Homeब्लॅक अँड व्हाईट९२ वर्षांचे झाले...

९२ वर्षांचे झाले कुलाब्याचे रिगल!

अलिकडे वारंवार रिगल चित्रपटगृहात जायची संधी मिळतेय. पटकथा संवाद लेखक सलीम जावेद यांच्यावरील माहितीपटाच्या निमित्ताने रिगलला रमेश सिप्पी दिग्दर्शित “शोले” (१९७५)च्या खास खेळाचा अनुभव एकदम भन्नाट. रिगलवर लवकरच पोहोचलो तेव्हा बाहेरची लांबलचक रांग पाहून जुने दिवस आठवले. मी माझ्या कलेक्शनमधील त्या काळातील मिनर्व्हा चित्रपटगृहाचे साडेपाच रुपयेवाले बाल्कनीचे तिकीट दाखवले. या विशेष खेळास सलिम जावेद उपस्थित होते आणि चित्रपट रसिकांनी पडद्यावर दृश्य सुरु ह़ोण्यापूर्वीच डायलॉगबाजी करीत एकच कल्ला केला. रिगल चित्रपटगृहानेही हा अनुभव घेतला…

फिल्म हेरिटेजच्या वतीने रिगल चित्रपटगृहात असे काही जुन्या चित्रपटाचे खेळ आयोजित करण्यात येत आहेत आणि त्यासाठी पुन्हा पुन्हा रिगलला जाण्याचा योग येत आहे. गुलशन रॉय निर्मित व यश चोप्रा दिग्दर्शित “दीवार” (१९७५) या चित्रपटाला पन्नास वर्षे पूर्ण झाली. दिग्दर्शक राज खोसला यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त त्यांच्या चित्रपटाचा महोत्सव, अशा गोष्टींसाठी पुन्हा पुन्हा रिगल चित्रपटगृहावर गेलो तेव्हा लांबलचक रांग पाहून सुखावलो. आल्फ्रेड हिचकॉक यांचे रहस्यमय चित्रपटही येथे उत्तम प्रतिसाद मिळवण्यात यशस्वी ठरले. लोकप्रिय चित्रपट कायमच लोकप्रिय असतात आणि सतत पुढील पिढीलाही आकर्षित करतात. चित्रपटसृष्टीच्या इतिहासात चित्रपट चित्रिकरणाचे अनेक लहानमोठे, जुने नवीन स्टुडिओ, गीत, संगीत ध्वनिमुद्रण स्टुडिओ, मिनी थिएटर, चित्रपट प्रदर्शनाचा चित्रपटगृह अशा सगळ्यांचाच महत्त्वाचा वाटा आहे. चित्रपट बनण्यासाठीची, तो रसिकांपर्यंत पोहोचवण्यासाठीची खूपच मोठी परंपरा आहे आणि त्याच चौफेर वाटचालीतील एक उल्लेखनीय चित्रपटगृह रिगल.

दक्षिण मुंबईतील कुलाबा येथील रिगल चित्रपटगृह ब्याण्णव वर्षांचे झाले आहे. एक अतिशय मोठा व वैशिष्ट्यपूर्ण यशस्वी प्रवास. मी गिरगावात लहानाचा मोठा झाल्याने रिगल चित्रपटगृह मला सुपरिचित आणि या वास्तूबाबत एक चित्रपट रसिक म्हणून माझ्या अनेक वैयक्तिक आठवणी. १४ ऑक्टोबर १९३३ रोजी ते सुरु झाले. हे आपल्या देशातील पहिले वातानुकूलित चित्रपटगृह. इंग्रजकालीन असे हे चित्रपटगृह आजही तेवढेच आकर्षकपणे वाटचाल करत आहे. मुंबईतील तर झालेच पण देशातील विविध भागातील पालक आपल्या पाल्याला मुंबईतील  ‘भारताचे प्रवेशद्वार’ अर्थात गेट वे ऑफ इंडिया पाहण्यास आणणारच. मुंबई दर्शनची पिकनिकही येथे येतेच. इंग्रजकालीन महत्त्वाचे ऐतिहासिक स्थळ. आवर्जून पाहावे असेच. मी गिरगावातील मध्यमवर्गीय कुटुंबात लहानाचा मोठा होताना आम्हा भावंडानाही आमचे आईबाबा येथे एखाद्या संध्याकाळी फिरायला आणत. तेव्हा म्युझियमला (नंतरचे नाव श्यामाप्रसाद मुखर्जी चौक) ६५ अथवा ६९ क्रमांकाच्या बेस्ट बसने उतरल्यावर समोरच्या इंग्रजी चित्रपटाच्या पोस्टरकडे हमखास लक्ष जाई आणि मग समजले, हे “पिक्चरचे थिएटर” आहे. नाव रिगल.

