Homeमाय व्हॉईसशिंदे-पवारांची 'सुसंवादकला' आणि...

शिंदे-पवारांची ‘सुसंवादकला’ आणि फडणवीसांची नवी संवादशैली!

मुख्यमंत्री देवेन्द्र फडणवीस यांनी नुकताच एक गुगली टाकला आणि त्यावर कोण आऊट झाले की चेंडू सीमापार ठोकला गेला याचा शोध सध्या सुरु आहे. एका मोठ्या इंग्रजी वृत्तपत्राच्या खुल्या मुलाखतीच्याा कार्यक्रमात फडणवीसांना प्रश्न आला की, “तुमच्या दोन उपमुख्यमंत्र्यांपैकी म्हणजेच, एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांच्यापैकी कोण अधिक सुसंवाद साधणारे आहेत (कम्युनिकेटिव्ह)’? त्यावर मुख्यमंत्री फडणवीसांचे उत्तर होते की, “खरे सांगू का या दोघांची क्षमा मागून मी म्हणतो की दोघेही सुसंवाद साधू शकत नाहीत (बोथ आर नॉट कम्युनिकेटिव्ह)”! आता या उत्तराचा अर्थ काय होतो? खरेतर असंख्य अर्थ या वाक्यार्धातून काढता येतील. “दोघांनाही संवाद साधता येत नाही, शिंदे व पवार दोघे एकमेकांशी संवाद साधू शकत नाहीत, दोघांचे बोलणे धड नसते, त्यांना नेमके काय म्हणायचे आहे हे कुणाला कळत नाही…” असंख्य अर्थ त्या एका वाक्याचे निघू शकतात आणि त्यावर माध्यमांच्या चर्चाही तासंतास रंगू शकतात आणि नेमके तसेच होतेही आहे! मुख्यमंत्र्यांच्या त्या वाक्याचे विविध रंगछटा मिसळून प्रतिध्वनी काढले जात आहेत. अर्थातच त्यावर अजूनतरी एकनाथ शिंदे वा अजितदादांनी कोणतेही भाष्य केलेले नाही. पण जेव्हा करतील तेव्हा निदान अजितदादांचे बोलणे ऐकण्यासारखे असेल यातही शंका नाही. एकनाथ शिंदेंनी यावरच्या उत्तराला बगल देताना माध्यमांना सांगितले की, आम्ही बोलतो कमी आणि काम जास्त करतो…

खरेतर मुख्यमंत्री फडणवीस, एकनाथ शिंदे व अजित पवार या तिघांमध्ये चांगला संवाद होता आणि सुसंवाद सुरु आहे म्हणून तर हे सरकार स्थापन होऊ शकले. २०२१-२२चे ते दिवस आठवा. वर्षा बंगल्यावर उद्धव ठाकरे राहत होते. त्यांच्या नेतृत्त्वातील महाविकास आघाडीचे सरकार कार्यरत होते. कोरोनाचे मोठे संकट देशावर आले होते आणि त्याच्या विविध पैलूंशी महाराष्ट्रही झुंजत होता. हजारो लोक आजारी पडत होते. दवाखाने ओसंडून वाहत होते. मृत्यूचे प्रमाणही मोठे होते. ऑक्सीजनच्या कमतरतेमुळे अनेक प्राण जात होते असेही काही दिवस होते. त्या सर्व भीतीच्या सावटातही फडणवीस आणि शिंदेंचा सुसंवाद सुरु होता हे नंतरच्या घटनांवरून दिसून आले.

संवाद

दिल्लीची महाशक्ती असा उल्लेख एखनाथ शिंदेनी २० ते ३० जून २०२२ या काळात अनेकदा केला होता. तोही आपल्या स्मरणात आहे. ती महाशक्ती होती अमित शाह व नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्त्वातील भारतीय जनता पक्षाची. या शक्तीच्या भरवशावर एकनाथ शिंदेंनी शिवसेनेतून बाहेर पडण्याचा आणि बंड करून शिवसेनाच ताब्यात घेण्याचा निर्णय केला. कम्युनिकेशन नसते तर ते शक्य झाले असते का? फडणवीसांची तेव्हाची भूमिका त्यात अत्यंत महत्त्वाची होती. ते राज्याचे विरोधी पक्षनेता म्हणून सागर बंगल्यावर राहत होते. त्या ठाकरे सरकारच्या काळात त्यांचा व शिंदेंचा संवाद सुरुच होता. या बंगल्यातून ते रात्री-अपरात्री वेष बदलून बाहेर पडत असत आणि शिंदेंना गुपचूप जाऊन भेटत असत. या गुप्त भेटीगाठींमध्ये बंडाचे तपशील शिजले आणि बंड झाल्यावर पुढची वाटचाल कशी असेल यासाठी वरिष्ठ वकिलांबरोबर आणि वरिष्ठ राजकीय नेत्यांसोबतही सल्लामसलतही गुप्त जागी, गुप्त भेटींत होत होत्या. या गोष्टी दोघांनीही नंतर स्वतंत्ररीत्या सांगितल्याच आहेत.

