ज्येष्ठ क्रीडा समीक्षक विनायक दळवी यांच्या ‘कबड्डीतले किमयागार’, या ग्रंथाच्या दुसऱ्या आवृत्तीचे प्रकाशन माजी केंद्रीय मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेस (शरद्चंद्र पवार) पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांच्या हस्ते मुंबईच्या यशवंतराव चव्हाण केंद्रात नुकतेच संपन्न झाले. या सोहळ्याला ज्येष्ठ पत्रकार कुमार केतकर यांची प्रमुख उपस्थिती लाभली होती.
कबड्डीला ऑलिंपिक खेळामध्ये घेण्यासाठी सर्वार्थाने प्रयत्नशील असलेल्या पवारांनी याप्रसंगी बोलताना या खेळामध्ये जो सावळागोंधळ सुरू आहे त्याविषयी तीव्र नाराजी व्यक्त केली. मला यामध्ये पुन्हा लक्ष घालावे लागेल, असा इशाराच जणू त्यांनी संघटनेतील प्रशासकांना दिला. कबड्डीशी सहा दशकांचे अतूट नाते असणारे क्रीडा क्षेत्रातील पितामह मानल्या जाणाऱ्या पवार यांनी खेळातील समस्यांवर नेमके बोट ठेवत असताना काही लोकांनी चुकीचा मार्ग अवलंबित संघटना आपल्या मुठीतच कशी राहील याची व्यवस्था केली आहे, असे म्हटले. त्यामुळे खेळाडूंवर सातत्याने अन्याय होत आहे. खेळाचा विकास ही सामुदायिक जबाबदारी असताना संघटनेमध्ये केवळ प्रशासकांनी तिला आपल्या ताब्यात ठेवणे अयोग्य असल्याचे मतही त्यांनी व्यक्त केले.
खेळाच्या एकूणच उपेक्षेविषयी भाष्य करताना त्यांनी मातीतल्या माणसाचा हा मातीतला खेळ त्यावरील आक्रमणामुळे कसा दुय्यम झाला आहे, हे सांगितले. कबड्डीतले किमयागार, हे या खेळाचा इतिहास उलगडून दाखवणारे अमूल्य असे पुस्तक नव्या पिढीला प्रोत्साहित करेल अशी आशा पवारांनी व्यक्त केली. संघटक कसे असावेत की ज्यामुळे खेळ लोकांमध्ये व्यापक प्रमाणावर पोहोचावा याची दोन उदाहरणे देताना शंकरराव तथा बुवा साळवी आणि प्रा. रत्नाकर शेट्टी यांचा त्यांनी विशेष उल्लेख केला.

कबड्डी दिनाचे औचित्य साधून आयोजित केलेल्या या सोहळ्यामध्ये आपली भूमिका मांडताना विनायक दळवी म्हणाले की, सुमारे 35 वर्षांपूर्वी हे पुस्तक प्रथम प्रकाशित झाले. त्यामध्ये काही कमतरता असल्याचे नेहमीच जाणवत असे. काही नामवंत खेळाडूंविषयी, विशेष करून विदर्भातील खेळाडूंच्या कथा राहून गेल्या होत्या. त्याकामी विजय जाधव यांची मदत लाभल्याने त्या त्रुटी दूर होऊ शकल्या. या नव्या आवृत्तीमध्ये शरद पवार तसेच वृत्तपत्रांमध्ये कबड्डीला मानाचे स्थान देणारे ज्येष्ठ समीक्षक, क्रीडा समीक्षक आत्माराम मोरे यांच्या अमूल्य योगदानाची दखल घेण्यात आली आहे. माधव गडकरी आणि कुमार केतकर यांनी आपल्याला कबड्डीवर वृत्तांकन करण्यात जो फ्रीहँड दिला त्याबद्दल आपण त्यांचे कायम ऋणी राहो, असे प्रतिपादनही दळवींनी सरतेशेवटी केले.
मी खेळाडूंना कसले मार्गदर्शन करणार? ते माझे काम नाही. कारण, माझी तेवढी योग्यता नाही. मी येथे जमलेल्या खेळाडूंना शुभेच्छा अवश्य देईन, असे कुमार केतकर यांनी आपल्या छोटेखानी भाषणात सांगितले. मी मार्गदर्शन करणे अयोग्य ठरेल, अशी पुस्तीही त्यांनी जोडली. पुस्तकाचे कबड्डीतले किमयागार, हे शीर्षक वाचताना यामध्ये शरद पवार असतील याची जाणीव झाल्याची मार्मिक टिप्पणीही केतकरांनी केली.

या अमूल्य ग्रंथाचे प्रकाशन आत्माराम मोरे प्रतिष्ठान या संस्थेने केले असून याप्रसंगी संस्थेचे अध्यक्ष अश्विनीकुमार मोरे मंचावर उपस्थित होते. शालेय स्तरावर कबड्डी स्पर्धांचे आयोजन करून आम्ही सुरू केलेल्या कार्याची व्याप्ती वाढवून आम्ही ग्रंथ प्रकाशन करू असे वाटले नव्हते असे मत त्यांनी मांडले. या हृद्य सोहळ्याला अर्जुन पुरस्कारप्राप्त सदानंद शेटे, शांताराम जाधव, आशियाई सुवर्णपदकविजेते अशोक शिंदे, राजू भावसार, माया आकरे, बुद्धिबळपटू ग्रँडमास्टर प्रवीण ठिपसे, उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती न्या. अभय ठिपसे यांची उपस्थिती लाभली. एकेकाळी राष्ट्रीय स्तरावर महाराष्ट्राच्या लक्षणीय यशात मोलाचे योगदान देणाऱ्या चित्रा नाबर, शैला रायकर, ग्रेटा डिसोजा, विजू शेलार, जेम्स परेरा, सुनील जाधव, सागर बांदेकर, अशा दिगजांची यावेळी उपस्थिती होती. शरीरसौष्टवपटू आणि दळवींचे बालमित्र विकी गोरक्ष, क्रिकेटचे राष्ट्रीय पंच मार्क्विस कुटिन्हो आवर्जून उपस्थित राहिले. रेल्वेचे कबड्डीपटू राणा तिवारी यांनी सोहळ्याचे सूत्रसंचालन केले. काही खेळाडूंच्या प्रकट मुलाखती त्यांनी घेतल्या आणि उपस्थित कबड्डीप्रेमींना भूतकाळात नेले.