटक या चक्रव्यूहात अडकवली गेली आणि रमेशची पूजा ईश्वराच्या दरबारात विलीन झाली. शिर्डीचे साईबाबा आणि शेगांवचे संतश्रेष्ठ श्री गजानन महाराज यांची निस्सीम भक्त असलेल्या पूजाने ‘गजानन विजय’चा एक अध्याय वाचल्याशिवाय कधी घर सोडलं नाही. तशीच निशूनं यथासांग पूजा करुन लाडक्या रमाला सुहास्यवदनानं निरोप दिला.
रमाला काय माहित की, हा आपल्या लाडक्या निशूचा अखेरचा ‘कुर्निसात’ आहे. आदिवासी ताईनं मग पूजाचे निर्माल्य करण्याचे कारस्थान त्याच्या भावजयीचेच असल्याचं ठामपणे सांगितलं. पण काय करणार? ज्या अग्नीच्या साक्षीने रमानं निशूबरोबर सात फेरे घेतले होते त्याच अग्नीला पूजाचे पार्थिव अश्रूंच्या न थांबणाऱ्या धबधब्यात सुपूर्द केले. आता मी कुणासाठी जगू? माझी निशूतर माझ्याबरोबर राहण्याच्या आणाभाका घेऊनही एकटीच पैलतीरावर निघून गेली. पण तिच्या प्रेमाच्या प्रतिक आणि प्रतीक्षासाठी जगणं क्रमप्राप्त होतं. या दोन्ही मुलांना ‘मम्मी’ची ममता आणि ‘पप्पा’चं प्रेम देत मार्गक्रमण सुरु केलं. ही १९७९ ते २००२पर्यंतची संपूर्ण प्रेमकहाणी रमेश कुर्जेकर या हरहुन्नरी चित्रकाराने ‘समर्पिता’ या कादंबरीत रेखाटली असून प्रतिक आणि प्रतीक्षा या दोघांनीही आपापली मनोगतं यात नोंदविली आहेत. हाडाचा चित्रकार असलेल्या रमेश कुर्जेकर यांनी मुखपृष्ठ तसेच आतील रेखाचित्रे आपल्या कुशल कुंचल्यानं रेखाटली आहेत, जी भुरळ पाडल्याशिवाय राहात नाहीत. आळंदीच्या इंद्रायणीच्या डोहामध्ये पूजाच्या अस्थी अश्रूंच्या साक्षीनं अर्पण करण्याच्या प्रसंगाने सुरु झालेली प्रेमकहाणी फ्लॅशबॅकमध्ये वाचतानाही कादंबरी हातातून खाली ठेववत नाही.
निशूच्या प्रेमाच्या ओतप्रोत भरलेल्या कथनाने आपल्याही हृदयाचा ठोका चुकल्याशिवाय रहात नाही. निशूच्या इहलोकीची यात्रा संपल्यानंतर रमानं झोपेच्या गोळ्यांची सुमारे सहा पाकिटं आणि विषाची २०० मिलीची अख्खी बाटली रिचवून जलदगतीनं निशूच्या भेटीसाठी इहलोकीची यात्रा संपविण्याचा विडा उचलला. पण हाय रे दैवा.. तिथंही तो जिवंतच राहिला तो निव्वळ पूजाच्या प्रेमाची प्रतिकं, प्रतिक आणि प्रतीक्षाला सांभाळण्यासाठी. हा प्रसंग रमेशनं अशा पद्धतीने चितारलाय की, अंगावर काटा उभा राहतो. प्रतीक्षाची सासरी पाठवणी आणि मनाची अस्वस्थता, घालमेल ही संपूर्ण प्रेमकथा एखाद्या अस्सल साहित्यिकाने निर्माण केलेल्या साहित्याच्या तोडीसतोड आहे. आपला धर्म, समाज, आपला परिवार सगळं सोडून रमाच्या प्रेमासाठी समर्पित झालेली ही समर्पिताच म्हणावी लागेल. रमेश कुर्जेकर यांनी अत्यंत समर्पक नाव देत या निशूला अजरामर केली आहे. एकीकडे ‘लवजिहाद’चा मुद्दा तापl असताना रमा-निशूची कहाणी समाजाच्या डोळ्यात अंजन घालणारी आहे.
समर्पिता:
लेखक: रमेश लक्ष्मणराव कुर्जेकर, पुणे.
पृष्ठे: १०७+८३. मूल्य: ₹२९९/-
(लेखक योगेश वसंत त्रिवेदी ज्येष्ठ पत्रकार आहेत. संपर्क- ९८९२९३५३२१)

