मी उद्धव ठाकरे यांना सत्ताधारी बाजूला यायचे आहे का, असे लायटर व्हेनमध्ये विचारले होते आणि तुम्ही.. तुम्ही लोकांनी त्याची हेडलाईन करून टाकली, अशा शब्दांत मुख्यमंत्री देवेन्द्र फडणवीस यांनी आपली कैफियत मांडली तर याच विषयावर उद्धव ठाकरे यांना माध्यमांनी प्रश्न विचारल्यावर त्यांनी, ये अंदर की बात है… असं म्हणून उत्तर देण्याचं टाळताना कुतूहल मात्र वाढवलं. गेले तीन दिवस दोन्ही नेते (जितेन्द्र आव्हाड आणि गोपीचंद पडळकर) ज्याप्रकारे वागत होते, ते आठवीतल्या मुलांनाही लाजवेल असे होते. एक दुसऱ्याला म्हणतो की हा नक्षल आहे तर दुसरा पहिल्याला मंगळसूत्रचोर आहे म्हणतो. हे सगळे आठवीतली मुलेही करणार नाहीत असे आहे, असे फडणवीस म्हणाले.
महाराष्ट्र विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाचा समारोप शुक्रवारी झाला. अधिवेशनाच्या समारोपानंतर फडणवीस पत्रकार परिषदेत बोलत होते. त्यांच्यासमवेत दोन्ही उपमुख्यमंत्री, एकनाथ शिन्दे आणि अजित पवार तसेच मंत्रिमंडळातील सहकारी चंद्रशेखर बावनकुळे, गिरीश महाजन आणि शंभूराज देसाई हेही पत्रकार परिषदेला उपस्थित होते. त्याआधी उद्धव ठाकरे आणि त्यांचे चिरंजीव आदित्य ठाकरे यांनी पत्रकारांशी संवाद साधला. त्यांच्यानंतर विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांच्यासह जयंत पाटील, जितेन्द्र आव्हाड, अनिल परब, सचिन अहिर, सतेज पाटील आणि सुनील शिन्दे यांनीही पत्रकारांशी संवाद साधला.

मुख्यमंत्र्यांनी माध्यमांवर खापर फोडल्यानंतर, तुम्ही उद्धव ठाकरेंना ऑफर दिल्याने दोन्ही उपमुख्यमंत्री अस्वस्थ झाले असते म्हणून माध्यमांनी हेडलाईन केली, असे सांगितल्यावर अजित पवार माध्यमांना उद्देशून उत्तरले की, तुम्ही नका आमची काळजी करू. त्यावर एकनाथ शिन्दे यांच्याकडे बॉक्सर आहेत, असे एका पत्रकाराने निदर्शनाला आणून दिले. त्या पत्रकाराचा रोख आमदार कँन्टीनमध्ये मारहाण करणाऱ्या आमदार संजय गायकवाड यांच्याकडे होता आणि तो एकनाथ शिन्देंच्या शिवसेनेचा असल्याने पत्रकाराच्या टिप्पणीला मुख्यमंत्री फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवारांसह एकनाथ शिन्देंनीही दाद दिली. अजित पवार उत्तरले की, बॉक्सर तुम्हालाच ठोसा देईल. त्यावर तो पत्रकार उत्तरला की, मी सुरक्षित अंतरावर आहे आणि पत्रकार परिषदेच्या सभागृहात एकच हंशा उसळला.
राज्यात दमदार पाऊस झाला असून सर्व धरणांमध्ये चांगला पाणीसाठा असल्याने खरीप हंगामही चांगला जाणार आहे आणि आमच्या महायुती सरकारची कामगिरीही पावसाळी अधिवेशनात दमदार झाली आहे, असा दावा मुख्यमंत्री देवेन्द्र फडणवीस यांनी पावसाळी अधिवेशनाचे सूप वाजल्यानंतर केला. अधिवेशनात १६ विधेयके मंजूर करण्यात आली असून राज्यातील ११ किल्ल्यांना युनेस्को मानांकन मिळाले आहे, असे फडणवीस यांनी सांगितले. तसेच, सरासरीपेक्षा जास्त पाऊस राज्याच्या सर्व भागात पडत असून धरणातला पाणीसाठा चांगला आहे. मोठ्या धरणांमध्ये ६७ टक्के साठा आहे. मध्यम धरणांमध्ये ५५ तर लघुपाटबंधारे प्रकल्पांमध्ये ४० टक्के पाणीसठा आहे. खरीपाचा हंगाम चांगला असेल, असेही मुख्यमंत्र्यांनी सांगितले. उद्धव ठाकरे यांनी मात्र, सरकारने शेतकऱ्यांच्या तोंडाला पाने पुसली असून राज्यातील कोणत्याही घटकाच्या प्रश्नांची तड अधिवेशनात लागली नाही, अशी टीका केली.

विधानभवनात झालेला मारामारीचा प्रकार ही विधानसभेच्या अधिवेशनाला गालबोट लावणारी घटना आहे आणि असे प्रकार पुन्हा घडू नयेत, याची काळजी आम्ही सगळे घेऊ, असे आश्वासन मुख्यमंत्री देवेन्द्र फडणवीस यांच्यासह दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी अधिवेशन संपल्यानंतरच्या पत्रकार परिषदेत दिले. मारामारीचा प्रकार झाला त्याबद्दल दुःख आणि खेद आहे आणि अशा गोष्टी घडू नयेत, यासाठी प्रयत्न असेल, असे फडणवीस यांनी सांगितले. हा प्रकार अधिवेशनाला गालबोट आहे, असे अजित पवार म्हणाले तर हा प्रकार अयोग्य असल्याचे मत शिन्दे यांनी व्यक्त केले.
फडणवीस म्हणाले की, आपण आमदार आहोत आणि आपण कोणत्या सभागृहाचे सदस्य आहोत. या सभागृहाची उंची काय आहे, हे दोघांनीही लक्षात घ्यायला हवे. पडळकर यांनी यापूर्वी अजित पवार किंवा शरद पवार यांच्यावर खालच्या पातळीवर जाऊन टीका केली होती, याकडे लक्ष वेधल्यावर फडणवीस म्हणाले, पवारसाहेबांबद्दल पडळकर बोलले तेव्हा मी दिलगिरी व्यक्त केली होती आणि अजितदादांवर त्यांनी टीका केली तेव्हाही मी समज दिली होती. पण फक्त पडळकरांनाच समज का द्यायची, इतरांचे आका कोण आहेत, हेही बोलायला हवे, अशी अपेक्षाही फडणवीस यांनी व्यक्त केली.