Monday, December 30, 2024
Homeमाय व्हॉईसप्राण्याविषयी जनमनातले वलय...

प्राण्याविषयी जनमनातले वलय ठरवते त्याच्या चित्रिकरणाचा कालावधी

कोणत्याही प्राण्याविषयी जनमनात असलेले वलय बहुतेकदा त्या प्राण्याचे चित्रिकरण होण्याची तसेच त्याच्या पडद्यावरील दर्शनाचा कालावधीची शक्यता ठरवत असते, असे सुप्रसिद्ध वन्यजीव चित्रपट निर्माते आणि सिनेमॅटोग्राफर अल्फोन्स रॉय यांनी काल 18व्या मुंबई आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात “वन्यजीवनाचा शोध : भारतीय वन्यजीवन माहितीपट आणि संवर्धन प्रयत्न” या विषयावर आयोजित करण्यात आलेल्या मास्टरक्लासमध्ये सांगितले.

भारतीय वन्यजीवन आणि त्याच्या संवर्धनासाठीचे उपक्रम यांच्याशी संबंधित माहितीपटांच्या निर्मितीच्या जटील प्रक्रियेबाबत या सत्रात विचारमंथन करण्यात आले. अल्फोन्स रॉय पुढे म्हणाले की, दूरचित्रवाणीवरील कार्यक्रमांचे निर्माते पक्षी अथवा इतर लहान प्रजातींपेक्षा वाघ, सिंह अथवा निळा देवमासा यांच्याशी संबंधित कार्यक्रमांमध्ये अधिक रुची घेतात. वन्यजीवनावर आधारित चित्रपटांच्या बाबतीत त्या-त्या प्राण्याविषयीच्या आकर्षणावर अवलंबून असलेली एक विशिष्ट श्रेणीव्यवस्था अस्तित्त्वात आहे.

या क्षेत्रात ध्यासाला सर्वाधिक महत्त्व आहे हे लक्षात ठेवावे. जगात अशी कोणतीही जागा नाही ज्या ठिकाणी तुम्ही वन्यजीव चित्रपट निर्मिती संपूर्णपणे शिकू शकाल. यासाठी वन्य जीवनाबद्दल पराकोटीची आवड असणे गरजेचे आहे आणि अत्यंत समृध्द जैवविविधता असलेला भारत हा देश यासाठी अत्यंत योग्य जागा आहे, असे ते म्हणाले.

या क्षेत्रात चित्रिकरणापेक्षा तुमचा विषय आणि निसर्ग यांना नेहमीच अधिक प्राधान्य दिले गेले पाहिजे. आपण तिथे आहोत याची प्राण्यांना जाणीव होता कामा नये. विचलित न झालेल्या प्राण्यांची आपल्याला दृश्ये मिळवायची आहेत, असे त्यांनी स्पष्ट केले. वन्यजीवविषयक अहोरात्र सुरु असणाऱ्या वाहिन्यांच्या या युगात कोणत्याही परिस्थितीत वन्यजीवनाला त्रास होऊ नये या दंडकाची पिछेहाट होत आहे, अशी टीकाही त्यांनी केली.

वन्यजीवनाशी संबंधित चित्रपट निर्मिती प्रक्रियेतील उत्क्रांतीविषयी चर्चा करताना रॉय यांनी डिजिटल तंत्रज्ञानाचा प्रभाव मान्य केला. या तंत्रज्ञानामुळे मोबाईल कॅमेऱ्यांमध्ये वन्यजीवनाचे क्षण टिपणे सोपे झाले आहे. मात्र त्यांनी आजच्या काळात व्यावसायिक वन्यजीव चित्रपट निर्मितीला लागणाऱ्या मोठ्या खर्चाकडेदेखील दिशानिर्देश केला.

