Homeब्लॅक अँड व्हाईटखरीप हंगामासाठी राज्यस्तरीय...

खरीप हंगामासाठी राज्यस्तरीय पीक स्पर्धेचे आयोजन

महाराष्ट्राच्या कृषी विभागातर्फे खरीप हंगाम सन २०२४मध्ये सर्वसाधारण व आदिवासी गटासाठी भात, ज्वारी, बाजरी, मका, नाचणी (रागी), तूर, मूग, उडीद, सोयाबीन, भुईमूग, सूर्यफूल या ११ पिकांसाठी राज्यस्तरीय पीक स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.

राज्यात पिकांची उत्पादकता वाढविण्यासाठी विविध भागांमध्ये शेतकऱ्यांकडून विविध प्रयोग करून उत्पादकतेत वाढ करण्यात येते. अशा प्रयोगशील शेतकऱ्यांना मिळालेल्या उत्पादकतेबाबत प्रोत्साहन देऊन गौरव केल्यास त्यांचे मनोबल वाढून आणखी उमेदीने नवनवीन, अद्ययावत तंत्रज्ञानाचा वापर केला जाईल. यामुळे कृषी उत्पादनामध्ये भर घालण्यासाठी शेतकऱ्यांचे योगदान मिळेल. तसेच त्यांचे मार्गदर्शन परिसरातील इतर शेतकऱ्यांना होऊन राज्याच्या एकूण उत्पादनात मोलाची भर पडेल, हा उद्देश ठेऊन राज्यांतर्गत पीक स्पर्धा योजना राबविण्यात येत आहे. खरीप हंगाम सन २०२४ पीक स्पर्धेसाठी जास्तीतजास्त शेतकऱ्यांनी सहभाग घ्यावा, असे आवाहन कृषी आयुक्त रवींद्र बिनवडे यांनी केले आहे.

पीक स्पर्धेची ठळक वैशिष्टे व बाबी अशा-

पीक स्पर्धेसाठी अर्ज दाखल करण्याची अंतिम तारीख मूग व उडीद पिकासाठी ३१ जुलै तसेच भात, ज्वारी, बाजरी, मका, नाचणी (रागी), तूर, सोयाबीन, भुईमूग व सुर्यफूल या पिकांसाठी ३१ ऑगस्ट आहे. स्पर्धेसाठी प्रवेशशुल्क प्रत्येक पिकासाठी स्वतंत्र सर्वसाधारण गटासाठी रक्कम रु. ३०० व आदिवासी गटासाठी रक्कम रु. १५० राहील. स्पर्धेत भाग घेण्‍यासाठी शेतकऱ्याकडे स्‍वतःच्‍या नावावर जमीन असणे व ती जमीन तो स्वत: कसत असणे आवश्‍यक आहे. स्पर्धेत भाग घेणाऱ्या शेतकऱ्याला एकाचवेळी एकापेक्षा जास्त पिकांसाठी स्पर्धेत सहभाग घेता येईल.

पीक स्पर्धेमध्ये सहभाग घेण्याकरीता स्पर्धकास स्वतःच्या शेतावर स्पर्धेकरिता सहभाग घेऊ इच्छिणाऱ्या पिकाची भात पिकाच्याबाबतीत किमान २० आर व इतर पिकांच्या बाबतीत किमान ४० आर (१ एकर) क्षेत्रावर सलग लागवड असणे आवश्यक आहे. पीक स्पर्धा तालुकास्तरावर आयोजित करण्यात येणार असून सर्वसाधारण व आदिवासी गटासाठी तालुकास्तरावरील पीक स्पर्धेमध्ये सहभाग घेऊन शेतकऱ्यांची आलेली उत्पादकता आधारभूत धरून राज्य, जिल्हा व तालुका स्तरावरील स्पर्धेसाठी विजेत्या शेतकऱ्यांची निवड करण्यात येणार आहे.

अर्ज कोठे करावा व अर्जासोबत जोडावयाची कागदपत्रे-

१) विहित नमुन्यातील अर्ज (प्रपत्र-अ)

२) ठरवून दिलेले प्रवेश शुल्क भरल्याचे चलन

३) ७/१२, ८-अचा उतारा

४) जात प्रमाणपत्र (केवळ आदिवासी असल्यास)

५) पीक स्पर्धेसाठी शेतकऱ्याने संबंधित ७/१२वरील घोषित केलेल्या क्षेत्राचा चिन्हांकित केलेला नकाशा

६) बँक खाते चेक/पासबुकच्या पहिल्या पानाची छायांकित प्रत

पीक स्पर्धा बक्षिसाचे स्वरूप- सर्वसाधारण व आदिवासी गटातील शेतकऱ्यांसाठी पीकनिहाय राज्य पातळी प्रथम क्रमांक ५०००० रुपये, द्वितीय क्रमांक ४०००० रुपये, तृतीय क्रमांक ३००००, जिल्हा पातळीवर प्रथम क्रमांक १०००० रुपये, द्वितीय क्रमांक ७००० रुपये, तृतीय क्रमांक ५००० व तालुका पातळीवरील प्रथम क्रमांक ५००० रुपये, द्वितीय क्रमांक ३००० रुपये, तृतीय क्रमांक २००० आहे.

या योजनेबाबत अधिक माहितीसाठी कृषी विभाग, महाराष्ट्र राज्य, संकेतस्थळ-www.krishi.maharashtra.gov.in किंवा संबंधित तालुका कृषी अधिकारी कार्यालयाशी संपर्क साधावा.

Continue reading

मराठी शाळांकडील शासकीय दुर्लक्ष अत्यंत घातकी!

महाराष्ट्र शसनाने मराठी शाळांकडे केलेले दुर्लक्ष अत्यंत घातक टप्प्यावर पोहोचले आहे. नरेंद्र जाधव समितीचा फार्स आणि मुंबई महानगरपालिकेसारख्या यंत्रणेकडून जाणीवपूर्वक अनुदानित शाळा बंद पाडण्याचे कारस्थान, हा या व्यापक योजनेचाच भाग आहे. याबद्दल शासनाने तातडीने श्वेतपत्रिका प्रसिद्ध केली पाहिजे. राजकीय...

पुणेकरांची करोडोंची होणारी ‘दिवाळी लूटमार’ यंदा बंद!

पुणे महापालिकेच्या टॅक्स विभागातील अधिकारी-कर्मचारी असल्याचे भासवून सर्वसामान्य नागरिक, व्यावसायिकांची होणारी करोडो रुपयांची "दिवाळी लूटमार" यंदा बंद होणार! दरवर्षी दिवाळीत, पुण्यातील सर्वसामान्य नागरिक आणि व्यावसायिकांची पुणे महापालिकेच्या टॅक्स विभागातील अधिकारी-कर्मचारी असल्याचे भासवून काही भामटे आर्थिक फसवणूक करत होते. व्यावसायिक...

अकोला, अहिल्यानगर, अलिबागेतून मान्सून परतला! आज राज्यातून एक्झिट!!

राज्यातील मान्सूनच्या माघारीची प्रक्रिया सुरू झाली आहे. अकोला, अहिल्यानगर, अलिबाग या रेषेच्या वरील भागातून मान्सूनने माघार घेतली आहे. आता येत्या 24 तासात मान्सूनची महाराष्ट्रातून पूर्ण एक्झिट होणार असल्याचा अंदाज भारतीय हवामान खात्याने (आयएमडी) वर्तविला आहे. रिटर्न मान्सूनसाठी उर्वरित राज्यात वातावरण...
Skip to content