कधीही गेट वे ऑफ इंडियाला फिरायला जावे तर रिगलला इंग्रजी पिक्चर लागलेला दिसे. थिएटरभोवतीचे वातावरण हायफाय. जवळपास सगळेच चित्रपट रसिक कडक इस्त्रीचे कपडे  परिधान केलेले. रिगल म्हणजे, परीक्षेत पहिला नंबर काढणाऱ्या वर्गातील मुलासारखे टिपटाॅप. मला मात्र शाळेत अभ्यासात इंग्लिशमध्ये छत्तीस, चाळीस गुण मिळाले तरी भारी वाटे. तेवढ्या बळावर रिगलचा हायफाय इंग्रजी चित्रपट पाहयला न्या अशी पालकांना सांगण्याची हिंमत नव्हतीच. चित्रपट म्हणजे चित्रित झालेली गोष्ट पाहणे एवढीच समज. आपण अभ्यासाव्यतिरिक्त काय वाचतोय, काय गातोय, काय ऐकतोय, कुठे जातोय, शाळेतील मित्र कोण आहेत हे सगळे पालकांना सांगण्याचे ते संस्कारक्षम दिवस होते. तो समाजच वेगळा होता. ते आता जुन्या पुस्तकात व तेव्हाच्या ब्लॅक अँड व्हाईट अर्थात कृष्णधवल कौटुंबिक मराठी व हिंदी चित्रपटात राहिलाय. काॅलेजला गेल्यावर ती बंधने कमी होत जात. पण स्वैरपणा नव्हता. जबाबदारीची जाणीव असे. संस्कृती, संस्कार, परंपरा, मूल्ये‌ यांची जाणीव असे.‌

शाळेत असतानाच कमाल अमरोही दिग्दर्शित ‘पाकिजा’ (अशोककुमार, मीनाकुमारी व राजकुमार) मेन थिएटर मराठा मंदिरसह रिगल, सुरेश प्राॅडक्सन्सचा ‘प्रेम नगर’ (राजेश खन्ना व हेमा मालिनी) मेन थिएटर ड्रीमलॅन्डसह रिगल, बासू भट्टाचार्य दिग्दर्शित ‘आविष्कार’ (राजेश खन्ना व शर्मिला टागोर) मेन थिएटर नाॅव्हेल्टीसह रिगलमध्ये रिलीज झाला आणि थिएटर ओळखीचे होईलसे वाटले. काॅलेजमध्ये असताना बी. आर. चोप्रा दिग्दर्शित बहुचर्चित ‘इन्साफ का तराजू’ (१९८०) पाहयला जायची पहिली संधी मिळाली. रिगलला जातोय म्हणून चपलांऐवजी बूट घालून जायला हवे याकडे लक्ष दिले. गोष्ट छोटी वाटते पण मोठी आहे. त्यामुळे सिनेमात काहीही फरक पडणार नव्हता. पण त्या काळात फक्त चित्रपट पाहणे होत नसे. अवतीभवतीचे अन्य फॅक्टरही असत. राज बब्बर खलप्रवृत्तीने झीनत अमान आणि मग पद्मिनी कोल्हापूरे यांच्यावर रोजच्याच शोप्रमाणेच रुपेरी अन्याय करणार होता आणि मग चोप्रांच्या दिग्दर्शनीय शैलीतील उलटसुलट दावे-प्रतिदावे, डायलॉग असलेला कोर्टरुम ड्रामा असणारच होता. ती त्यांची खासियत. पिक्चर फारच गाजत होता. कुठे कुठे काय काय छापून येई आणि पिक्चर न्यूजमध्ये राही.  इंग्रजी पिक्चरचे थिएटर म्हणजे तिकीट भारीच असणार हे गृहीत धरूनच खिशात आठ आणे जास्त ठेवले. बसचे तिकीट दहा पैसे होते. त्या काळात सुपर हिट पिक्चरचे पंधरा आठवडे झाल्यावर करंट बुकिंगला त्याची तिकीटे मिळत. या अशा सगळ्याचे भान ठेवून पूर्वी पिक्चर्स पाहिले गेले. त्यातूनच आपल्या देशात चित्रपट रुजला, जगला, वाढला. त्याची गोड गोड फळे आजच्या चित्रपटसृष्टीला मिळताहेत. म्हणून चित्रपटसृष्टीचा फ्लॅशबॅक महत्त्वाचा.

