शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या काल झालेल्या जयंतीनिमित्त मुंबई महापालिकेच्या उद्यान विभागाकडून दादरच्या शिवाजीपार्क येथील स्मृती स्थळावर विविध फुलझाडांनी तसेच शोभिवंत झाडांनी सजावट केली होती. उद्यान अधीक्षक जितेंद्र परदेशी यांच्या मार्गदर्शनाखाली ही मांडणी करण्यात आली. यामध्ये सफेद आणि पिवळ्या रंगाच्या शेवंती, झेंडू, विविधरंगी जरबेरा, पोइनसेटिया इत्यादी फुलझाडांचा वापर करण्यात आला. माल्फिजिया झाडाच्या टोपिअरी प्रकारातील कोन आकाराच्या कुंड्यांमधील झाडांचाही यात समावेश होता.




