मुंबई-पुणे प्रवासाला गती देणारा यशवंतराव चव्हाण द्रूतगती महामार्ग नजीकच्या काळात अधिक गतीमान होणार आहे. या मार्गावरील घाटाचा पट्टा टाळणारा ‘मिसिंग लिंक’ प्रकल्प अभियांत्रिकी क्षेत्रातला एक चमत्कार आहे. या प्रकल्पातला एक बोगदा देशातला सर्वात लांब बोगदा असून याच प्रकल्पात देशातला सर्वात उंच पूलही बांधला जाणार आहे. या प्रकल्पामुळे पुणे-मुंबई प्रवासाचा वेळ अर्धा तासाने कमी होणार आहे.
काल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तसेच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या प्रकल्पाच्या प्रगतीचा आढावा घेतला. खासदार श्रीरंग बारणे, माजी आमदार बाळा भेगडे तसेच अनेक अधिकारी यावेळी उपस्थित होते. मुंबई-पुणे द्रूतगती मार्गावरील मिसिंग लिंक प्रकल्पामुळे मुंबई-पुणे अंतर कमी होणार आहे. महामार्गावरील घाट असलेला भाग या प्रकल्पामुळे टाळता येणार असून घाटमार्गामुळे होणारा वाहतूक अडथळा दूर होणार आहे. मिसिंग लिंक प्रकल्पांतर्गत एकूण तीन बोगदे असून एक बोगदा 9 किलोमीटर लांब व 23 मीटर रुंद आहे. देशातल्या सर्वाधिक लांबीचा बोगदा तो ठरणार आहे. याअगोदर समृद्धी महामार्गावरील बोगद्याचा विक्रम या बोगद्यामुळे मागे पडेल. प्रकल्पांतर्गत अतिशय उंच पूल बांधण्यात येत असून याची उंची 185 मीटर आहे. देशामध्ये आतापर्यंत एव्हढा उंच पूल कुठल्याच ठिकाणी बांधला गेला नाही. हादेखील एक विक्रम होणार असल्याचे मुख्यमंत्री फडणवीस यांनी यावेळी सांगितले.

महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळच्यावतीने या प्रकल्पाचे काम सुरू आहे. या प्रकल्पाचे एकूण 94 टक्के काम पूर्ण करण्यात आले असून उर्वरित काम लवकरच पूर्ण करण्यात येईल, असेही ते म्हणाले.
मिसिंग लिंक प्रकल्प अत्याधुनिक तंत्रज्ञान वापरून बांधण्यात येत आहे. येथील वातावरण व हवेच्या दाबाची स्थिती पाहता अतिशय कठीण परिस्थितीमध्ये अनेक अभियंते काम करीत आहेत. हा प्रकल्प सुरू झाल्यावर मुंबई-पुणे दरम्यानचा प्रवास अर्ध्या तासाने कमी होणार असून या घाट भागातील वाहतुकीची समस्या पूर्णपणे सुटण्यास मदत होईल. अपघात टाळण्यासही यामुळे मदत होणार आहे. या प्रकल्पामुळे वेळेसोबतच इंधनाचीही बचत होईल, प्रदूषणही कमी होईल. देशाच्या व महाराष्ट्राच्या विकासाला या प्रकल्पामुळे चालना मिळेल, असे उपमुख्यमंत्री शिंदे यांनी सांगितले.