भारत-
संयुक्त उपग्रहाच्या प्रस्तावावर चर्चा करण्यासाठी मॉरीशसचे माहिती तंत्रज्ञान, दळणवळण आणि नवोन्मेष (एमआयटीसीआय) मंत्री दर्शानंद दीपक बाल्गोबीन यांच्या नेतृत्त्वाखालील उच्चस्तरीय प्रतिनिधीमंडळाने नवी दिल्लीत येथे केंद्रीय अवकाश राज्यमंत्री डॉ. जितेंद्र सिंह यांची नुकतीच भेट घेतली. या भेटीदरम्यान दोन्ही मंत्र्यांनी मॉरीशसमध्ये उभारलेल्या इस्रोच्या ग्राउंड स्टेशनच्या व्याप्तीचा विस्तार करून त्यात युरोपियन अवकाश संस्थेसह इतर त्रयस्थ मोहिमांचा समावेश करण्याबाबत संमती दर्शवली. तसेच, अशा प्रकारच्या सहयोगी संबंधांच्या सुरळीत स्थापनेसाठी सध्या अस्तित्त्वात असलेल्या सामंजस्य करारातील सुधारणेवर स्वाक्षऱ्या करण्यालादेखील त्यांनी मान्यता दिली. त्रयस्थ मोहिमांना पाठबळ देण्यासाठी मॉरीशसमध्ये उभारलेल्या इस्रोच्या भौगोलिक केंद्राचा वापर करू देण्याबाबतदेखील भारत आणि मॉरीशस यांनी संमती दर्शवली.
मॉरीशसचे मंत्री बाल्गोबीन यांनी याआधी म्हणजे 17 ऑगस्ट 2023 रोजी बेंगळूरू येथील इस्रोच्या केंद्राला भेट दिली. या भेटीदरम्यान इस्रोच्या अधिकाऱ्यांनी भारत-मॉरीशस संयुक्त उपग्रहासंदर्भातील तांत्रिक तपशील तसेच या उपग्रहाच्या उपयुक्ततेच्या क्षमता यांची माहिती बाल्गोबीन यांना दिली. उपग्रहांचा तसेच प्रक्षेपकांचा मागोवा घेण्यासाठी गेल्या 3 दशकांहून अधिक काळ मॉरीशस येथे इस्रोचे हे केंद्र कार्यरत आहे. सध्या या केंद्रामध्ये दोन अँटेना (11 मीटर व्यास असलेल्या) सतत कार्यरत असून त्यांचे संचालन मॉरीशसमधून केले जाते.
केंद्रीय मंत्री डॉ. जितेंद्र सिंह आणि बाल्गोबीन यांनी अवकाश क्षेत्रातील सहकार्यासारख्या मुद्द्यांवरदेखील चर्चा केली, त्यासाठी त्यांनी उपग्रहाकडून मिळालेली पृथ्वीच्या निरीक्षणाशी संबंधित माहिती; उपग्रहाने पुरवलेली माहिती, भूअवकाशीय स्तर तसेच मॉरीशसशी संबंधित मूल्यवर्धित सेवा यांच्यासह ‘भारत-मॉरीशस अवकाश पोर्टल’चे विकसन; अवकाश क्षेत्रातील उद्योगांच्या पातळीवर सहयोगी संबंध स्थापन करण्यासाठी चर्चांना सुरुवात करणे यावर विचारविनिमय केला.