मी एका विवाहविषयक काम करणाऱ्या संस्थेत काम केलेले आहे. मासिकात विवाहोत्सुक मुलामुलींची माहिती प्रसिद्ध होत असे. त्यावरुन अनुरुप स्थळाचा पत्ता मिळत असे. हजारो लग्नं (विवाह) त्या माध्यमातून जमले. दोन दिवसांपूर्वी कोणा जाणकार व्यक्तीने विवाहाचे वय किती असावे, म्हणजे किती वय झाल्यानंतर विवाह करावा यावर मतप्रदर्शन केले होते. हल्ली कोणी काही मत व्यक्त केले की, त्यावर उलटसुलट प्रतिक्रिया येतात. नारायण मूर्ती यांनी कामाचे तास किती असावेत, यावर मत व्यक्त केल्यानंतर त्यांनादेखील शाब्दिक तडाखे बसले. मी विवाहाच्या संदर्भात असे मत व्यक्त केले की, करिअर आणि विवाह या दोन स्वतंत्र बाबी आहेत. हे माझे मत चाळीस वर्षांपूर्वी असेच होते. माझा विवाह झाला तेव्हा माझ्याकडे घर नव्हते, नियमित असे उत्पन्नदेखील नव्हते. पण पैसे मिळविण्याची कला होती. आज माझा संसार व्यवस्थित आहे. माझ्या मुलाचा विवाहदेखील मी त्याच्या पंचविसाव्या वर्षी केला.
हेच मत मी मांडले होते, त्यावर अशा प्रतिक्रिया आल्या की,आधी सेटल व्हायला हवे आणि मग विवाह करण्याचा विचार करावा. मला हे काही पटले नाही. आज लोकसंख्या आणि समतोल यावर बराच खल सुरु असतो. पण परिस्थितीनुसार रचना बदलत असते. विवाहाच्या संदर्भात मात्र बरीच चिंता करावी अशी परिस्थिती मला जाणवते. मी पुस्तकाच्या एका मोठ्या दुकानात खरेदी करण्यासाठी जातो. तिथे काम करणाऱ्या तरुणाशी बोलतो. त्याचे वय ३५ झाले आहे. माझ्यासाठी स्थळ बघा असे तो म्हणाला. मी त्याचा फोटो आणि माहिती मागवून ती ओळखीत असलेल्या कुटुंबात पाठवली. मुलगी ३२ वर्षांची. दोन आठवडे झाले तरीही काही प्रतिसाद नाही. विचारले तेव्हा मुलीची आई म्हणाली की ती काही बोलायला तयार नाही. मी जरा स्पष्ट बोलत असतो. मी म्हणालो.. तुम्हाला काळजी वाटत नाही का?
ही पोरंपोरी विवाह कधी करणार, यांना पोरं कधी होणार आणि यांचे आईबाप नातवंडांच्या सहवासात कधी राहणार, असा प्रश्न माझ्या मनात सतत फिरत असतो. माणूस हा असा एकच प्राणी आहे की, ज्याला काय खावे, काय खाऊ नये, विवाह कधी करावा हे कुणीतरी सांगावं लागतं. प्राण्यांना हे निसर्गाच्या नियमानुसार अवगत असतं. एक गाय रात्रीच्या वेळी जंगलात गेली. काही काळ लोक तिला शोधत होते. एके सकाळी ती परत आली तेव्हा तिच्याबरोबर तिचे नवजात वासरु होते. अर्थात मानवाने असे काही करावे अशी अपेक्षा नाही. पण भविष्यात होणारे बदल लक्षात घेऊन योग्यवेळी योग्य निर्णय घेणे आवश्यक आहे असे माझे भाबडे मत.