हा सागर बंगला त्यांनी गेल्या विधानसभा निवडणुकीनंतर लगेच सोडला नव्हता. ते परवापरवापर्यंत तिथेच मुक्कामाला होते. मुख्यमंत्र्यांसाठी कायम राखीव असणाऱ्या वर्षा बंगल्यावर फडणवीस, सत्ता ताब्यात घेतल्यानंतरही सहा महिने राहयला गेले नव्हते. कारण सुरुवातीचा काही काळ, नाराजीने उपमुख्यमंत्री बनलेले एकनाथ शिंदे हेच मुख्यमंत्र्यांच्या वर्षा बंगल्यावरच राहत होते. त्यांच्यासाठी नंदनवन बंगला तयार होत होता. बंगला मनासारखा सजावटीने तयार झाल्यावर शिंदेंचा वर्षावरचा मुक्काम हलला. त्यानंतरही आणखी काही काळ फडणवीस वर्षावर गेले नाहीत. तिथे थोडेफार बदल, वास्तू पद्धतीची नवी काही रचना, त्यांना करून घ्यायची होती. तसेच लेकीची दहावीची परीक्षा संपायचीही ते वाट पाहत होते.

संवाद

जेव्हा एकनाथ शिंदे चाळीस आमदारांना घेऊन ठाकरे सरकार पाडण्याच्या उद्योगाला लागले, तेव्हा उत्तम संवादासाठी फडणवीसांचे विश्वासू आणि शिंदेंचेही तितकेच जवळचे असे आमदार रवीन्द्र चव्हण शिंदेंसोबत मुंबई ते सूरत ते गौहाटी ते गोवा आणि नंतर पुन्हा मुंबई अशा सर्व प्रवासात सोबत राहिले होते. हे सारे घडले होते ते भाजपा आणि शिंदेंची फुटीर शिवसेना यांच्यात तसेच स्वतः शिंदे व फडणवीस यांच्यात सुसंवाद सुरु होता म्हणूनच घडले. एकनाथ शिंदे ठाकरेंनंतर मुख्यमंत्री बनले तेव्हा, मी आता सरकारमध्ये राहतच नाही, असे म्हणणारे देवेन्द्र फडणवीस यांचे धक्कादायक संवादनकौशल्य कामी आले. शिंदेंबरोबर फडणवीसांनीही उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली कारण महाशक्तीचे तसे आदेशच देवेन्द्र यांना आले होते. या दोघांच्या सुसंवादात सरकारचे वर्ष पूर्ण होताहोता, अजित पवार नव्याने शिंदे प्रयोग करून सरकारमध्ये दाखल झाले. त्यांच्याहीसमवेत सुसंवाद करून शरद पवारांची साथ सोडून दादा गटात आलेले चाळीस आमदार होते. ज्या पद्धतीने एकनाथ शिंदेंनी धनुष्य-बाण निवडणूकचिन्हासह ठाकरेंच्या मूळ पक्षाचे नावही मिळवले, तो सारा सुसंवाद दिल्लीशी, घटनात्मक संस्थांशीही नीट सुरु होता म्हणूनच. तोच कित्ता गिरवत अजितदादांही महायुतीच्या सत्तेत सहभागी झाल्यानंतर, राष्ट्रवादी हे नाव आणि घड्याळ हे निवडणूकचिन्ह पदरात पाडून घेतले.

या तिघांचे सरकार सत्तेत असतानाच लोकसभा निवडणुका झाल्या. त्यात महायुतीला महाफटका बसला. जेमतेम सतरा जागी शिंदे फडणवीस आणि दादांचे खासदार निवडून आले. लोकसभेचा तो पराभव पचवून तिघांनी जनतेशी सुसंवाद साधला आणि विधानसभेला सारा वचपा काढला. शरद पवार, राहुल गांधी आणि उद्धव ठाकरे अशा तिघांना मिळून जेमतेम ४९ आमदार निवडून आणता आले. भाजपा, शिवसेना (शिंदे) आणि राष्ट्रवादी (दादा) असा तिघांकडे मिळून (लहान मित्रपक्षांसह) २८८पैकी २३७ इतके आमदार उभे आहेत. अशा या दणदणित बहुमताच्या महायुती सरकारमध्ये ज्या लहानमोठ्या कुरबुरी सुरु असतात, त्यांना उद्देश्यून तर फडणवीस म्हणत नाहीत ना की, “सुसंवादाचा अभाव दिसतोय…”?

