Homeडेली पल्सज्येष्ठ काँग्रेस नेते...

ज्येष्ठ काँग्रेस नेते रोहिदास पाटील यांचे निधन

काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि महाराष्ट्राचे माजी मंत्री रोहिदास तथा दाजी पाटील यांचे आज सकाळी 11 वाजता अल्पशा आजाराने निधन झाले. ते 89 वर्षांचे होते. त्यांच्या पश्चात विनय तसेच आमदार कुणाल पाटील हे दोन मुलगे तसेच स्मिता पाटील ही विवाहित कन्या असा परिवार आहे. रोहिदास पाटील यांच्या पार्थिवावर उद्या, 28 सप्टेंबरला सकाळी 11 वाजता धुळ्याच्या श्री शिवाजी विद्या प्रसारक संस्थेच्या एसएसव्हीपीएस कॉलेजच्या मैदानावर अंत्यसंस्कार केले जाणार आहेत.

रोहिदास पाटील काँग्रेस विचाराचे सच्चे पाईक होते. काँग्रेसचा विचार त्यांनी शेवटच्या श्वासापर्यंत सोडला नाही. रोहिदास पाटील यांनी आपल्या राजकीय कारकिर्दीत आमदार, खासदार, विविध खात्याचे मंत्री अशा पदावर काम करुन आपली वेगळी ओळख निर्माण केली होती. खानदेशात काँग्रेस विचार तळागाळात पोहोचण्याचे काम त्यांनी केले. विद्यार्थी दशेपासूनच त्यांनी समाजकारण आणि राजकारणात पाऊल ठेवले. त्यानंतर काँग्रेस सेवादलचे सदस्य, महाराष्ट्र युवक काँग्रेसचे जनरल सेक्रेटरी, धुळे जिल्हा काँग्रेस कमिटीचे उपाध्यक्ष अशी पदे भूषवली. १९७२ साली ते धुळे जिल्हा परिषदेवर निवडून गेले. १९८० साली त्यांनी विधानसभेच्या निवडणुकीत विजय मिळवला. १९८६ साली ते महसूल राज्यंमत्री झाले. कृषी, फलोत्पादन, रोजगार, ग्रामविकास, पाटबंधारे, गृहनिर्माण, संसदीय कार्यमंत्री अशा विविध खात्यांची जबाबदारी यशस्वीपणे सांभाळून त्यांनी लोकांचे प्रश्न सोडवले.

महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे प्रवक्ते व उपाध्यक्ष पदावरही पाटील यांनी काम केले. शैक्षणिक संस्था सुरु करून धुळे जिल्ह्यातील सर्वसामान्य कुटुंबातील मुला-मुलींना शिक्षणाची सुविधा निर्माण करुन दिली. जवाहर शेतकरी सहकारी सूतगिरणी, जवाहर महिला सहकारी सूतगिरणी, जवाहर सहकारी कुक्कूट पालन संस्था, जवाहर सहकारी पशुखाद्य संस्थेच्या माध्यमातून धुळे जिल्ह्यात सहकारी संस्थांचे जाळे विणले. धुळे जिल्ह्याला वरदान ठरणारे अक्कलपाडा धरण बांधण्यात त्यांचा मोठा पुढाकार होता. कृषी, सामाजिक, शैक्षणिक, आरोग्य, क्रीडा, सांस्कृतिक क्षेत्रातही त्यांनी भरीव योगदान दिले.  दांडगा जनसंपर्क व जनतेच्या कामासाठी सदैव तत्पर असणारा नेता अशी त्यांची ओळख होती. आपल्याला मिळालेल्या पदांच्या माध्यमातून त्यांनी समाजातील सर्व घटकांचा विकास करण्याचा प्रयत्न केला.

रोहिदास पाटील यांच्या निधानाचे वृत्त अत्यंत दुःखद व वेदनादायी आहे. दाजीसाहेबांच्या निधनाने सुसंस्कृत, संयमी, विनम्र अनुभवी व लोकाभिमुख नेतृत्त्व काळाच्या पडद्याआड गेले आहे. त्यांच्या निधनाने काँग्रेसची कधीही न भरून येणारी हानी झाली आहे, अशा भावना महाराष्ट्र काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी व्यक्त केल्या आहेत.

Continue reading

तांदळाभोवती फिरणार जपानची पुढची निवडणूक!

जपानमध्ये तांदूळ हे केवळ एक मुख्य अन्न नाही, तर ते जपानच्या संस्कृतीचा, अर्थव्यवस्थेचा आणि राष्ट्रीय अस्मितेचा अविभाज्य भाग आहे. मात्र, सध्या तांदळाचा अभूतपूर्व तुटवडा आणि गगनाला भिडलेल्या किमतींमुळे देशात एक मोठे राजकीय संकट निर्माण झाले आहे. गेल्या एका वर्षात...

यंदाच्या ‘इफ्फी’त पदार्पण करणार जगभरातील सात कलाकृती!

यंदाच्या 56व्या भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात (इफ्फी) जगभरातील पदार्पण करणाऱ्या सात कलाकृती प्रदर्शित होणार असून आंतरराष्ट्रीय चित्रपटसृष्टीतील उत्कृष्ट नव प्रतिभेला प्रोत्साहन देण्याच्या हेतूने, सर्वोत्कृष्ट पदार्पण पुरस्कारासाठी पाच आंतरराष्ट्रीय आणि दोन भारतीय चित्रपटांची निवड केली जाणार आहे. विजेत्याला रूपेरी मयूर,...

राज्य सरकारकडून कृषी क्षेत्रात भांडवली गुंतवणूक

कृषी क्षेत्रात भांडवली गुंतवणूक आणि पायाभूत सुविधा तयार करण्याकरीता गुंतवणूक करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. जून ते सप्टेंबरदरम्यान अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले. यातून शेतकऱ्यांना पुन्हा उभारी मिळावी यासाठी सरकारने हा निर्णय घेतला. कृषी समृद्धी योजनेंतर्गत शेतकऱ्यांना ड्रोन,...
Skip to content