Friday, October 18, 2024
Homeमाय व्हॉईसग्लॅमर मागचा अंधार.......

ग्लॅमर मागचा अंधार…. हास्यामागची उदासी…..

ग्लॅमर मागचा अंधार….

हास्यामागची उदासी…..

एकाकी मृत्यू…..

गेल्या काही काळातल्या वेगवेगळ्या नामवंतांच्या बातम्या बघितल्या तर हेच लक्षात येतं….

कारणं वेगवेगळी असतील पण एकाकीपणा… उदासी… वैफल्य या काही गोष्टी यात समान दिसतात….

ती व्यक्ती आपल्या किती जवळची होती…. आपला कसा मित्र होती हे सांगणारे आणि त्या व्यक्तीबरोबर घालवलेल्या सुखद आठवणी जागवणारे नंतर खूपजण पुढे येतात. टीव्हीवर झळकतात. पण जेव्हा ती व्यक्ती अडचणीत असते तेव्हा हे कुठे असतात?

एखाद्याचं अडीचशे कोटीचं कर्ज त्याचा मित्र फेडू शकत नसेल…. ते आपण समजू शकतो ….पण त्या कर्जाच्या खाईतून बाहेर येण्यासाठी मानसिक बळ देणारा एकही मित्र नसावा?

अनेक व्यक्तिगत किंवा आर्थिक कारणांमुळे एखाद्याला वैफल्य येणं हे समजू शकतं…. पण ते जाणवणारं मित्रांचं किंवा जिवलगांचं कोंडाळं आजूबाजूला नसावं? 

शिरीष कणेकर यांच्यावर मी जो लेख लिहिला, तो खूप व्हायरल झाला. त्यानिमित्ताने अनेक ठिकाणी चर्चा घडल्या. माझे मेहुणे प्रसाद अडावदकर यांनी तो शिकागो मित्र मंडळाच्या व्हॉट्सअप ग्रुपवर टाकला. तिथेही या अनुषंगाने खूप चांगल्या चर्चा घडल्या. एकटेपणा आणि एकाकीपणा यातली सीमारेषा आणि ती कशी बुजवता येईल यावर त्या सदस्यांनी चांगली मतं मांडली….

या सगळ्या मंथनातून मला एकच जाणवतं आहे….

एकटेपणा हा जर आजच्या समाज जीवनाचा…. आपल्या जीवनशैलीचा अविभाज्य भाग ठरणार असेल…. ठरला असेल तर त्याला तोंड देण्यासाठी आपण काय करतो आहोत? 

भविष्यातील आर्थिक समस्या लक्षात घेऊन आपण आर्थिक गुंतवणूक करतो; पण भविष्यातील मानसिक समस्या लक्षात घेऊन आपण आज काय तरतूद करतो आहोत? 

आपल्या वाट्याला येणाऱ्या दुःखांचं…. संकटांचं…. भांडवल करण्यात काही अर्थ नसतो. जीवन म्हटल्यावर ते येणारच. आजारपणसुद्धा जीवन म्हटलं की येणारच…. खरं तर त्यात खचून जावं असं काही नसतं; पण जर त्यातून बाहेर येण्यासाठी जगण्याला काही प्रयोजनच नसेल तर ही संकटं, या व्याधी आपल्याला खाऊन टाकणार हे नक्की आहे…. कारण जगण्याला दुसरं कसलंच प्रयोजन नसल्याने आपण त्यातच गुरफटून राहणार…. नकारात्मक भावनांचा एक कोश आपल्या भोवती आपणच निर्माण करून त्यात आपल्या स्वतःला मिटवून घेणार हे नक्की आहे.

ग्लॅमर

अर्थात हे बदलणं शक्य आहे. त्यासाठीचे उपाय प्रत्येकाने स्वतः शोधायचे आहेत.

मात्र अभिनेत्री तनुजा यांनी मला सांगितलेलं एक मला खूप पटलं. त्या म्हणाल्या की, जो क्षण गेला तो गेला… त्यावेळेला मी अमक्याला अमुक बोलले…. तो तमका मला अमुक बोलला…. असं झालं… तसं झालं… यावर विचार करण्यात नंतर काहीही अर्थ नसतो. नदीचं पाणी वाहून गेल्यानंतर जसं ते परत येत नाही तसंच गेलेला क्षण आपल्याला परत आणता येत नाही. त्यामुळे तो विसरून जाऊन पुढे जाणं शिकता आलं पाहिजे. आपण त्या क्षणांमध्ये…. त्या सुखद आणि दुःखद अनुभवांमध्ये खूपच अडकून पडतो आणि आपली शक्ती वाया घालवतो; कारण त्यात कितीही अडकून पडलो आणि त्याच्यावर आपली कितीही शक्ती खर्च केली तरी त्यातून बदलणं काहीच शक्य नसतं. मग ते का करायचं?

