दिवंगत जनरल बिपिन रावत यांच्या स्मृतीप्रीत्यर्थ फेब्रुवारी 2023मध्ये मुक्तीनाथ मंदिर परिसरात स्थापन करण्यात आलेल्या ‘बिपिन बेल’ला लेफ्टनंट जनरल, ए. के. सिंह यांनी काल अभिवादन केले. सिंह 16 जानेवारी 2024पासून नेपाळच्या सात दिवसांच्या दौऱ्यावर गेले आहेत.

दक्षिण कमांड आणि गोरखा ब्रिगेडचे प्रमुख, लेफ्टनंट जनरल, ए. के. सिंग, (AVSM, YSM, SM, VSM GOC-in-C) यांनी नेपाळमधील मुस्तांग इथल्या थरांग ला खिंडीच्या पायथ्याशी असलेल्या मुक्तिनाथ मंदिराला भेट दिली.

दिवंगत सैन्यदलप्रमुख, जनरल बिपिन रावत हे स्वतः गोरखा अधिकारी होते आणि नेपाळ राष्ट्र तसेच नेपाळच्या जनतेशी त्यांचे अत्यंत जवळचे संबंध होते. भारत आणि नेपाळच्या लष्करातील मैत्री आणि बंधूभाव अधिकाधिक दृढ करण्यासाठी त्यांनी कायम प्रयत्न केले. बिपिन रावत यांची या मंदिरावर श्रद्धा होती, आणि 2021 साली ह्या देवळात जाण्याचे नियोजनही त्यांनी केले होते. मात्र, त्यांच्या अकाली मृत्यूमुळे ही भेट होऊ शकली नाही. म्हणूनच या मंदिरात त्यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ ही घंटा लावण्याला विशेष महत्त्व आहे.

फेब्रुवारी 2023मध्ये, चार माजी भारतीय लष्करप्रमुख, व्ही. एन. शर्मा, जनरल जे. जे. सिंह, जनरल दीपक कपूर आणि जनरल दलबीर सुहाग, जे नेपाळ लष्कराचे मानद जनरल्सदेखील आहेत, त्यांनी आपल्या भेटीदरम्यान, या पवित्र मंदिरात ही घंटा म्हणजेच बेल स्थापन केली होती. हे चौघे 2023 साली नेपाळ लष्कराच्या 260व्या वर्धापनदिनाच्या समारंभात सहभागी होण्यास गेले होते.

यावेळी, लेफ्टनंट जनरल, ए. के. सिंह यांनी नेपाळ लष्करप्रमुख, जनरल प्रभू राम शर्मा यांचीही भेट घेतली. दोन्ही अधिकाऱ्यांमध्ये, भारत आणि नेपाळमधील लष्करी द्वीपक्षीय संबंध अधिक बळकट करून, दोन्ही लष्करातील परस्पर सहकार्य वाढवण्यावर चर्चा झाली.

पोखरा, बागलुंग, धरण आणि काठमांडू या भागातील दौऱ्यादरम्यान, त्यांनी मूळ नेपाळ रहिवासी गोरखा माजी सैनिक, वीर नारी आणि त्यांच्या कुटुंबियांशी विविध माजी सैनिकांच्या रॅलीमधून संवाद साधला आणि त्या सर्वांना त्यांच्या निवृत्तीवेतनाशी संबंधित विविध कल्याणकारी उपाययोजनांची तसेच भारतीय सैन्याने हाती घेतलेल्या इतर उपक्रमांची माहिती दिली.