रिगलचा उच्चभ्रू रसिक वर्ग एखाद्या डायलॉगला टाळ्या मारत असेल ना? माझ्यासारख्या मनमोहन देसाईंचे मसालेदार मनोरंजक चित्रपट एन्जाॅय करुन वाढलेल्याने टाळ्या मारल्या तर चालतील ना? की हंसे होईल? मध्यंतरमध्ये थिएटरबाहेर येऊन दहा पैशाचा वडापाव घेता येईल ना? की आतमध्ये महागडे वेफर्स फक्त पाहून गप्प राहयचे? त्या काळात अनेक सिंगल स्क्रीन थिएटर्स अतिपरिचित झाली असतानाच अशा अपरिचित थिएटरमध्ये जाताना अनेक प्रश्न मनात येणारच. प्रेक्षक असाच घडत असतो. त्याला कसलेही लेक्चर द्यावे लागत नाही. चित्रपट कसा पाहावा हे सांगावे लागत नाही. त्याला चित्रपटगृहापर्यंत जाणे माहीत असावे लागते. रिगलवर पोहोचलो तेव्हा तिकीट खिडकीवर इंग्लिश बोलून तिकीट घ्यायचे काय हा प्रश्न बोटाने एक असे म्हटल्यावर सुटला. बुकिंग क्लर्क अतिशय सुटाबुटात होताच पण डोअर्स किपरही सुटाबुटात. आवडलं. भारी वाटले. इम्प्रेस झालो. मला वातावरण नवखे. अतिशय टापटीप असे थिएटर. मुख्य पडद्यावर एक छानसे महागडे आणि स्टाईलीश देखणे कव्हर. त्यामुळेच ते कधी वर जातेय याची उत्सुकता. सिनेमापर्यंत पोहोचण्यातील हे छोटेछोटे रंजक घटक. आजूबाजूला भिंतीवर छान डेकोरेशन. एकूणच रुबाबदार रुपडे. पदोपदी ‘हे इंग्रजी पिक्चरचे थिएटर आहे’ याची जाणीव वाढत होती. अशा पाॅश थिएटरची बाल्कनीही अशीच साॅलीड असणार हे नक्कीच. अखेर पडदा वर गेला आणि स्लाईड सुरु झाल्या त्या इंग्रजीत… असो. काही जाहिरातपट आणि भारतीय समाचार चित्र (तेही इंग्रजीतील) संपल्यावर मेन पिक्चर सुरु होताच मी पडद्याशी जोडलो गेलो. आणखीन एका थिएटरशी असा परिचय झाला, ते महत्त्वाचे.