विवाहाचे वय मुलासाठी पंचवीस आणि मुलीसाठी वीस असावे, असे माझे मत मी व्यक्त केले. आता हा विषय बराचसा नाजूक आणि संवेदनशील झालेला आहे. या संदर्भात मुलामुलींशी संवाद असेल तर फारशी अडचण येत नाही. शारीरिक आकर्षण वेगळे आणि मानवी भावनांची देवाणघेवाण वेगळी. तरुणपण येऊ लागल्यानंतर विजातीय देहाचे आकर्षण वाटणे ही नैसर्गिक प्रक्रिया आहे. आपला मुलगा किंवा मुलगी वयात येत आहे हे पालकांच्या लक्षात आल्यानंतर विवाहाची चर्चा सुरु करायला हरकत नाही. पण करीअर नावाच्या संकल्पनेने बराच बिघाड केला आहे. विदेशात जाऊन भरपूर पैसे मिळवू आणि मग विवाहाचे बघू असा विचार करताना वय कधी निघून जाते ते कळत नाही. महाराष्ट्रातून विवाह करुन एखादे जोडपे अमेरिकेला गेले की, मुलगा/मुलगी अमेरिकेत आहे हे सांगायला बरे वाटते. पण पुढे त्यांना होणारी मुले नेमकी कोणत्या देशाची आणि नेमके संस्कार कसे होणार असा प्रश्न निर्माण होतो. म्हणून विवाह करण्याआधी काही गोष्टींचा विचार करुन गणित मांडणे महत्त्वाचे. ज्याला हे जमेल तो आयुष्यात यशस्वी होतो.
विवाह या विषयात पालकांनी आपला अधिकार किंवा शब्द गमावून बसू नये. वास्तविक हा विषय वैयक्तिक पातळीवरदेखील विचारात घ्यायला हवा. म्हणजे विवाह कधी करायचा याची कल्पना मुलामुलींच्या मनात योग्यवेळी रुजवली गेली पाहिजे. विवाह होतो तेव्हा आयुष्यभर साथ देणारा जोडीदार मिळतो. मी जेव्हा या क्षेत्रात काम करायचो तेव्हा येणाऱ्या लोकांना विवाहाच्या विषयात फक्त वय, उंची, उत्पन्न एवढेच जुळणे महत्त्वाचे नसून स्वभाव जुळणे महत्त्वाचे आहे हे सांगत असू. माझ्या विवाहाच्या वयात मी इतरांचे विवाह जमवले आहेत. एवढेच नाही तर विवाहोत्तर समस्या जिथे निर्माण झाल्या तिथे जाऊन मध्यस्थीदेखील केलेली आहे. एकंदर ही जबाबदारी पालकांची असते. त्यांनी नियोजन करायचे आहे. घर, गाडी वगैरे गोष्टी आणि विवाह याचा तसा परस्परसंबंध कमी आहे असे माझे मत आहे आणि मी ते मोकळेपणाने व्यक्त करतो.
दुसरा माझा एक बाळबोध विचार असा की, पैसे आणण्याचे काम पतीने करावे आणि त्याचा विनियोग करण्याची जबाबदारी पत्नीने स्वीकारावी. एवढी तरी कमाई असतेच की, सगळ्यांची आर्थिक गरज भागेल. पतीपत्नी दोघेही काम करतात तेव्हा संघर्ष अनपेक्षित नसतो.. म्हणजे पत्नीची नोकरी संध्याकाळी चार ते दुसऱ्या दिवशी पहाटे चार. पती पहाटे चार वाजता जाणार आणि दुपारी चार वाजता येणार. काय कप्पाळ संसार करणार? दुसऱ्या शब्दांत सांगायचे तर नव्या पिढीने काही जबाबदारी पालकांवर सोपवावी. तुम्ही सांगाल त्या मुलाबरोबर/मुलीबरोबर मी विवाह करीन असे सांगितले की, बरीच जबाबदारी कमी होते. यात जोखीम तुलनेने कमी असते. नात्यांची आणि मैत्रीची वीण पक्की असेल तर नात्यागोत्यात आणि मैत्रीतदेखील उत्तम विवाह होतात. अशावेळी वय महत्त्वाचे ठरते. पण माझे स्पष्ट मत आहे की, मुलामुलींना जर वयाच्या अठराव्या वर्षी मतदान करण्याचा अधिकार मिळत असेल तर आपल्या आयुष्याचा विचार करण्याची संधी दिली पाहिजे. आधी सेटल हो आणि मग विवाहाचे बघू असे पालकांनी सांगितले की संपलेच आणि म्हणूनच पालकांनी हे निर्णय घ्यावे.
(लेखक ज्येष्ठ पत्रकार आहेत.)

