बॅडमिंटन आणि मनोहर गोडसे यांचे एक अतूट नातं आहे, जे अगदी शेवटच्या श्वासापर्यंत तुटूच शकत नाही. बॅडमिंटन हा जणू काही गोडसे यांचा श्वास आहे, असेच म्हणावे लागेल. नुकतेच वयाच्या ८५व्या वर्षात पर्दापण करणाऱ्या गोडसे यांनी तब्बल सहा दशकांपेक्षा जास्त काळ या खेळाची निस्पृहपणे खूप मोठी सेवा केली आहे. सुरूवातीला २० वर्षे खेळाडू म्हणून या खेळात त्यांनी योगदान दिले. त्यानंतर त्यांनी आपला मोर्चा प्रशिक्षणाकडे वळवला. मग युवा खेळाडूंना व्यासपीठ मिळावे म्हणून त्यांनी मनोरा बॅडमिंटन अकादमीची स्थापना केली. १९९७पासून मनोरा बॅडमिंटन अकादमीतर्फे युवा खेळाडूंसाठी बॅडमिंटन स्पर्धांचे नियमित आयोजन केले जाते. आतापर्यंत अकादमीने तब्बल ११७ स्पर्धांचे यशस्वी आयोजन केले आहे. गोडसे सरांची सहा दशकांची वाटचाल सोपी नव्हती. अत्यंत प्रतिकूल परिस्थितीवर मात करीत त्यांनी या खेळाचे शिवधनुष्य यशस्वीपणे पेलले.

रायगड येथील पेणजवळील वरसर्ई या छोट्याशा गावात त्यांचा जन्म झाला. तिथे चौथीपर्यंत त्यांचे शालेय शिक्षण झाले.तिथे असताना बॅडमिंटन खेळाची त्यांना फारशी माहितीदेखील नव्हती. या खेळाचे “स्पेलिंग”देखील त्यांना माहित नव्हते. त्यांचे चौथीपर्यंत शालेय शिक्षण झाल्यानंतर गोडसे कुंटुंबियांनी आपला मुक्काम मुंबईत हलवला. गोडसे कुंटुंबीय माटुंगा येथील लोकमान्य नगर येथे राहण्यास आले. त्यांच्या लोकमान्य नगरात मातीचे बॅडमिंटन कोर्ट होते. तेथे मोठी मंडळी नियमित बॅडमिंटन खेळत असत. त्यांचा खेळ बघून छोटा मनोहर बॅडमिंटन खेळाच्या प्रेमात पडला. मोठ्या मंडळींचे खेळून झाल्यानंतर ती खराब झालेली शटल “कॉक्स” तिथेच कोर्टच्या बाजूला टाकून देत असत. मग गोडसे यांचे छोटे सवंगडी ती शटल “कॉक्स” उचलत आणि टेबल टेनिसच्या बॅटने खेळायचा जोरदार प्रयत्न करायची. मोठ्या मंडळीत साठे नावाचे गृहस्थ चांगले खेळायचे. ते स्प्रिंग साठे या टोपण नावाने ओळखले जायचे. मनोहर यांना त्यांच्यापासून या खेळाची स्फूर्ती मिळाली. सुरूवातीला त्यांचेच मार्गदर्शन मनोहरला मिळाले.