त्या काळात प्रत्येक सिंगल स्क्रीन थिएटरचे आपलं एक स्वतःच व्यक्तिमत्व होतं, ओळख होती. आम्हा ‘चित्रपट व्यसनीं’चीही त्याच दृष्टिकोनातून थिएटरकडे पाहयची/जायची सवय होती. अनेक सिंगल स्क्रीन थिएटर अर्थात एकपडदा चित्रपटगृहाच्या जवळपास इराणी हॉटेलदेखील असायचे. त्या काळातील हे एक वैशिष्ट्यं. रिगलमध्ये पूर्वी हिंदी चित्रपट क्वचितच रिलीज होत. पण ते वैशिष्ट्यपूर्ण असत. सत्यजित राय दिग्दर्शित एकमेव हिंदी चित्रपट ‘शतरंज के खिलाडी’ याच रिगलमध्ये रिलीज व्हावा म्हणून या चित्रपटाचे निर्माते सुरेश जिंदाल यांनी विशेष प्रयत्न केल्याचे वृत्त होते. या चित्रपटाच्या प्रतिमेशी ते सुसंगत होते. या चित्रपटाला प्रामुख्याने दक्षिण मुंबईतील एलिट क्लास येईल असाच त्यामागचा विचार आणि विश्वास यात दिसतोय. शशी कपूर व शर्मिला टागोर यांच्या भूमिका असलेला मीडिया आणि राजकारण यांच्यातील नाट्यपूर्ण नातेसंबंधावरचा ‘न्यू दिल्ली टाईम्स’ येथेच मी अनुभवला. ‘आज की आवाज’ वगैरे काही हिंदी चित्रपट रिगलला सूट झाले. थिएटरचे व्यक्तिमत्व आणि चित्रपटाचे स्वरुप यांचा मेळ घातला जाण्याचे ते युग होते.

असे हे इंग्रजकालीन सिंगल स्क्रीन थिएटर. तेथील पहिला चित्रपट लाॅरेन अॅण्ड हार्डी यांचा  ‘द डेव्हिल ब्रदर्स’. थिएटरची मालकी फ्रामजी  सिधवा यांची. ते डेकोरेटीव्ह बांधले, चार्ल्स स्टीव्हन्स यांनी. एव्हाना आपल्या देशात चित्रपट बोलायला सुरुवात होऊन जेमतेम दोन वर्षे झाली होती. कुलाब्यातील थिएटर म्हटल्यावर जशी ऐटीत, हायफाय, पाॅलीश्ड पर्सनॅलिटी हवी अगदी तसेच हे. सुरुवातीस काही मूकपटही रिलीज झाले आणि विदेशी पिक्चर्सना भरपूर स्कोप मिळाला आणि मग ती खासियतच झाली. अनेक वर्षे येथे वाॅर्नर ब्रदर्स, मेट्रो गोल्डविन मेयर, ट्वेन्थी सेंन्चुरी फाॅक्स या कंपनीचे विदेशी पिक्चर प्रदर्शित होत. मुंबईतील विदेशी चित्रपटांचा दीर्घकालीन प्रवास आणि प्रभाव हादेखील एक वेगळाच विषय.

फार पूर्वी बिमल राॅय दिग्दर्शित ‘देवदास’ (१९५८) येथे प्रदर्शित झाल्याचा फोटो सोशल मीडियात पाहयला मिळतो. तेव्हा समोरचा रस्ता मोकळा दिसतोय. दिलीप कुमार, वैजयंतीमाला, सुचित्रा सेन यांच्या भूमिका असलेला हा ‘देवदास’ गाजला. कालांतराने रिचर्ड अटनबरो दिग्दर्शित बहुचर्चित चरित्रपट “गांधी” (१९८३)ची इंग्रजी आवृत्ती येथेच सत्तर एमएम स्वरुपात प्रदर्शित झाली आणि उत्तम प्रतिसाद मिळवला. परफेक्ट रिलीज म्हणतात ते हेच. अमोल पालेकर यांचा रहस्यरंजक असा विधु विनोद चोप्रा दिग्दर्शित ‘खामोश’ असे काही हिंदी चित्रपट येथे अधूनमधून येत. विधु विनोद चोप्राला सुखावणारे असे हे रिगलमधील रिलीज. फार पूर्वी येथे फिल्म फेअर पुरस्कार सोहळा रंगला. स्टार्स आले. २०१५ आणि २०१६ अशी दोन वर्षे येथे मामी चित्रपट महोत्सव आयोजित करण्यात आला. एव्हाना पारंपरिक अशी सिंगल स्क्रीन थिएटर्सची आणि मेन थिएटरची संस्कृती कालबाह्य होत गेल्याने रिगलवरची गर्दी दुर्मिळ होत गेली. फिल्म हेरिटेजच्या वतीने चंद्रा बारोट दिग्दर्शित ‘डाॅन’चा विशेष शो हाऊसफुल्ल ठरला. झीनत अमानची खास उपस्थिती व मुलाखत हे विशेष आकर्षण. रिगलमध्ये हे योग्य ठरले.

