इजिप्त, अश्शूर, ग्रीस, रोम आणि भारतातल्या प्राचीन शिल्पांचे आंतरराष्ट्रीय प्रदर्शन येत्या बुधवारी, १ डिसेंबर रोजी मुंबईतल्या छत्रपती शिवाजी महाराज वास्तुसंग्रहालयात (सीएसएमव्हीएस) आयोजित करण्यात आले असून त्यात जगाच्या कानाकोपऱ्यातील प्रतिष्ठित पुरातत्त्वीय शिल्प पाहता येणार आहेत. याच प्रदर्शनात मध्य प्रदेशातल्या विदिशा येथील जिल्हा पुरातत्त्व संग्रहालयातली आदि वराह मूर्ती सर्वांचे लक्ष आकर्षित करेल. या प्रदर्शनात प्रदर्शित होणारे मध्य प्रदेशातील हे एकमेव शिल्प ठरणार आहे.
हे स्मारक लाल वालुकाश्मामध्ये असंख्य देवी-देवता आणि ऋषीमुनींच्या कोरीव कामांसह कोरलेले आहे. भागवत-पुराण आणि महाभारत यासारख्या प्राचीन पौराणिक कथांनुसार भगवान विष्णूने वराह म्हणून अवतार घेतला आणि बुडालेल्या पृथ्वी देवीची सुटका केली. मूर्तिकलेला प्रतिमाशास्त्राच्या अभ्यासात खूप उच्च कलात्मक मूल्य आहे आणि ते आदि वराहचे एक उत्तम उदाहरण आहे.
मध्य प्रदेशच्या पर्यटन आणि संस्कृती विभागाचे प्रधान सचिव शेखर शुक्ला म्हणाले की, मध्य प्रदेशात असंख्य पुरातत्त्वीय आश्चर्ये आहेत आणि येथे सांची, भीमबेटका आणि खजुराहोग्रुप ऑफ मॉन्युमेंट्ससारख्या युनेस्कोच्या तीन जागतिक वारसास्थळे आहेत. राज्यात शतकानुशतके मोठ्या राजघराण्यांचे अवशेष सापडले आहेत आणि शिल्पकलेचे सर्वात प्राचीन प्रतिनिधित्व इ.स.पू. दुसऱ्या शतकातील आहे.
मध्य प्रदेशचे पुरातत्त्व संचालनालय पुरातत्त्व क्षेत्रात केलेल्या कौतुकास्पद कामामुळे नेहमीच चर्चेत राहिले आहे. या संचालनालयाचे मुख्य कार्य गावोगावी सर्वेक्षण, उत्खनन, संकलन, प्रदर्शन, प्रतिबंध, संकलन, प्रकाशन आणि सर्वत्र पसरलेल्या सांस्कृतिक वारशाचे संरक्षण करणेहे आहे, असेही त्यांनी सांगितले.