Homeमुंबई स्पेशलसामान्यांच्या लोकल रेल्वे...

सामान्यांच्या लोकल रेल्वे प्रवासासाठी उद्यापासून पडताळणी!

येत्या १५ ऑगस्टपासून कोविड प्रतिबंधक लसीचे दोन डोस घेतलेल्या प्रवाशांना रेल्वे लोकलच्या प्रवासाला मुभा देण्याचा निर्णय जाहीर झाल्यानंतर आता नागरिकांना मासिक रेल्वे प्रवास पास मिळावा, यासाठी कोविड लसीकरण पूर्ण झाल्याची ऑफलाईन पडताळणी प्रक्रिया उद्या बुधवार, ११ ऑगस्टपासून मुंबई महापालिका क्षेत्रातील एकूण ५३ रेल्वेस्थानकांवर तर संपूर्ण मुंबई महानगर प्रदेशात (एमएमआर रिजन) १०९ स्थानकांवर सकाळी ७ ते रात्री ११ वाजेपर्यंत सलग दोन सत्रांमध्ये सुरू होणार आहे. त्याआधारे नागरिकांना मासिक रेल्वे प्रवासाचा पास रेल्वेकडून देण्यात येईल, अशी माहिती महापालिका आयुक्त इकबाल सिंह चहल यांनी दिली.

सर्वसामान्यांना उपनगरीय रेल्वे प्रवास करता यावा यासाठी उद्या ११ ऑगस्टला सकाळी ७ वाजल्यापासून उपनगरीय रेल्वेस्थानकांवर कोविड लसीकरण ऑफलाईन पडताळणी व मासिक रेल्वे पास प्रक्रिया सुरू होणार आहे. नागरिकांनी पडताळणीसाठी येताना कोविड लसीकरणाचा दुसरा डोस घेऊन १४ दिवस पूर्ण केल्याचे प्रमाणपत्र व छायाचित्र ओळखपत्र पुरावा नेणे आवश्यक आहे. पडताळणीमध्ये पात्र ठरलेल्यांना १५ ऑगस्टपासून प्रवासाची मुभा असेल. मुंबई महापालिका क्षेत्रात ५३ रेल्वेस्थानकांवर ३५८ मदत कक्ष उघडणार आहेत. संपूर्ण मुंबई महानगर प्रदेशात एकूण १०९ स्थानकांवर मदत कक्ष उघडण्यात येतील. सकाळी ७ ते रात्री ११ वाजेपर्यंत सलग दोन सत्रांमध्ये कक्ष कार्यरत राहणार आहे.

नागरिकांनी घरानजीकच्या रेल्वेस्थानकांवर पडताळणीसाठी जावे, मात्र विनाकारण गर्दी करू नये. बनावट कोविड प्रमाणपत्र आढळल्यास होणार कठोर पोलीस कारवाई केली जाईल, असा इशाराही चहल यांनी दिला आहे.

ज्यांनी कोविड प्रतिबंधक लसीचे दोन्ही मात्रा घेतल्या आहेत, त्यांना मुंबईतील उपनगरीय रेल्वेमधून प्रवास करण्याची मुभा द्यावी, अशी सातत्याने मागणी होत होती. त्याची दखल घेत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी रेल्वे प्रवासाबाबतचा निर्णय जाहीर केला. त्यासाठी ऑनलाईन ऍपद्वारे तसेच ऑफलाईन अशा दोन्ही रितीने सुविधा पुरवली जाणार आहे. ऍप तयार करून ऑनलाईन प्रक्रिया सुरू करण्याची कार्यवाही काही कालावधीत सुरु होईल. तत्पूर्वी उद्यापासून ऑफलाईन प्रक्रिया सुरू करण्यात येत आहे, असे ते म्हणाले.

