‘मेरा पहला वोट देश के लिए’ या मोहिमेला देशभरात गती देण्याच्या प्रयत्नात ख्यातनाम वालुकाशिल्प कलाकार सुदर्शन पटनायक यांनी ओरिसात जगन्नाथ पुरीच्या सागर किनाऱ्यावर वालुकाशिल्प साकारले आहे. या शिल्पातून त्यांनी युवकांना तसेच मतदानात पहिल्यांदाच भाग घेत असणाऱ्या मतदारांना मोठ्या संख्येने मतदान करून लोकशाहीला मजबूत आणि समृद्ध करण्याचा संदेश दिला आहे.
पटनायक यांच्या कलेची प्रशंसा करताना केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर म्हणाले की, हे वाळूवर साकारलेलं शिल्प नसून प्रत्येक भारतीयाच्या मनावर उमटलेला ठसा आहे. आपल्या एक्स या समाजमाध्यमावरील संदेशात मंत्रिमहोद म्हणतात की #MeraPehlaVoteDeshKeliye, मोहीम देशाच्या कानाकोपऱ्यात पोहोचत आहे आणि पहिल्यांदाच मतदान करणाऱ्या मतदाराच्या मनामध्ये या लोकशाही प्रक्रियेचा भाग होण्याची अनोखी उत्सुकता जागी करत आहे. या भावनेची उत्कृष्ट उभारणी या वाळूवर झालेली आपण बघत आहोत.
‘मेरा पहला वोट देश के लिए’ ही मोहीम देशातील वेगवेगळ्या उच्च शैक्षणिक संस्थांमध्ये राबवली जात आहे. तरुण मतदारांनी मोठ्या संख्येने बाहेर पडून मतदान करावे आणि देशाच्या भल्यासाठी मतदान करण्याचे महत्त्व त्यांच्यापर्यंत पोहोचवावे हा या मोहिमेचा मुख्य उद्देश आहे. मोहिमेमुळे निवडणुकीचे महत्त्व आणि जगातील सर्वात मोठ्या लोकशाहीत मतदान करण्याचा अभिमान या गोष्टी ठळक होत आहेत.