Homeटॉप स्टोरीकाकांना सांगतोय रिटायर...

काकांना सांगतोय रिटायर व्हा, पण ऐकतंच नाहीत…

काकांना मी सांगतोय की तुम्ही रिटायर व्हा, घरी बसा आणि आराम करा.. पण ऐकतच नाहीत, अशा शब्दांत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी टिप्पणी केली आणि आपण आईवडिलांची विचारपूस न करता परदेशात स्थायिक होणाऱ्या आजच्या कार्ट्यांसारखे नाही, हे स्पष्ट केले.

नागपूरमध्ये पत्रकारांशी अनौपचारिक गप्पा मारताना राज्याचे अर्थमंत्रीही असलेल्या अजित पवारांनी पेन्शन योजनेबद्दलही मत व्यक्त केले. जुनी पेन्शन योजना रद्द करण्याचे मत केवळ उपमुख्यमंत्री देवेन्द्र फडणवीस यांनीच व्यक्त केले होते, असे नाही तर मीही ते केले होते, असे पवार यांनी सांगितले. पण, यासंदर्भातील सचिवांच्या समितीने अहवाल दिला आहे आणि त्यानुसार निर्णय घेऊ. निवृत्तीवेतनाची गरज स्पष्ट करताना अजित पवार म्हणाले की, हल्लीची कार्टी आणि कार्ट्या आपल्या आईवडिलांना वाऱ्यावर सोडून देतात आणि परदेशात स्थायिक होतात. त्यामुळे पेन्शन ही गरज आहेच. कारण त्यांच्याकडे बघणारं कोणी नसतं.

त्यावर तुम्ही नाही का तुमच्या काकांना सोडून गेलात आणि त्यांच्यावर ८२व्या वर्षी कांदा प्रश्नावर रस्त्यावर उतचरून आंदोलन करायची वेळ आणलीत, असे विचारले असता अजित पवार उत्तरले की, अहो मी काकांना सांगतोय की रिटायर व्हा, घरी बसा आणि आराम करा. पण ते माझं ऐकतच नाही तर मी काय करू…

त्यांच्या उत्तरावर पत्रकारांच्या सुयोग निवासस्थानी एकच हंशा उसळला. अजित पवारांनी असेच उत्तर देताना एका शिवीचा वापर स्वतःसाठीच केला. तुम्ही आणि शरद पवार, सुप्रिया सुळे भेटता आणि दोघांचीही पोस्टर्स लागतात. पण तुम्ही भाजपाबरोबर गेलात. त्यामुळे लोकांमधे संभ्रम होतो की तुम्ही सगळे एकत्रच आहात, यावर उत्तर देताना अजित पवार म्हणाले की, अरे बाबा, राजकारण वेगळं आणि नाती वेगळी… आता राजकारणात काही भूमिका घेतली तर नाती सोडून देतात का… मग आम्ही नातेवाईक भेटलो की तुमचे टीव्हीवाले काहीपण विचारतात आणि म्हणतात की तुम्ही दोघं महाराष्ट्राला चुत्या बनवताय… हंशा उसळल्यावर अजित पवारांना आपण वापरलेल्या शब्दाची जाणीव झाली आणि ते पटकन म्हणाले की, हा शब्द माझा नाही संजय राऊत आणि प्रसाद लाड यांचा आहे… यावर पुन्हा हंशा उसळला.

अर्थव्यवस्थेच्या विकासासाठी मोठे लक्ष्य ठेवायला पाहिजे, हे सांगताना त्यांना विचारले की तुमचेही लक्ष्य मोठेच आहे का आणि तुम्हाला मुख्यमंत्री व्हायचेय की पंतप्रधान… त्यावर नाही नाही म्हणत अजित पवारांनी हात जोडले आणि ते म्हणाले की, फक्त मुख्यमंत्रीच व्हायचेय. तुमचे कार्यकर्ते तुमचे फ्लेक्स लावून त्यावर भावी मुख्यमंत्री असे लिहितात, त्यावर अजित पवार ठणकावून सांगत म्हणाले की, मला १४५ आमदारांचा पाठिंबा मिळाला की मी मुख्यमंत्री होणार…

