Homeब्लॅक अँड व्हाईटबुद्धिबळाच्या पटावर युवा...

बुद्धिबळाच्या पटावर युवा दिव्याचा दिव्य पराक्रम!

बातुमी, जाॅर्जिया येथे झालेल्या महिलांच्या वर्ल्ड कप बुद्धिबळ स्पर्धेत महाराष्ट्राच्या, मूळच्या नागपूरच्या असलेल्या अवघ्या १९ वर्षीय दिव्या देशमुखने जेतेपदला गवसणी घालून आपल्या दिव्य पराक्रमाची प्रचिती महिला बुद्धिबळ जगताला दाखवून दिली. हे विजेतेपद मिळवताना दिव्याने अनेक नवनव्या विक्रमाला गवसणी घातली. अंतिम सामन्यात दिव्याने अटीतटीच्या लढतीत आपल्यापेक्षा प्रचंड अनुभवी असलेल्या ३८ वर्षीय कोनेरु हम्पीला अखेर टायब्रेकरमध्ये नमवून आपल्या आजवरच्या झळाळत्या कारर्कीदीतील सर्वात मोठ्या विजयाची नोंद केली. उभय खेळाडूतील पहिले दोन डाव बरोबरीत सुटले. पहिल्या डावात पांढरे मोहरे घेऊन खेळणाऱ्या दिव्याने आक्रमक चाली रचtन हम्पीला चांगले जेरीस आणले होते. परंतु हम्पीने या आक्रमणातून अखेर बचाव करुन ३९ चालीनंतर सामना बरोबरीत सोडवण्याचा प्रस्ताव ठेवला. दुसऱ्या डावात पांढरे मोहरे हम्पीकडे होते. पण त्याचा फायदा तिला घेता आला नाही. दिव्याने या डावात भक्कम बचाव करुन हम्पीचे आक्रमण यशस्वीरित्या परतवले. त्यामुळे दुसऱ्या डावात ३४ चालीनंतर दोघींनी सामना बरोबरीत सोडवून ही निर्णायक लढत टायब्रेकरमध्ये नेली. अखेर टायब्रेकरमध्ये दिव्याने ही बरोबरची कोंडी फोडून महिला‌‌‌ बुद्धिबळ विश्वाला नवा विजेता मिळवून‌ दिला.

टायब्रेकरमध्ये ८१ चालीनंतर पहिला डाव बरोबरीत सुटला. पहिल्या डावात दिव्याकडे पांढऱ्या मोहऱ्या होत्या. पण त्याचा फायदा ती घेऊ शकली नाही. दुसऱ्या डावात‌ मात्र दिव्याकडे काळ्या मोहऱ्या असतानादेखील तिने हम्पीवर बाजी उलटवली. ७५व्या चालीत दिव्याने हम्पीला पराभव पत्करायला भाग पाडले. अनुभवी हम्पीचेच पारडे या अंतिम लढतीत जड होते. युवा दिव्याच्या तुलनेत हम्पी खेळाच्या सर्व अंगात सरस होती. भारताची सर्वोत्तम महिला बुद्धिबळपटू म्हणून हम्पीची ख्याती आहे. त्यामुळे बहुतेकांनी हम्पीला विजयाची जास्त संधी दिली होती. परंतु दिव्याने हे सर्व अंदाज आपल्या सुरेख खेळाची झलक पेश करुन मोडीत काढले. एकदंर‌‌ या स्पर्धेतील दोघींच्याही कामगिरीचा विचार केला तर हम्पीपेक्षा दिव्याची कामगिरी आधिक सरस होती. त्यामुळे तीच या स्पर्धेच्या जेतेपदाची योग्य दावेदार होती, असे म्हटले तर वावगे ठरू नये. या स्पर्धेतील दिव्याच्या आक्रमक खेळाला तोड नव्हती. तिने कुठलेही दडपण न घेता आपल्या नेहमीच्या शैलीतील बचाव, आक्रमण या दोन्हीचा मिलाफ साधणारा लाजवाब खेळ करुन जेतेपद खेचून आणले. दिव्याच्या खेळाची शैली आक्रमक आहे. परंतु तिने योग्य ठिकाणी आपण उत्तम बचावपण करु शकतो हे दाखवून दिले. आपल्या या पहिल्याच स्पर्धेत खेळणाऱ्या दिव्याने सर्वात लहान वयात ही स्पर्धा जिंकून न भूतो न भविष्यती, असा आगळा पराक्रम केला. अंतिम सामन्या‌अगोदर हम्पी म्हणाली होती की, या स्पर्धेत दिव्याने अप्रतिम खेळ केला आहे. त्यामुळे तिला नमवणे सोपं नसेल. दिव्याने अंतिम लढतीत बाजी मारून हम्पीचे बोल खरे करुन दाखवले. दोन‌‌‌ पिढ्यांमधील या लढतीत दिव्याने सध्यातरी नव्या, युवा पिढीची सरशी झाल्याचे दाखवून‌ दिले.

