Friday, March 14, 2025
Homeबॅक पेजसुशीलकुमार शिंदे आणि...

सुशीलकुमार शिंदे आणि राम नाईक एकाच मंचावर!

कॉ. गुलाबराव गणाचार्य यांनी कधीही मनभेदाचे राजकारण केले नाही. त्यामुळेच त्यांना आजही आदराचे स्थान आहे. त्याचांच वारसा घेत अनिल गणाचार्य यांनी कार्य करताना आलेले अनुभव चरित्ररुपाने सादर केले आहे. यात साहित्यिक अंलकारिकपण न आणता थेट अनुभवातून किंवा प्रसंगातून ते मांडल्यामुळे वाचकांना तसेच सामाजिक, राजकीय आणि कामगार चळवळीतील कार्यकर्त्यांना महत्त्वपूर्ण मार्गदर्शन मिळणार आहे, असे विचार माजी केंद्रीय मंत्री आणि राज्यपाल सुशीलकुमार शिंदे यांनी व्यक्त केले.

कॉ. गुलाबराव गणाचार्य स्मारक व धर्मादाय विश्वस्त संस्था तसेच ग्रंथाली यांच्या संयुक्त विद्यमाने मुंबईत दादर पूर्व येथील योगी सभागृहात झालेल्या कार्यक्रमात ते बोलत होते. कॉ. गुलाबराव गणाचार्य यांच्या ५०व्या स्मृतीदिनाचे औचित्य साधून त्यांचे सुपुत्र व कामगार नेते अनिल गणाचार्य यांच्या `मी अनिल गणाचार्य’ या ज्येष्ठ पत्रकार अशोक शिंदे यांनी शब्दबद्ध केलेल्या चरित्राचे शानदार प्रकाशन करण्यात आले. यावेळी माजी केंद्रीय मंत्री व राज्यपाल राम नाईक आणि सुशीलकुमार शिंदे ह्या दोन वेगवेगळ्या पक्षातील दिग्गजांना एकाच व्यासपीठावर आणण्याची किमया अनिल गणाचार्य ह्यांनी साधली. व्यासपीठावर यावेळी आमदार प्रसाद लाड, कामगार नेते विश्वास उटगी, महेंद्र घरत, मुंबई मराठी पत्रकार संघाचे अध्यक्ष नरेंद्र वाबळे, भारतीय जनता पार्टीच्या महिला प्रदेशाध्यक्षा चित्रा वाघ, माजी नगरसेवक उपेंद्र दोशी व सुनील गणाचार्य, ग्रंथालीचे सुदेश हिंगलासपूरकर व धनश्री धारप तसेच विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.

कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे आणि उत्तर प्रदेशचे माजी राज्यपाल राम नाईक यांनी कामगार, समाजकारण क्षेत्रात निरपेक्ष वृत्तीने काम करणाऱ्या लोकप्रतिनिधींमध्ये कॉ. गुलाबराव गणाचार्य अग्रस्थानी आहेत, असे सांगितले. केरमाणी चाळीत सर्वसामान्यांप्रमाणे त्यांच्यात राहून त्यांनी समाजासाठी कार्य केले. त्यांचाच वारसा अनिल गणाचार्य आणि त्यांच्या सुपुत्रांनी पुढे नेला. ‘मी अनिल गणाचार्य’ या पुस्तकाची निर्मिती झाली असली तर अजून बरेच कार्य त्यांच्याकडून भविष्यात होणार आहे. त्यामुळे भविष्यात दुसरी आवृत्ती प्रकाशित करताना त्यात अधिक अनुभव आणि प्रसंग असावेत. त्याचबरोबर इतर भारतीय भाषांमध्येही ते अनुवादीत झाले तर या कामगार चळवळींचा तसेच समाजकारणाचा इतिहास अधिकाधिक भारतीयांपर्यंत पोहोचू शकेल, असेही त्यांनी सांगितले.

