अजित पवार यांनी मुंबईत सध्या चालू असलेल्या विधिमंडळाच्या अधिवेशनात अर्थसंकल्प मांडला, त्यावर विधानसभेत चर्चाही झाली. अजित पवारांनी अर्थसंकल्प मांडला त्या दिवशीच म्हणजे शुक्रवारी संत तुकाराम महाराजांची पालखी देहूहून पंढरपूरकडे निघाली. त्याचा संदर्भ देत अजित पवार यांनी संत तुकाराम महाराजांच्या अभंगांचे उल्लेख त्यांच्या अर्थसंकल्पीय भाषणात केले होते. तोच धागा पकडून आमदार अतुल बेनके यांनी अजित पवार यांच्या अर्थसंकल्पाचे समर्थन केले. त्यांनीही संत तुकारामांच्या अभंगांचा वापर करत हा अर्थसंकल्प कसा उत्तम आहे हे सांगितले.
अजित पवारांचे पुण्यातील समर्थक चेतन तुपे यांनी अर्थसंकल्पाचे समर्थन करताना सांगितले की, काही
आमदारांनी अर्थसंकल्पावर बोलताना शेरोशायरी केली, काहींनी संत तुकाराम महाराजांचे अभंग सांगितले पण मी संस्कृतमधील श्लोक सर्वांना ऐकवणार आहे. सर्वे सन्तु निरामयः, याचा उल्लेख करत तुपे यांनी त्याचा अर्थही सांगितला.
हे सगळं सभागृहात ऐकताना अजित पवार यांना सुखद धक्के बसत होते. त्यामुळेच त्यांनी बेनके यांना बसल्या जागेवरूनच हात जोडून त्यांचे खुणेनेच आभार मानले. तोवर चेतन तुपे यांनी संस्कृत सुरू केले. त्यावेळी अजित पवारांनी चेहरा असा केला की जणू अर्थसंकल्प मांडून काय करून बसलो आपण… कारण हे लोक शेरोशायरी करताहेत, अभंग उद्धृत करून त्यातले वर्णन अर्थसंकल्पाला लागू होते सांगताहेत तर तुपे यांनी सर्वे सन्तु निरामयः असेही सांगत आहेत. पण ते पाहून अजित पवार मात्र कृतकृत्य झाले.