पृथ्वीराज चव्हाण मुख्यमंत्री असताना कॉँग्रेसकडून मुख्यमंत्री बदलाचा प्रस्ताव आला होता, असा गौप्यस्फोट अजित पवारांनी केला. त्या काळात कॉँग्रेस आणि राष्ट्रवादी यांच्यातील संबंध ताणले गेले होते. त्यामुळे राष्ट्रवादी कॉँग्रेस सत्तेत असूनही एक नंबरचा शत्रू झाला होता, असे सांगून ते म्हणाले की, त्या काळात नवी दिल्लीतील कॉँग्रेस हायकमांडकडून मुख्यमंत्री बदलाचा प्रस्ताव आला होता. त्यामध्ये राधाकृष्ण विखे-पाटील, बाळासाहेब थोरात आणि हर्षवर्धन पाटील यांचे पर्याय पृथ्वीराज चव्हाण यांच्याऐवजी कॉँग्रेस हायकमांडने सुचवले होते. पण, तो प्रस्ताव बारगळला आणि प्रस्ताव आल्यानंतर मी शरद पवारसाहेबांना सांगितले होते की आपण यात नाव निवडण्याचा प्रश्न नाही कारण कोणाला करायचे, हा कॉँग्रेसचा प्रश्न आहे. मी त्यावेळी उपमुख्यमंत्री होतो आणि राष्ट्रवादीचा उपमुख्यमंत्री आपणच ठरवतो तर मुख्यमंत्री कोण असावा हे कॉँग्रेसलाच ठरवू द्यावे, हे मी सांगितले होते.

अजित पवार यांनी अनेक विषयांवर सविस्तर उत्तरे दिली आणि तुम्ही दबावाखाली आहात का, असे विचारताच तुम्हाला मी दबावाखाली आहे असे दिसतेय का, असा प्रतिप्रश्न त्यांनी केला. मी कधीही दबावाखाली वगैरे येत नाही आणि मला कोणताही निर्णय घेण्यासाठी कुणाला विचारावे लागत नाही, असेही त्यांनी सांगितले. एकदा जबाबदारी घेतली की जाऊन वरिष्ठांना विचारायचे की हे करू का किंवा ते करू का, असले मी करत नाही. मी निर्णय घेतो आणि काम करतो.   

Continue reading

आव्हाड, पडळकरांचे वागणे आठवीतल्या मुलांनाही लाजवणारे…

मी उद्धव ठाकरे यांना सत्ताधारी बाजूला यायचे आहे का, असे लायटर व्हेनमध्ये विचारले होते आणि तुम्ही.. तुम्ही लोकांनी त्याची हेडलाईन करून टाकली, अशा शब्दांत मुख्यमंत्री देवेन्द्र फडणवीस यांनी आपली कैफियत मांडली तर याच विषयावर उद्धव ठाकरे यांना माध्यमांनी प्रश्न...

दिनोने तोंड उघडले तर अनेकांचा मोरया…

कामं देताना यांना दिनू मोरे दिसला नाही, पण दिनो मोरिया दिसला आणि आता त्या दिनोने तोंड उघडले तर अनेकांचा मोरया होईल, अशा शब्दांत उपमुख्यमंत्री एकनाथ शिन्दे यांनी आज विधानसभेत शिवसेना (उबाठा)वर टीका केली. कोरोना काळात कापड दुकानदार आणि हॉटेलवाल्याला...

व्हेरिफिकेशनसाठीचे अर्थपूर्ण कागद…

पडताळणी किंवा व्हेरिफिकेशनची प्रमाणित कार्यपद्धती म्हणजेच स्टँण्डर्ड ऑपरेटिंग प्रोसिजर अस्तित्त्वात असली तरी काही विशिष्ट कागदपत्रे दिल्यानंतर ही पडताळणी कशी वेगाने होते, हे सर्वांना माहीत आहे, अशी टिप्पणी शिवसेना (उबाठा)चे आमदार सुनील प्रभू यांनी आज विधानसभेत केली आणि संपूर्ण सभागृह...
Skip to content