लोकपरंपरेत अनेक स्थित्यंतरे आली आणि गेली. अनेक मर्यादा ओलांडून त्यांनी आपली कूस बदलली. कारण ह्या वैश्विक कला आहेत. कालानुरूप असे बदल होत राहतील,अशा स्पष्ट शब्दांत लोककला अभ्यासकांनी एका परिसंवादात आपले निरीक्षण नोंदविले. आजमितीला तमाशा जरी बदललेला दिसला, तरी त्याने आपला मूळ स्वभाव सोडला नाही. त्याचे स्वरूपही बदलले नाही, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.
महाराष्ट्राच्या सांस्कृतिक कार्य संचालनालय आयोजित आणि मुंबई विद्यापीठाच्या लोककला अकादमीच्या सहयोगाने कलिना येथील मुंबई विद्यापीठात “आधुनिक तमाशाची जडणघडण” या विषयावर लोककलेचे अभ्यासक प्रा. डॉ. प्रकाश खांडगे यांच्या अध्यक्षतेखाली नुकतेच विशेष चर्चासत्र आयोजित करण्यात आले होते. या चर्चासत्रात लोककला अकादमीचे विभागप्रमुख प्रा. डॉ. गणेश चंदनशिवे, अकॅडमी ऑफ थिएटर आर्टसचे प्रा. डॉ. मंगेश बनसोड, ज्येष्ठ पत्रकार खंडूराज गायकवाड सहभागी झाले होते. डॉ. मोनिका ठक्कर यांनी या चर्चासत्राचे सूत्रसंचालन केले.

जडणघडण म्हणजे काही तरी घडलेले असते. तमाशात एकाचवेळी गण गौळण बतावाणी, वगनाट्यं दाखविली जातात. तमाशात सामाजिक, ऐतिहासिक, पौराणिक, रजवाडी वगनाट्यं दाखविली जातात. त्यामध्ये विविधता असते. या कलेत सतत बदल होत असतात. तरी तमाशाने कधी ही आपले मूळ स्वरूप बदलेले नाही. मात्र कालांतराने या लोककलेला अनेक मर्यादा ओलांडाव्या लागल्या. कारण ह्या वैश्विक कला आहेत. या कलेमध्ये आव्हानं स्वीकारण्याचे सामर्थ्य आहे,असे मत डॉ. खांडगे यांनी व्यक्त केले.
आधुनिक तमाशाची जडणघडण, या विषयावर बोलताना प्रा. डॉ. गणेश चंदनशिवे यांनी विविध विषयाला हात घालून तमाशाची सुरुवातीपासूनच्या परंपरेची माहिती दिली. जेव्हाजेव्हा स्थित्यंतरे आली, तेव्हातेव्हा तमाशाने आपली कूस बदललेली आहे. प्रत्येक चळवळीत तमाशाने समजाला साथ दिली. मग ते लोकनाट्य माध्यमातून असो की वगनाट्यातून. सुरुवातीला तमाशाचे स्वरूप ओबडधोबड होते. विधीनाट्यातून तमाशाचा जन्म झाला. आख्यानातून तमाशा सादर केला जायचा. तमाशाचा उल्लेख अनेक संतांच्या लेखणीतून आला. पारशी, अरबी, उर्दू भाषेमध्येही तमाशाचा उल्लेख आहे. तमाशाने वगातून समाजप्रबोधन केले एव्हढी लेखणीत ताकद असायची. मात्र अलीकडे लिहिणारा माणूस सापडत नाही. त्यामुळे तमाशाचे बलस्थान हरवत चालले की काय? याची चिंता वाटू लागली असल्याचे ते म्हणाले.

तमाशाला अडीचशे ते तीनशे वर्षांची परंपरा आहे. अनेक टप्प्यात तमाशात बदल होत गेलेत. मात्र सध्याच्या तमाशावर चित्रपटांचा प्रभाव पडला आहे. त्यामुळे तमाशाचे मूळ अस्सल बीज कोमजले आहे. काळानुरूप बदल होत राहतील. पण गणगौळण वगनाट्यासारखी परंपरा जपली पाहिजे, अशी अपेक्षा डॉ. मंगेश बनसोड यांनी व्यक्त केली. यावेळी त्यांनी युरोपमध्ये एका लोककलेच्या सेमिनारमध्ये भारताचे प्रतिनिधित्व करताना काही मजेशीर आठवणीही सांगितल्या. आम्ही युरोपमध्ये 36 देशातील विदयार्थ्यांसमोर इंग्रजीतून गण साजरा केला. बतावणी इंग्रजीतून केली. तीन दिवसांत गणगौळण बतावणी इंग्रजीतून सादर करणे सोपे काम नव्हते. पण ते आव्हान आम्ही स्वीकारले होते. कलेची वर्तमानाची नाळ जोडताना, कलावंतांनी पारंपारिकता जपली पाहिजे, असा सल्लाही त्यांनी दिला.
पाश्चात्य संस्कृतीमुळे तमाशाचे विद्रुपीकरण होऊ नये. सध्या तमाशात चित्रपटाची गाणी सादर केली जातात. जवळजवळ आता वगनाट्यं सादर केली जात नाहीत. मात्र कितीही सामाजिक संकटं आली तरी तमाशा कलावंतांनी आपले मूळ स्वरूप हरवू देऊ नये. असे मत खंडूराज गायकवाड यांनी व्यक्त केले.
लोककला अकादमीचे सहयोगी प्राध्यापक डॉ. शिवाजी वाघमारे यांनी शिलकार गाऊन वातावरण तमाशामय केले. परिसंवादाच्या शेवटी अकादमीच्या विद्यार्थ्यांनी सुंदर असा गण गाऊन कलारसिकांच्या टाळ्या मिळविल्या.