रेल्वे

रेल्वे मासिक प्रवास पास देण्याची ही ऑफलाईन प्रक्रिया पुढील आदेश येईपर्यंत आणि आठवड्यातील सर्व दिवशी निरंतर सुरू राहणार आहे.

ही रेल्वे पास देण्याची प्रक्रिया नेमकी अशी असेल…

१. मुंबई महापालिका क्षेत्रामध्ये एकूण ५३ उपनगरीय रेल्वेस्थानकांवर ऑफलाईन पडताळणी प्रक्रिया सुरू करण्यात येणार आहे. यामध्ये मध्य, पश्चिम आणि हार्बर मार्गावरील स्थानकांचादेखील समावेश आहे. या सर्व स्थानकांवर मिळून तिकिट खिडकीनजीक ३५८ मदत कक्ष असतील.

२. मुंबई महानगरासह आजुबाजूची सर्व शहरे मिळून म्हणजे संपूर्ण मुंबई महानगर प्रदेशात (एमएमआर रिजन) एकूण १०९ लोकल रेल्वेस्थानकांवर ही ऑफलाईन पडताळणी सुविधा उपलब्ध असेल.

३. ज्या नागरिकांनी कोविड प्रतिबंधक लसीची दुसरी मात्रा घेतल्यानंतर १४ दिवस पूर्ण झाले आहेत, अशा नागरिकांनी दुसरा डोस घेतल्याच्या वैध प्रमाणपत्राची प्रत (हार्ड कॉपी), त्यासोबत छायाचित्र ओळखपत्र पुरावा असे दोन्ही दस्तावेज सोबत घेऊन घरानजीकच्या रेल्वेस्थानकावर जावे. हे दोन्ही किंवा यातील एक कागदपत्र जरी नसेल, तरी रेल्वेस्थानकावर, रेल्वे प्रशासनाकडून प्रवेश नाकारण्यात येईल.

४. रेल्वेस्थानकावरील तिकिट खिडकीजवळ आल्यानंतर, तेथे मुंबई महापालिका (अथवा संबंधित महापालिका/नगरपरिषद/स्थानिक स्वराज्य संस्था) यांच्याद्वारे स्थापन केलेले मदत कक्ष (हेल्प डेस्क) असतील. हे मदत कक्ष सकाळी ७ ते दुपारी ३ आणि दुपारी ३ ते रात्री ११ अशा सलग दोन सत्रांमध्ये सुरू राहतील.

५. मदत कक्षावरील पालिकेचे कर्मचारी (किंवा संबंधित स्थानिक स्वराज्य संस्थेचे कर्मचारी) संबंधित नागरिकाच्या कोविड लसीकरण अंतिम प्रमाणपत्राची (फायनल व्हॅक्सिनेशन सर्टिफिकेट – दुसरा डोस) वैधता कोविन ऍपवर तपासतील. छायाचित्र ओळखपत्र पुरावादेखील तपासतील. पडताळणीमध्ये दोन्ही कागदपत्रं वैध असल्याचे निश्चित झाल्यानंतर, कोविड प्रमाणपत्रासह छायाचित्र ओळख पुराव्याच्या प्रतीवरदेखील विहित नमुन्यातील शिक्का मारण्यात येईल.

६. सदर शिक्का मारलेले कोविड अंतिम प्रमाणपत्र रेल्वेस्थानकावरील तिकिट खिडकीवर सादर करावे. त्यानुसार रेल्वे प्रशासनाकडून मासिक रेल्वे प्रवास पास देण्यात येईल. मात्र, सदर पास आधारीत प्रवासाची सुविधा १५ ऑगस्ट २०२१ पासूनच वैध असेल. त्यापूर्वी नाही.

७. कोविड लसीचा एकही डोस न घेतलेल्या किंवा फक्त एकच डोस घेतला असल्यास, अशा नागरिकांना सद्यस्थितीत उपनगरीय रेल्वे प्रवासाची मुभा नसेल.