तर अभिनेत्री नूतनजी नेहेमी म्हणायच्या ‘लेट गो’ करा…. आपण ते करत नाही आणि फसतो.

हे बदलण्याचा निर्धार करून आपण जर आपली मानसिक ताकद वाढवायचा ठरवलं…. त्यासाठी छंद, अध्यात्म किंवा एखाद्या सामाजिक कार्यात स्वतःला गुंतवून घेतलं तर हे विचारसुद्धा मनात येणार नाहीत.

ज्येष्ठ नागरिकांच्या एका कार्यक्रमात माझं भाषण झाल्यावर बऱ्याच जणांनी मला येऊन असं सांगितलं की, आम्हाला समाजासाठी काहीतरी करायचे आहे….  तुम्ही आम्हाला संस्था सांगा, तिथे आम्ही जाऊ….

दुसऱ्यांनी असं सांगून आपल्या मनातली उर्मी, आपल्या मनातील त्या समाजघटकांविषयीची कणव जागी करता येते का? 

एखाद्याला वृद्धांचा प्रश्न महत्त्वाचा वाटत असेल…. एखाद्याला पाण्याचा प्रश्न महत्त्वाचा वाटत असेल… एखाद्याला अनाथ मुलांचा प्रश्न महत्त्वाचा वाटत असेल… एखाद्याला झोपडपट्ट्यांचा किंवा कचरावेचक महिला-मुलांचा प्रश्न महत्त्वाचा वाटत असेल…. तो विचार करून प्रत्येकाने आपला मार्ग आपणच निवडायचा आहे. पण आपल्याला इतकं सगळं दुसऱ्यांनी तयार द्यायची सवय आपण लावून घेतो की, ते दुसऱ्यांनी दिलं नाही की पुन्हा नैराश्याच्या गर्तेत जातो. आपल्याला एखादी गोष्ट करायची आहे आणि करता येत नाही, या वैफल्याच्या आहारी जातो.

पण, आपल्याला खरंच अशी कोणाची गरज असते का? 

आपण आपलंच मन खंबीर बनवू शकत नाही का? 

करता येतं!

मी स्वानुभवावरून सांगते आहे! आपल्या मनाची आणि अंतर्मनाची ताकद अफाट आहे. मात्र त्याचा अनुभव तर घ्या! 

हीच ताकद जर सामूहिक झाली तर आपण व्यापक बदल घडवू शकतो हेही नक्की आहे.

एखाद्या चटका लावणाऱ्या मृत्यूनंतर आपण गळे काढण्याऐवजी आपणच आपल्या मित्र-मैत्रिणींसाठी… आपल्या जिवलगांसाठी आणि समाजासाठीसुद्धा जिव्हाळ्याची बेटं तयार नाही का करू शकत? 

येत्या रविवारी मैत्री दिन आहे. मैत्री, फ्रेंडशिप याच्याबाबतचे गोड गोड मेसेजेस त्या दिवशी नुसतेच इकडून तिकडे पाठवण्याऐवजी खऱ्या अर्थाने त्या मैत्रीला जागूया ना….

आपला मित्र किंवा मैत्रिण एकेक पाकळीने मिटत जात असताना त्यांना परत फुलण्यासाठी आधार देऊया ना….

Continue reading

नमन लतादीदींना..

लतादीदींची आज जयंती! त्यांचा बारा वर्षांचा सहवास, स्नेह मला लाभला. या काळात अगदी त्यांच्या पलंगावर त्यांच्या शेजारी बसून मारलेल्या गप्पा.. गप्पांमध्ये सहज ऐकलेलं त्यांचं गाणं.. त्यांच्याकडून ऐकलेल्या असंख्य आठवणी.. आईच्या मायेने त्यांनी केलेला आग्रह, त्यांचं आगत्य, त्यांचा ‘परफेक्शन’चा अट्टहास.....

वो भूली दास्तां.. लो फिर याद आ गयी…

स्वरसम्राज्ञी लता मंगेशकर यांचा कालच वाढदिवस झाला. खरं तर दुर्दैवाने आता वाढदिवस म्हणता येणार नाही; कारण शरीराने त्या आपल्यात नाहीत. म्हणून जयंती म्हणायचं... बाकी त्यांच्या सुरांच्या / आठवणींच्या रूपात त्या आपल्याचबरोबर आहेत. त्यांच्या असंख्य आठवणी रोजच मनात पिंगा घालतात....

सीमाताईंना अखेरचा निरोप!

काही मृत्यू विलक्षण पेचात टाकतात. ती व्यक्ती आपल्यातून निघून गेली याचं दुःख मानायचं की ती यातनाचक्रातून सुटली याचा आनंद मानायचा हेच कळत नाही. सीमा देव, सीमाताईंचा मृत्यू तसा आहे. २०१९ साली व्यास क्रिएशन्सच्या ठाण्यात झालेल्या कार्यक्रमाला त्या शेवटच्या भेटल्या. तेव्हाही...
Skip to content