शिवसेनेच्या उद्धव ठाकरे गटाचे नंदुरबारमधील विधान परिषदेचे आमदार आमश्या पाडवी यांनी आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत त्यांच्या नंदनवन, या निवासस्थानी शिवसेनेमध्ये प्रवेश केला. यावेळी पाडवी यांच्यासह आदिवासी पारधी क्रांती सेनेचे अध्यक्ष मुकेश साळुंखे आणि 10 महिला सरपंच, 48 पुरुष सरपंच, 2 जिल्हा परिषद सभापती, 2 उपजिल्हाप्रमुख, 4 पंचायत समिती सदस्य आणि एका युवासेना जिल्हाधिकारी आणि असंख्य पदाधिकारी-कार्यकर्त्यांनाही शिवसेनेमध्ये प्रवेश केला.
आमश्या पाडवी यांनी आदिवासीबहुल नंदुरबार जिल्ह्यात आदिवासी समाजासाठी कायम संघर्ष केला. या समाजाला न्याय देण्यासाठी त्यांनी अथक प्रयत्न केले. आज त्यांच्या शिवसेना प्रवेशामुळे या भागातील नागरिकांना दिलासा देणे शक्य होणार आहे. अक्कलकुवा विधानसभा मतदारसंघातून त्यांनी दोनदा विधानसभा निवडणूक लढवली होती. मात्र त्यात त्यांना यश आले नाही. त्यामुळे त्यांनी विधान परिषदेचा मार्ग निवडला. त्यांच्या येण्याने या मागास आणि आदिवासीबहुल भागातील लोकांना न्याय देता येणे शक्य होईल, असे मत मुख्यमंत्री शिंदे यांनी व्यक्त केले.
हा भाग शेतीसंपन्न भाग आहे. कालच राज्यशासनाने कापूस आणि सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी 4 हजार कोटी रुपयांची तरतूद केली. आजवर कुणीही केल्या नाहीत एवढया उपाययोजना शेतकऱ्यांना न्याय देण्यासाठी केल्या. शेतकऱ्यांना 1 रुपयात पीक विमा देणारे आपले पहिले राज्य आहे. नमो शेतकरी सन्मान योजनेद्वारे त्यांच्या खात्यात केंद्र सरकार प्रमाणे राज्यशासनाकडून अजून 6 हजार देण्याचा निर्णय घेतला. राज्यातील शेतकऱ्यांना वेळोवेळी झालेले नुकसान, अतिवृष्टी, गारपीट, अवकाळी पाऊस यातून दिलासा देण्यासाठी तसेच वेगवेगळ्या योजनांद्वारे 45 हजार कोटींची तरतूद केली. माता-भगिनींना न्याय देण्यासाठी बचतगटांना बळ दिले. त्यांच्या भागभांडवलात 50 हजारांनी वाढ केली. महिलांना एसटी प्रवासात 50 टक्के सवलत दिली तसेच मुलींसाठी लेक लाडकी योजना सुरू केल्याचेही मुख्यमंत्र्यांनी सांगितले.
यावेळी शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर, एमएसआरडीसी मंत्री दादाजी भुसे, खासदार भावना गवळी, आमदार संजय शिरसाट, शिवसेना उत्तर महाराष्ट्र सचिव भाऊसाहेब चौधरी उपस्थित होते.