गोडसे यांच्या घरची आर्थिक स्थिती तशी बेताचीच. मध्य रेल्वे बॅडमिंटन क्लबमध्ये प्रवेश मिळवण्याची मनोहरची खूप इच्छा होती. प्रवेश फी अवघी सहा रुपये होती. पण तेव्हा वडिलांकडे पैसै मागण्याचे धाडस मनोहरकडे नव्हते. त्यामुळे क्लबमध्ये प्रवेश घेण्याचे गोडसे यांचे स्वप्न पूर्ण झाले नाही. कॉलेजातदेखील ते गेले नाहीत. एस.एस.सी. झाल्यानंतर लगेचच गोडसे यांनी वयाच्या १९व्या वर्षी कुर्ला येथील प्रिमियर ऑटोमोबाईल कंपनीत नोकरी धरली. तिथे त्यांच्या बॅडमिंटन कारकिर्दीला मोठी कलाटणी मिळाली. मग त्यांनी मागे वळून बघितलं नाही. आपल्या स्पर्धात्मक बॅडमिंटनची त्यांनी काहीशी उशिरा सुरूवात केली. तरीदेखील त्यांनी जिल्हास्तरीयपासून ते अखिल भारतीय, राष्ट्रीय पातळीवरील बऱ्याच स्पर्धा नरेश नार्वेकर यांच्या साथीत जिंकल्या. अगदी बॅडमिंटन विश्वातील प्रतिष्ठेच्या ऑल इंग्लंड बॅडमिंटन स्पर्धेतदेखील वयस्कर गटात गोडसे यांना भारताचे प्रतिनिधीत्व करण्याची संधी मिळाली.

भारताचे महान बॅडमिंटनपटू नंदू नाटेकर गोडसे यांचे दैवत. प्रत्यक्ष नाटेकर यांच्यासोबत दुहेरीत खेळण्याची संधी मिळाल्याबदल गोडसे स्वतःला भाग्यवान समजतात. या जोडीने तेव्हा राज्यात चांगल्याच फॉर्मात असलेल्या गौतम ठक्कर, आसिफ पारपियानी जोडीला नमवण्याचा पराक्रम केला होता. स्पर्धात्मक खेळाला विराम दिल्यानंतर आपण या खेळाचे काहीतरी देणे लागतो या भावनेतून त्यांनी आपला मोर्चा वयाच्या ३५व्या वर्षी प्रशिक्षणाकडे वळवला. अनेक युवा खेळाडूंना त्यांनी प्रशिक्षण दिले. मार्गदर्शन केले. माजी राष्ट्रीय विजेता अमोल शाह, प्रख्यात स्पोर्ट्स मेडिसीन तज्ज्ञ डॉ. आनंद जोशी यांना गोडसे यांचे मार्गदर्शन मिळाले. त्या काळात बॅडमिंटनच्या फार कमी स्पर्धा होत असत. त्यामुळे युवा, होतकरू खेळाडूंना आपली प्रतिभा दाखवण्याची खूप कमी संधी मिळायची. ही गोष्ट गोडसे यांच्या लक्षात आली. या युवा खेळाडूंसाठी काहीतरी करायला हवे याच विचारातुन मग त्यांनी मनोरा बॅडमिंटन अकादमीची स्थापना वयाच्या ५६व्या वर्षी जानेवारी १९९६मध्ये केली.

