आदिवासी युवा वर्गाने अंमली पदार्थ आणि मादक पदार्थांच्या सेवनापासून दूर राहून देशाचे जबाबदार नागरिक व्हावे, असे आवाहन, सीआरपीएफचे उपमहानिरीक्षक वैभव निंबाळकर यांनी केले आहे. मुंबईत आयोजित पंधराव्या आदिवासी युवा आदान-प्रदान कार्यक्रमाच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. मुंबई विद्यापीठाच्या मराठी भाषा भवनात या कार्यक्रमाचे उद्घाटन झाले. आदिवासी युवा वर्गाने कठोर परिश्रम करून जीवनात यशस्वी व्हावे, अशी अपेक्षाही निंबाळकर यांनी व्यक्त केली.
नेहरू युवा केंद्र संघटनेचे राज्य संचालक प्रकाश कुमार मनुरेही यावेळी उपस्थित होते. या आदान -प्रदान कार्यक्रमामुळे आदिवासी तरुणांचे देशाच्या इतर भागांतील समवयस्क गटांशी भावनिक बंध निर्माण होतील आणि त्यांच्या मनात स्वाभिमानाची भावनाही निर्माण होईल, असे ते यावेळी म्हणाले. मुंबई विद्यापीठाचे कुलसचिव अशोक घुले, ज्येष्ठ समाजसेवक रामकुमार पाल हे मान्यवरही या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.
या कार्यक्रमात विविध विषयांवर मार्गदर्शन सत्रांचे आयोजन करण्यात आले. तसेच श्रमदान शिबिरे, सांस्कृतिक कार्यक्रम, स्वच्छता मोहीम आणि भाषण स्पर्धांचेही आयोजन करण्यात आले.
आठवडाभर चालणाऱ्या या कार्यक्रमात झारखंड राज्यातील गुमला, खुंटी, लातेहार, सेराईकेला-खरसावन, आंध्र प्रदेशातील विशाखापट्टणम, तेलंगणा राज्यातील भद्रादरी आणि बिहार राज्यातील जमुई, लखीसराय या जिल्ह्यांतून एकूण 220 युवा सहभागी होत आहेत.
येत्या 30 ऑक्टोबर रोजी ही युवा मंडळी राजभवनाला भेट देऊन माननीय राज्यपालांशी संवाद साधतील. 31 ऑक्टोबर रोजी विधान भवनाला आणि 01 नोव्हेंबर रोजी तळोजा येथे केंद्रीय राखीव पोलीसांच्या शीघ्र कृती दलाच्या परिसराला भेट देण्याची संधी सहभागींना मिळणार आहे. या उपक्रमांतर्गत सहभागी युवा वर्गाला भारतीय चित्रपट संग्रहालय, गेटवे ऑफ इंडिया, मरीन ड्राइव्ह, जुहू बीच अशा इतर प्रसिद्ध ठिकाणांनाही भेट देता येणार आहे.