सध्या स्टोरीटेल मराठीवर अभिनेता आस्ताद काळे यांच्या आवाजातील श्रीपाद जोशी, जयेश मेस्त्री लिखित ‘चेकमेट’ ही ऑडिओबुक मालिका विशेष गाजत आहे. या ऑडिओबुकला रसिकश्रोत्यांनी भरभरून प्रतिसाद दिला आहे. उत्कंठावर्धक आणि थरारक अनुभव देणाऱ्या या मालिकेच्या या लेखकद्वयींसोबत साधलेला हा खास संवाद..
‘चेकमेट’ लिहिताना आमच्यासमोर सर्वात मोठं चॅलेन्ज होतं ते अभिमन्यूचं. अभिमन्यू म्हणा, त्याची फियान्से रेणुका किंवा कॉन्स्टेबल पाटील, फॅरेन्सिक लॅबचे डॉ. सिब्बल.. या सर्वांचे कॅरेक्टर मर्डर केसमध्ये डेव्हलप झाले होते. खरंतर अभिमन्यू आम्हाला आमच्या अज्ञात खुनी, या कथेत सापडला. पण त्यात अभिमन्यूला हवा तसा न्याय देता आला नव्हता. मग मर्डर केसच्या अभिमन्यूवर लोकांनी खूप प्रेम केलं. आस्ताद काळेनेही कथा उत्तमरित्या मांडली.
रसिकांसमोर एक वेब सीरीजच उभी राहिली. त्यामुळे अर्थात चेकमेट लिहिताना बर्डन होतं की, मर्डर केसला जो प्रतिसाद मिळाला, तो खाली पडू द्यायचा नव्हता. रसिकांना नाराज करायचं नव्हतं. म्हणून आम्ही खूप काळजी घेतली. प्रत्येक सीनमध्ये प्लॉट पॉइंट्स येतील, थ्रिल निर्माण होईल याची दक्षता घेतली आणि खरं सांगायचं तर खूप मजा आली. आम्ही दोघं (जयेश मेस्त्री आणि श्रीपाद जोशी).. बरंच डिस्कस करायचो. हा सीन चांगला आहे, हा सीन चांगला नाही.. मग आम्ही तो अख्खा सीन डीलीट मारायचो आणि पुन्हा नवा सीन लिहायचो.
आम्हाला वाटतं की जेव्हा सीन चांगला झालाय असं वाटतं तेव्हासुद्धा अपल्याला डिलीट मारता आलं पाहिजे.. तर अनुभव भन्नाट होता.. सध्या आमचं मर्डर केस सीजन २वर काम सुरुय.. तर सीजन २सुद्धा लवकरच येणार आहे आणि आम्ही प्रॉमिस करतो की यावेळी काहीतरी नवं कोरं घेऊन येऊ..
चेकमेटची जन्मकथा
चेकमेटची आयडिया तशी रियल लाईफवरुन सुचली.. काहीतरी घडलं होतं. ते नेमकं काय घडलं हे मात्र सांगू शकत नाही. कारण तोच सस्पेन्स आहे. तर ती बातमी जेव्हा आम्हाला कळली, तेव्हा आम्ही विचार केला की यावर कथा लिहिली पाहिजे. चांगला प्लॉट आहे. जसं आमची स्टोरीटेलवरची पहिली कथा “बेपत्ता”सुद्धा रियल इन्सिडन्सवर होती. तशी ही घटनासुद्धा कुठेतरी घडलेली आहे आणि मग त्यावरुन स्टोरी रचली. अर्थात एका छोट्याशा बातमीवरुन कथा लिहिणं तेवढं सोपं नसतं. पण आम्हाला वाटतं की रियल इन्सिडन्ट असेल तर लोक जास्त रिलेट करतात. आपल्या भोवती अनेक घटना घडत असतात. आम्ही त्यात कथा शोधण्याचा प्रयत्न करतो आणि कॅरेक्टर्ससुद्धा अवतीभवतीच असतात. फक्त आपल्याला ती रेखाटता आली पाहिजे. तर अशी आहे चेकमेटची जन्मकथा..
ऑडिओबुक ऐकताना श्रोत्यांना कोणता अनुभव घेता येईल?
अनुभव म्हणजे.. जसं आम्ही म्हटलं की रियल इन्सिडन्टवर आधारित असल्यामुळे लोक नक्कीच रिलेट करतील. आपण फिल्म्समध्ये पाहतो की व्हिलन खूप मोठा असतो. प्रत्येकामध्ये एक व्हिलन असतो. हिरो असतो. सपोर्टिंग कॅरेक्टर असतो. चेकमेट किंवा अभिमन्यूची कोणतीही सीरीज म्हणजे आपल्या अवतीभवती असलेल्या कॅरेक्टर्सचं व्यक्तिचित्रणच आहे.
आम्हाला वाटतं की त्यांना चांगलं आणि रियलिस्टिक व्यक्तिचित्रण ऐकायला मिळेल. क्राईमच्या एका वेगळ्या दुनियेत प्रवेश करता येईल आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे असे काही गुन्हा आपल्या अवतीभवती घडतात. त्यामुळे आपण सतर्क राहिलं पाहिजे हेही लक्षात येईल. आणि ऑफकोर्स एंटरटेनमेंट.. प्रत्येक क्षणाला थ्रिल अनुभवता येईल आणि हे दीड तास यंग, डॅशिंग, हॅंडसम अभिमन्यू प्रधानसोबत घालवता येतील. आम्हाला खात्री आहे की, सर्वांनाच अभिमन्यू आवडतो. तरुणांना आणि विशेषतः तरुणींना अभिमन्यू खूप आवडतो. त्यामुळे फिल्म पाहिल्याचा अनुभव नक्कीच येईल.