८. मुंबई महानगर तसेच मुंबई प्रदेशातील लोकसंख्या लक्षात घेऊन उपनगरीय रेल्वेस्थानकांवर जेवढ्या तिकिट खिडक्या असतील, तेवढ्याच संख्येने मदत कक्षदेखील असतील. तसेच सकाळी ७ ते रात्री ११ अशी तब्बल १६ तास पडताळणी सुविधा सुरू राहणार आहे. त्यामुळे पात्र नागरिकांनी घरानजीकच्या रेल्वेस्थानकांवर जावे. मात्र विनाकारण गर्दी करू नये, असे आवाहन करण्यात आले आहे.

९. जर कोणीही बनावट कोविड लसीकरण प्रमाणपत्र आणण्याचा प्रयत्न केला, तर अशा व्यक्तिंविरुद्ध साथरोग नियंत्रण कायदा / आपत्कालीन व्यवस्थापन कायदा / भारतीय दंडविधान संहिता यानुसार कठोर पोलीस कार्यवाही करण्यात येईल, याची सक्त नोंद घ्यावी, असेही प्रशासनाकडून कळविण्यात आले आहे.

११. मुंबई महानगर प्रदेशातील इतर सर्व महानगरपालिका / नगरपरिषद / स्थानिक स्वराज्य संस्था यांनाही याचप्रकारे उद्यापासून व्यवस्था करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. त्यामुळे त्या-त्या भागातील रहिवाशांनी नजीकच्या रेल्वे स्थानकावर जावून वैध प्रक्रिया पार पाडावी.

१२. शासनाकडून ऑनलाईन प्रक्रिया उपलब्ध करण्याची कार्यवाही सुरू आहे. तथापि, त्यास आणखी काही कालावधी अपेक्षित आहे. त्यामुळे पुढील आदेश येईपर्यंत ऑफलाईन प्रक्रिया सुरू राहणार आहे. ऑनलाईन प्रक्रिया सुरु झाल्यानंतर, मासिक पास प्राप्त करणे अतिशय सुलभ होणार आहे. ती व्यवस्थादेखील पुढील आदेश येईपर्यंत सुरू राहील. 

Continue reading

निसर्ग वाचवण्यासाठी अनेक हातांची गरज!

देवराई म्हणजे देवाच्या नावाने राखून ठेवलेल्या जंगलाचाही विपर्यास होत आहे. झाडे, नद्या आणि निसर्ग वाचवण्यासाठी अनेक हातांची गरज आहे, असे मत प्रसिद्ध अभिनेते सयाजी शिंदे यांनी निसर्ग अभ्यासक श्रीरंग फडके लिखित 'रानसावल्या' या पुस्तकाच्या प्रकाशन समारंभात व्यक्त केले. निसर्ग...

पंतप्रधान मोदींनी घेतला डोमगावच्या हुरड्याचा आस्वाद!

भारत व फ्रांसमधले संबंध एका वेगळ्या उंचीवर नेणारा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा मुंबई दौरा नुकताच झाला. या दौऱ्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी तसेच फ्रांसचे अध्यक्ष इम्यॅन्युएल मॅक्रॉन यांचे शिष्टमंडळ लोकभवनमध्ये उतरले होते. या दौऱ्यात लोकभवनातर्फे पंतप्रधानांच्या पाहुणचाराला अस्सल मराठी...

टिपू सुलतानप्रकरणी काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षांची दिलगिरी

भारतीय जनता पार्टीने माझ्या विधानातील एका शब्दाचा संदर्भ तोडून जाणीवपूर्वक विपर्यास केला. सोशल मीडियावर दिशाभूल करणाऱ्या मोहिमा चालवल्या. मी जे बोललोच नाही ते माझ्या तोंडी घातले आणि टीपू सुलतानची छत्रपती शिवाजी महाराजांशी तुलना केल्याचा चुकीचा समज निर्माण केला आला. भाजपा...
Skip to content