मुंबईच्या सूर्यवंशी क्षत्रिय ज्ञाती समाजाच्यावतीने सीझन क्रिकेटची एस के सी एल टी-२० स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. या लीगमध्ये सहा संघ भाग घेत आहेत. 18 नोव्हेंबरला या स्पर्धेची सुरुवात होणार असून अंतिम सामना 28 नोव्हेंबर रोजी खेळवला जाईल. 196 खेळाडूंनी या स्पर्धेसाठी नोंदणी केली होती. दोन नोव्हेंबर रोजी दादरच्या सूर्यवंशी क्षत्रिय सभागृहात, एका दिमागदार सोहळ्यात लिलाव पद्धतीने सहा संघमालकांनी नव्वद खेळाडूंची निवड केली. सूर्यवंशी वॉरियर, सिंबा सिक्सर, इन्स्पायर रॉयल, स्वराज इलेव्हन, आरडी ब्लास्टर आणि प्राइड ऑफ पालघर या संघांनी प्रत्येकी 15 खेळाडूंचा संघ तयार केला.
दीपक पाटील हे या स्पर्धेचे संचालक आहेत. सूर्यवंशी क्षत्रिय ज्ञाती समाजाचे अध्यक्ष प्रवीण महाले आणि चिटणीस जयंत पाटील यांचा यात मोलाचा वाटा आहे. या स्पर्धा पोलीस जिमखाना, मरीन लाइन्स येथे खेळवल्या जातील. अंतिम सामना रात्री प्रकाशझोतात खेळवला जाईल. विजेत्या संघास करंडक व एक लाख रुपयाचे बक्षीस तसेच उपविजेत्याला करंडक आणि पन्नास हजारांचे पारितोषिक असेल. इतर अनेक बक्षिसेही यावेळी दिली जाणार आहेत. याचे नियोजन जीआर स्पोर्ट्स यांनी केले आहे. सूर्यवंशी क्षत्रिय समाजातर्फे या क्रिकेट उत्सवाची सांगता 28 नोव्हेंबरला रात्री जल्लोषात केली जाईल, असे संघाचे चिटणीस जयंत पाटील यांनी कळवले आहे.