अॅव्होकेट मंजुळा राव, सीए अशोक राव यांच्या मदतीने या अकादमीचा श्रीगणेशा झाला. सुरूवातीला १०, १३, १६ वर्षांखालील वयोगटातील मुलामुलींसाठी सामने होत असत. आता मात्र वयोगटात बदल झाला असून ९, ११, १३, १५, १७ वर्षांखालील मुलामुलींच्या वयोगटात सामने खेळवण्यात येतात. अकादमीची सुरूवातीपासुन सदस्य फी अवघी ५१ रुपये होती. ती आजतागायत कायम आहे. फक्त स्पर्धा फी प्रत्येकाकडून ५०० रुपये घेतली जाते. १९९७मध्ये झालेल्या पहिल्या मनोरा स्पर्धेत अवघ्या ५२ खेळाडूंचा सहभाग होता. आज हिच सहभागी खेळाडूंची संख्या ५००च्या पुढे गेली आहे. हे अकादमीचे मोठे यश आहे. कोणाची फारशी आर्थिक मदत नसताना, नियमित पुरस्कर्ते नसताना केवळ बॅडमिंटन खेळावरील प्रेमापायी स्वतःच्या खिशाला चाट देऊन मनोहर गोडसे हा मनोराचा डोलारा संभाळत आहेत. कुठल्याही बॅडमिंटन संघटनेकडून आतापर्यंत त्यांनी आर्थिक मदत घेतली नाही. परंतु गौतम आश्रा, महेश मारु, मुलुभाई इर्शद, प्रदिप गंधे, माधव पिट्टी, गौतम ठक्कर, डॉ. रणजीत नागपाल यांचे मोलाचे सहकार्य अकादमीसाठी गोडसे यांना मिळाले. त्याचबरोबर माटुंगा जिमखाना, एन.एस.सी.आय., बाॅम्बे जिमखाना, सीसीआय, विलिंग्डन जिमखाना, नॉर्थ इंडियन असोसिएशन, खार जिमखाना यांनी बऱ्याचवेळा अकादमीच्या स्पर्धांना आपले बॅडमिंटन कोर्ट विनामूल्य उपलब्ध करुन दिले. सुरूवातीला मुंबई शहर, मुंबई उपनगर, ठाणे, नवी मुंबई येथील युवा खेळाडू अकादमीच्या स्पर्धेत भाग घेत असत. परंतु आता राज्यभरातुन खेळाडू या अकादमीच्या स्पर्धेत भाग घेत आहेत. साधारण वर्षाला ४-५ स्पर्धांचे आयोजन अकादमीतर्फे करण्यात येते. या सर्वाचे उत्तम नियोजन गोडसे सर स्वतः जातीनीशी लक्ष घालून करतात. याच स्पर्धेत खेळून जिशनु संन्याल, सुश्रुत करमरकर, भागिरथी शर्मा, अजय जयराम, अक्षय देवळेकर, हर्षील दाणी, सिमरन सिंग, वैष्णवी अय्यर, प्राजक्ता सावंत, तन्वी लाड, अदिती मुटाटकर या खेळाडूंची मजल पुढे राष्ट्रीय स्पर्धेपर्यंत गेली.

भारताचे नामवंत बॅडमिंटनपटू प्रकाश पदुकोण आणि या खेळातील त्यांचे दैवत असलेल्या नंदू नाटेकर यांनी गोडसे यांच्या या उपक्रमाची दखल घेऊन त्यांची पाठ थोपटली आहे. या खेळातील गोडसे यांच्या कार्याची दखल महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, ठाण्याचे माजी खासदार प्रकाश परांजपे, हिंदुस्तान टाईम्स, मनोहर विचारे प्रतिष्ठान, बॅडमिंटन फोर्टी फाईव्ह, जीएमबीए, प्रख्यात बाँम्बे जिमखान्याने गोडसे यांचा खास गौरव केला आहे. ठाणे जिल्हा बॅडमिंटन संघटनेने त्यांना जीवनगौरव पुरस्काराने सन्मानित केले आहे. एस.एस.सी.पर्यंत शिकले असतानादेखील प्रिमियर ऑटोमोबाईलसारख्या मोठ्या कंपनीत गोडसे अकाऊंट ऑफिसरपदापर्यंत पोहोचले. या खेळात आजवर जे काही मिळाले त्याबाबत ते पूर्ण समाधानी आहेत. बॅडमिंटन खेळाने समाजात गोडसे यांना वेगळी ओळख मिळवून दिली. मोठ्या मित्र परिवाराशी ते जोडले गेले. त्यांच्या या खडतर वाटचालीत पत्नी माधवी, चिरंजीव जयंत या दोघांची मोठी साथ मिळाली. एव्हढे मोठे योगदान देऊनदेखील गोडसे यांचे पाय जमिनीवरच आहेत. मितभाषी स्वभाव असणाऱ्या आणि काहीसे कमी बोलणाऱ्या गोडसे यांचा या वयातील उत्साह आजच्या युवा खेळाडूंना लाजवणारा आहे. आपला स्वतःचा एक वेगळा ठसा त्यांनी उमटवला आहे. या खेळातील अनेकांची त्यांच्याविषयी आदरयुक्त भावना आहे. भविष्यात गोडसे यांचा हा बॅडमिंटनचा मनोरा अधिकाधिक उंची गाठेल, अशी आशा करुया.