कामगार नेते विश्वास उटगी यांनी कामगारवर्गाची बदललेली परिस्थिती विशद केली तसेच कामगार नेत्यांनाही पारंपरिक चळवळींपेक्षा बदलत्या परिस्थितीनुसाच कार्यकक्षा ठरवता आली पाहिजे, असे मत मांडले. पत्रकारितेच्या निमित्ताने अनिल गणाचार्य यांच्या कामगार चळवळीतले कार्य जवळून अनुभवता आल्याचे मुंबई मराठी पत्रकार संघाचे अध्यक्ष नरेंद्र वाबळे यांनी सांगितले. कामगार नेते, आमदार प्रसाद लाड यांनी अनिल गणाचार्य यांच्या विविध आस्थापनांमधील संघर्षाचा तसेच हजारो कामगारांच्या न्याय्यहक्कांविषयी केलेल्या कार्याचा आढावा घेतला तसेच विविध प्रसंगदेखील सांगितले. कामगार नेते भाई जगताप यांच्या संदेशाचे यावेळी वाचन करण्यात आले. कामगार नेते महेंद्र घरत यांनी अनिल गणाचार्य यांच्य कामगारविषयक कार्याचा आणि चळवळीविषयी विचार व्यक्त केले.

आपले मनोगत व्यक्त करताना अनिल गणाचार्य यांनी सांगितले की, आपल्या आठवणींचा उपयोग येणाऱ्या पिढीला मार्गदर्शक म्हणून व्हावा, यासाठी चरित्र लिहण्याचा निर्णय घेतला. यातून कामगार चळवळी, समाजकारण यांचा इतिहासदेखील त्यांना अवगत करून देण्याची भूमिका ठेवली होती. माजी नगरसेवक उपेंद्र दोशी यांनी समयोचित भाषणातून कॉ. गुलाबराव गणाचार्य तसेच अनिल गणाचार्य यांच्या समाजकारणविषयी आपले विचार व्यक्त केले. प्रास्ताविकात बोलताना सुनिल गणाचार्य यांनी कॉ. गुलाबराव गणाचार्य यांच्याविषयी तसेच पुस्तकाविषयी माहिती दिली. ग्रंथालीच्या वतीने या पुस्तकाच्या निर्मितीमागची भूमिका सुदेश हिंगलासपूरकर यांनी सांगितले तसेच ग्रंथालीच्या ५०व्या वर्षात हा योग जुळून आल्याचाही त्यांनी उल्लेख केला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अश्विनी भोईर यांनी केले तर आभार रुपाली अनिल गणाचार्य-बरुआ यांनी मानले.

Continue reading

‘शातिर..’मधून अभिनेत्री रेश्मा वायकर करणार पदार्पण

मराठी चित्रपटसृष्टीत सध्या महिलाप्रधान चित्रपटाला चांगले दिवस आल्याचे दिसते. मात्र मराठीत महिलाप्रधान सस्पेन्स थ्रिलर प्रकारातील चित्रपटांचा अभाव आहे. आज जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून श्रीयांस आर्ट्स अँड मोशन पिक्चर्सच्या वतीने ‘शातिर THE BEGINNING’ या सस्पेन्स थ्रीलर चित्रपटाची घोषणा करण्यात आली असून या...

कुर्ल्यातल्या कबड्डी स्पर्धेत अंबिका, पंढरीनाथ संघांची बाजी

शिवजयंती उत्सवाचे औचित्य साधून मुंबईतल्या कुर्ला (पश्चिम) येथील गांधी मैदानात जय शंकर चौक क्रीडा मंडळ आणि गौरीशंकर क्रीडा मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने मुंबई उपनगर कबड्डी असोसिएशनच्या मान्यतेने आयोजित पुरुष गटाच्या कबड्डी स्पर्धेत प्रथम श्रेणी गटात अंबिका सेवा मंडळ, कुर्ला...

‘स्वामी समर्थ श्री’साठी राज्यातील दिग्गज उद्या आमनेसामने

क्रीडा क्षेत्रात आपली वेगळी ओळख निर्माण केलेल्या स्वामी समर्थ क्रीडा मंडळाच्या "स्वामी समर्थ श्री" राज्यस्तरीय शरीरसौष्ठव स्पर्धेच्या माध्यमातून मुंबईकर शरीरसौष्ठवप्रेमींना जानदार, शानदार आणि पीळदार शरीरसौष्ठवपटूंचे ग्लॅमर पाहायला मिळणार आहे. आमदार महेश सावंत यांच्या आयोजनाखाली मुंबईच्या प्रभादेवीत दै. सामना मार्गाशेजारील...
Skip to content