दिव्याची या स्पर्धेतील कामगिरी स्वप्नवत होती. अंतिम फेरीत प्रवेश करताना दिव्याने जागतिक क्रमवारीत अव्वल क्रमांकावर असलेल्या दहापैकी तीन खेळाडूंना शह दिला. विश्व क्रमवारीत १६व्या स्थानावर असलेल्या दिव्याने उपउपांत्यपूर्व फेरीत चीनच्या झू जिनेरला, उपांत्यपूर्व फेरीत भारताच्या द्रोणावली हरिकाला आणि उपांत्य फेरीत चीनच्या माजी विश्वविजेत्या टैन‌ झोंगयीला नमविले होते. दिव्याने हे विजेतेपद मिळवल्यामुळे ती भारताची थेट चौथी महिला ग्रॅन्डमास्टर झाली. याअगोदर हम्पी, वैशाली, हरिकाने हा मान मिळवला होता. योगायोग म्हणजे हम्पी भारताची पहिली महिला ग्रॅन्डमास्टर झाली होती. तिलाच पराभूत करुन दिव्याने हा किताब मिळवला. दिव्या आणि हम्पी आता ‌दोघी कँडिडेट्स स्पर्धेसाठी पात्र ठरल्या आहेत. यंदाचे या स्पर्धेचे तिसरे वर्ष होते. भारतीय महिलांनी आपली आजवरची सर्वोत्तम कामगिरी यंदा या स्पर्धेत केली. स्पर्धेत प्रथमच हम्पी, दिव्या, हरिका, वैशाली या चौघीजणी पात्र ठरल्या होत्या. उपांत्य फेरीत चीन‌विरुद्ध भारत असाच जणूकाही मुकाबला होता. त्यात चिनी खेळाडूंना हम्पी, दिव्याने पराभव चाखायला लावला.

वयाच्या अवघ्या पाचव्या वर्षी या खेळाचा श्रीगणेशा करणाऱ्या दिव्याने सात वर्षांखालील राष्ट्रीय बुद्धिबळ स्पर्धेत आपले‌‌ पहिले जेतेपद तिने पटकावले. त्यानंतर तिने मागे वळून बघितलं नाही. यशाची एक-एक शिखर ती सर करत ‌ गेली. आपल्या १४ वर्षांच्या स्पर्धात्मक कारकिर्दीत ४१ आंतरराष्ट्रीय स्पर्धेत भारताचे प्रतिनिधीत्व करताना दिव्याने २४ सुवर्णपदके‌‌ जिंकली. ती १०, १२, १९ वर्षांखालील गटाची विश्वविजेती आहे. तसेच ती आशियाई‌ विजेतीदेखील आहे. गतवर्षी झालेल्या बुद्धिबळ ऑलिम्पियाड स्पर्धेत भारतीय विजयात दिव्याचा मोठा वाटा होता. तिने शेवटची निर्णायक लढत जिंकल्यामुळेच भारताला सुवर्णपदक मिळाले होते. आता पुरुषांप्रमाणेच भारतीय महिला बुद्धिबळपटूदेखील आपली मक्तेदारी सिद्ध करण्यास सज्ज झाल्या आहेत. हीच या स्पर्धेतील मोठी जमेची बाजू आहे. दिव्याची या स्पर्धेतील थक्क करणारी कामगिरी बघून कुणी सांगावे ती पुढची विश्वविजेतीदेखील असू शकते.

1 COMMENT

  1. दोन्हीही महिला भारतीय आहेत. त्यामुळे दोघीचेही अभिनंदन
    भारताचे नाव असचं उज्ज्वल करीत राहो.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Continue reading

पुन्हा आपटला वेस्टइंडीज क्रिकेट संघ!

एका जमान्यात क्रिकेटविश्वावर एखाद्या‌ सम्राटाप्रमाणे राज्य करणाऱ्या, बलाढ्य वेस्टइंडीज क्रिकेट संघाची सध्या चांगलीच दाणादाण उडाली आहे. या संघाची कामगिरी दिवसेंदिवस‌ अधिकच खालावत चालली आहे. त्यामुळे‌ या संघाचे चाहते चिंताग्रस्त आहेत. एका जमान्यात वेस्टइंडीज क्रिकेट संघाचा सुवर्णकाळ होता. याच संघाने...

विम्बल्डन टेनिस स्पर्धेत यानिक व इगाने रचला इतिहास!

यंदाच्या विम्बल्डन टेनिस स्पर्धेवर आपल्या जेतेपदाच्या विजयाची मोहोर उमटवत इटलीच्या २३ वर्षीय यानिक सिनर‌ आणि पोलंडच्या २४ वर्षीय इगा स्वियातेकने इतिहास रचला. ही स्पर्धा जिंकणारे हे दोघे त्या-त्या देशाचे पहिले टेनिसपटू ठरले आहेत. या दोघांच्या विजयामुळे यंदा या स्पर्धेत...

भारतीय हॉकी संघाचे पुन्हा ‘येरे माझ्या मागल्या’!

ऑलिंपिक स्पर्धेत भारतीय हाॅकी संघाने सलग दोन कांस्यपदकं जिंकून भारतीय हॉकीसाठी पुन्हा अच्छे दिन आणले. त्यामुळे सहाजिकच भारतीय हाॅकीला एक नवी झळाळी मिळाली. भारतीय हाॅकीप्रेमींच्या भारतीय हाॅकी संघाकडून पुन्हा मोठ्या अपेक्षा बाळगल्या जाऊ लागल्या. पण नुकत्याच झालेल्या मानाच्या एफ.आय.ई.एच....
Skip to content