अधूनमधून रिगल थिएटर बंद झाल्याची बातमी येते. कसलीही खात्री करुन न घेता व्हाॅट्सअप ग्रुपवर व्हायरल होते. या सिंगल स्क्रीन थिएटरचे बाह्यरुपडं कायम ठेवून अंतर्गत रचनेत बदल करुन त्यात दोन स्क्रीन करायचीय अशी बातमी असते इतकेच. ते कदाचित चालेलही. व्हॉट्सअप विद्यापीठ धोकादायक आहे आणि यु ट्यूब चॅनलवर चित्रपटविषयक काहीही असते वा दिसतेय ते चित्रपट इतिहासाला मारक आहे हे वेगळे सांगण्याची गरज नाही. चित्रपट संस्कृतीतील रिगल थिएटरचं आपलं एक स्वतःच व्यक्तिमत्व आहे. आज रिगल चित्रपटगृहात जातो तेव्हा चित्रपटसृष्टीतील एका वैशिष्ट्यपूर्ण वास्तूत आपण आलो आहोत यांचा अभिमान वाटतो. रिगलचा प्रवास विदेशी चित्रपट ते आज देशविदेशातील जुन्या चित्रपटांचे आयोजन आणि त्याला हाऊसफुल्ल गर्दी… असा आहे. ब्याण्णव वर्षाच्या देखण्या व खणखणीत वास्तूला साजेशी…

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Continue reading

आता काय तर म्हणे शाहरुख खान…

शाहरुख खानला आशुतोष गोवारीकर दिग्दर्शित 'स्वदेस' (२००४)मधील मोहन भार्गव ही व्यक्तीरेखा उत्तम साकारली म्हणून म्हणा अथवा शिमित अमिन दिग्दर्शित 'चक दे इंडिया' (२००७)मधील हॉकी संघ प्रशिक्षक कबीर खान, या भूमिकेसाठी अभिनयाचा राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले असते...

पाडायला घेतलाय अमिताभच्या पिक्चरसाठी खास असलेला ‘अलंकार’!

आपल्या देशातील चित्रपट संस्कृतीतील अनेक गोष्टी अनुभवण्यासारख्या. त्या खूपच रंजक. विशेषतः एकपडदा अर्थात सिंगल स्क्रीन थिएटर्स आणि लोकप्रिय चित्रपटाचा. त्यातील काहींचा कधी पंचवीस तर कधी पन्नास आठवड्यांचा (कधी त्याहीपेक्षा जास्त) मुक्काम. आणि त्यात काही जणू विक्रम ठरले. दक्षिण मुंबईतील...

कभीभी फोन करके बोलना जग्गूसे बात करनी है!

सुभाष घई दिग्दर्शित "हीरो"चा (१९८३) दक्षिण मुंबईतील न्यू एक्सलसियर चित्रपटगृहाच्या चौथ्या मजल्यावरील मिनी थिएटरमध्ये आम्हा चित्रपट समीक्षकासाठी असलेल्या खेळास जग्गूदादा श्रॉफ हजर होता.‌ अर्थात चित्रपट समीक्षक आपल्या कामाबद्दल; चित्रपटाबद्दल कसं व्यक्त होताहेत याचं त्याला कुतूहल असल्याचं जाणवलं. स्वाभाविक होते...
Skip to content