वाढलेली मानवी लोकसंख्या आणि जमिनीच्या आकारमानाच्या मर्यादांमुळे वारंवार मनुष्य-प्राणी संघर्ष होत आहेत. आपण आफ्रिकेच्या वन्यजीव व्यवस्थापनाच्या दृष्टिकोनातून शिकू शकतो, जिथे प्राण्यांचा कळप फार मोठा होऊ नये म्हणून काही प्राण्यांना मारले जाते. मात्र भारतात अशा पद्धती लागू करणे आव्हानात्मक आहे. विद्यार्थ्यांना निसर्गात रममाण होण्यासाठी प्रोत्साहित करत रॉय यांनी त्यांना निसर्ग क्लब आणि बॉम्बे नॅचरल हिस्ट्री सोसायटी किंवा मद्रास नॅचरल सायन्स सोसायटीसारख्या संस्थांमध्ये सहभागी होण्याचे आवाहन केले.

आपल्या वैयक्तिक अनुभवांबाबत बोलताना, रॉय यांनी पहिल्यांदा वाघांचे चित्रिकरण करताना आलेल्या आव्हानांची आठवण सांगितली. आम्ही झाडांवर चढून फांद्यांवर बसण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर गायरो स्टॅबिलायझरचा वापर केला. मात्र आवाजामुळे वाघ विचलित झाले. अखेरीस, आम्ही बांबूने एक तात्पुरता 14 फूट उंच ट्रायपॉड बांधला, असे ते म्हणाले.

तमिळनाडूच्या चित्रपट आणि दूरचित्रवाणी संस्थेचे माजी विद्यार्थी असलेल्या अल्फोन्स रॉय यांच्या छायाचित्रण निर्देशक म्हणून उल्लेखनीय कामांमध्ये ‘गौर हरी दास्तान’, ‘लाइफ इज गुड’ आणि ‘उरुमी’ यासारख्या गाजलेल्या चित्रपटांचा समावेश आहे. रॉयच्या सिनेमॅटिक दृष्टीमुळे त्यांना ‘तिबेट द एंड ऑफ टाईम’ (1995)साठी प्राइम टाइम एमी पुरस्कार आणि ‘टायगर किल’ (2008)साठी ह्यूगो टेलिव्हिजन पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले तसेच आमिर’ (2009) चित्रपटासाठी सर्वोत्कृष्ट सिनेमॅटोग्राफीच्या फिल्मफेअर पुरस्कारासाठी नामांकनदेखील मिळाले होते.

Continue reading

रायशाचे सोनेरी यश

नुकत्याच संपन्न झालेल्या मुंबई उपनगरातील सर्वात मोठ्या प्रबोधन आंतरशालेय क्रीडा महोत्सवात रायशा सावंतने मुलींच्या गटात शानदार कामगिरी करताना लांब उडीत सुवर्णपदक जिंकण्याचा पराक्रम केला. सध्या रायशा दहिसर (पश्चिम) येथील रुस्तमजी केंब्रिज इंटरनॅशनल स्कूलमध्ये चौथीत शिकत आहे. याअगोदर मे २०२३मध्ये झालेल्या...

फडणवीस म्हणतात- आमच्याकडे मानापमान मनात होतो, त्याचे संगीत मीडियात वाजते..

नववर्ष मराठी चित्रपटसृष्टीसाठी खूप खास ठरणार आहे. कारण, ज्या चित्रपटाची प्रेक्षक आतुरतेने वाट बघतायत तो संगीतमय चित्रपट संगीत मानापमान नववर्षाच्या सुरूवातीला प्रदर्शित होणार आहे. जिओ स्टुडिओज् प्रस्तुत आणि सुबोध भावे दिग्दर्शित "संगीत मानापमान"चा ट्रेलर प्रेक्षकांच्या भेटीस आलाय. विशेष म्हणजे...

महाराष्ट्रात नववर्षाची सुरूवात वाचन संकल्पाने!

वाचनसंस्कृतीच्या विकासाने तरुणांच्या व्यक्तिमत्वाचे भरण-पोषण होण्यास तसेच सामाजिक प्रबोधन होण्यास मदत होते. यासाठी विद्यापीठे, महाविद्यालय व सार्वजनिक ग्रंथालयांमध्ये 'वाचन संकल्प महाराष्ट्राचा' हा उपक्रम येत्या १ ते १५ जानेवारी २०२५ या कालावधीत राज्यात राबविण्यात येणार आहे, अशी घोषणा महाराष्ट्राचे उच्च...
Skip to content