संवाद

असे दिसते की केंद्रीय गृहमंत्री अमित शाह सरत्या सप्ताहात जेव्हा दोन दिवसांच्या महाराष्ट्र दौऱ्यावर आले तेव्हा त्यांच्याकडे अजित पवारांनी काही तक्रारी केल्या. अमित शाह हेच महायुतीचे सर्वोच्च नेते आहेत. कारण पंतप्रधान मोदींना महायुतीच्या लहानमोठ्या बाबींमध्ये लक्ष घालायला वेळच नाही. पवार येऊन गेल्यानंतर दुसऱ्या दिवशी शाहांनी भाजपाच्या आमदारांशी संवाद साधताना असे उद्गार काढले की, तुमच्या कामांचा आक्रमकपणाने पाठपुरावा करा. कारण तुम्ही १३५ आमदारांच्या पक्षाचे लोकप्रतिनिधी आहात. सत्तेत तुम्ही मोठा भाऊ आहात. तुमच्या जोरदार पाठपुराव्याविरोधातच अजितदादांनी माझ्याकडे तक्रार करायला हवी असे तुम्ही वागा! आता हा सल्ला खरेतर कलहाचे कारण बनायला हवा. पण तसे काही झालेले नाही. त्यानंतर लगेचच फडणवीसांची ही टिप्पणी आली आहे. आताच शिंदे-पवारांच्या अल्प सुसंवादकौशल्याची आठवण भाजपा नेत्यांना का व्हावी हाही प्रश्नच आहे. महापालिका, नगरपालिका आणि जिल्हा परिषदा, पंचायत समित्या अशा सर्व स्तरांवरील स्थानिक स्वराज्यसंस्थांच्या निवडणुका लवकरच होणार आहेत. मागच्या सप्ताहापर्यंत फडणवीस म्हणत होते की मुंबईत, पुण्यात तरी आम्ही एकमेकांच्या सोबतच लढू. पण काही ठिकाणी शिंदे व अजितदादांच्या पक्षांबरोबर मैत्रीपूर्ण लढतीही होऊ शकतात. पण अमित शाहांच्या दौऱ्यात काही वेगळे ठरल्याची कुजबूज कार्यकर्त्यांत सुरु आहे. शाहांनी म्हणे स्वबळाचा नारा दिलाय. आता त्या साऱ्यामधून भाजपाची (फडणवीसांची) निराळी संवादशैली दिसते की काय?

Continue reading

राहुलजी, ठाकरे आणि पवारांना समजावणार तरी कोण?

राहुल गांधी यांनी अलीकडेच दिल्लीत एक जोरदार पत्रकार परिषद घेऊन एका कथित अणुबाँबचा स्फोट केला. त्यात ते म्हणतात की, २०२४च्या सार्वत्रिक लोकसभा निवडणुकीवेळी, पंतप्रधानपद टिकवण्यासाठी भारतीय जनता पार्टीला व मोदींना लोकसभेच्या 25 जागांची आवश्यकता होती. त्यासाठी त्यांनी देशभरातील अनेक...

ओबीसींना 27 टक्क्यांचेच आरक्षण, मग निवडणुका लांबवल्या कशाला?

सर्वोच्च न्यायालयाच्या ज्या निकालाची वाट राज्यभरातील सर्वच राजकीय पक्षांचे कार्यकर्ते पाहत होते, त्या स्थानिक स्वराज्य संस्था निवडणूक प्रकरणाच्या खटल्याचा निकाल सरत्या सप्ताहात अखेर लागला. राज्य सरकारसह सर्व राजकीय पक्षांनी सुटकेचा निःश्वास टाकला. 6 मे 2025च्या निकालामध्ये मूळ ओबीसी आरक्षण...

‘दगाबाज दिलबर’ शरद पवारांचे ते पत्र फडणवीसांच्या संगणकावरचे!

महाराष्ट्राच्या राजकारणातील याआधीची पाच वर्षे ही अत्यंत नाट्यपूर्ण तर होतीच, पण त्याचे गूढ आजही पुरतेपणाने उलगडलेले नाही. 2019च्या नोव्हेंबर महिन्यानंतर राज्यात तोवर सत्तारूढ असणारी भाजपा-शिवसेना युती अचानक संपुष्टात आली. नंतर सुरु झाल्या चित्रविचित्र युत्या व आघाड्या. त्यानंतर स्थापन झालेली...
Skip to content