कृष्ण काळा का? बालाजी किंवा विठ्ठलही काळे कसे? द्रौपदीही काळी होती म्हणे! काळे असणे हेच कधीकाळी भारतात सुंदरतेचे लक्षण मानले जायचे! आहे ना मजेशीर! ‘सप्त सरितांचा प्रदेश’! नुसते मजेदार नाही प्रक्षोभकही आहे हे पुस्तक! सम्राट चंद्रगुप्त मौर्य, मौर्य साम्राज्याचा संस्थापक! त्याच्याच नातवाच्या काळात मगध साम्राज्य खिळखिळे झाले. या साम्राज्याचा अस्त सम्राट अशोकामुळे झाला असा निष्कर्ष लेखक देतो… (याचा तपशील पुढे दिलेला आहे.) आहे ना प्रक्षोभक!
इंडिया टुडेचा हा अभिप्राय पुस्तकाच्या मागच्या कव्हरवर (मलपृष्ठ) छापलेला आहे. तीन शब्दांचा अभिप्राय शब्दशः खरा आहे. पुस्तक वाचताना अनेक गमतीजमती वाचायला मिळतात. पण त्यातून निघणारे अर्थ घाम आणणारे आहेत. प्रक्षोभक निश्चितच आहेत. अनेक पूर्वापार मान्यता पावलेले सिद्धांत कल्पित आणि भ्रामक वाटावेत अशी नवीन अभ्यासपूर्ण मांडणी या पुस्तकात केलेली आहे.
पृथ्वीवरील खंड जेव्हा दूरदूर जाऊ लागले त्यावेळी भारतीय उपमहाद्वीप कसकसे वर रेटत गेले आणि भूगोल कसकसा बदलत गेला असा थोडासा जड विषय घेऊन सुरू झालेले हे पुस्तक पहिल्या प्रकरणात तर बोजड वाटू लागते. कारण त्यात अजून भारतीय माणूस आलेला नसतो आणि जसजसे आपण पुढे जाऊ तसतसे लेखक पुरावा देत देत आपल्याला झटके देत जातो. लेखक अतिशय चलाख आणि साळसूद म्हणावा तसे स्वतःवर काहीही घेत नाही. कोणताही दावा करत नाही. पण मांडणी मात्र भयंकर करतो, तीही पुराव्यानिशी! निर्णय मात्र वाचकांवर सोडून मोकळा होतो.
अर्ली इंडियन्स हे मूळ भारतीय एका लुप्त नदीकाठी विकसित झाले. ऋग्वेदात त्या नदीचा शेकडो वेळा उल्लेख केला आहे ती सरस्वती! हिमालयातून उगम होऊन ती भारताच्या पश्चिमेला सिंधू सागरास (अरबी समुद्र) मिळणारी नदी एकेकाळी सर्वात शक्तिशाली होती. सतलज आणि यमुना तिच्या उपनद्या! भूगोलाचे परिवर्तन होऊन यमुनेच्या प्रवाहाने दिशा बदलली. त्यापुढे जाऊन सतलजही सरकली आणि सिंधूला भेटली. दरम्यान प्रलयकारी पूरही आले. पण मूळ नदी ही पावसाळी नदी झाली. काही महिने वाहू लागली. ती सर्वात अलीकडे २०१०ला पुन्हा प्रवाहित झाली. ती लुप्त नदी म्हणजे त्याकाळची सरस्वती आणि अलीकडे घग्गर होय! ही गोष्ट दुसरे प्रकरण वाचताना आपोआप स्पष्ट होत जाते.
हे वाचून पुस्तकाचा विषय काय आहे असा प्रश्न पडू शकतो. पुस्तकाचा मुख्य विषय आहे भारतातील बदलती नगररचना! बनते बिघडते म्हणावे तसे कसकसे नगर विकसित होत गेले असा विषय मांडत मांडत फटके मारत मारत लेखक पुढे सरकत जातो. हडप्पापासून सुरु होऊन अलीकडच्या गुडगावपर्यंत अनेक महानगरांच्या कथा आणि वर्णन वाचताना मनात अभिमानाचे कंप सुटतात. हे वाचताना कधी फियान (फा – हियान चिनी प्रवासी) येतो तर कधी रोमन लेखक प्लिनी येतो (प्राचीन रोमन अर्थतज्ञ). अनेक माहित नसलेले प्राचीन लेखक आणि त्यांचे साहित्य आपल्याला माहिती होते. इंडिका लिहिणारा मेगॅस्थेनीस (मॅसेडोनियन वकील: पाटलीपुत्रचे वर्णन – लाकडी फळ्यांचा उपयोग केलेलं शहराभवती कुंपण, खंदक, ६४ प्रवेशद्वार, साडेचौदा किमी लांब अडीच किमी रूंद शहर) अधूनमधून दिसतो. कौटिल्याच्या अर्थशास्त्रात तर वाहतुकीचे नियमही लिहिले गेले आहेत. रस्त्यावर गाडी उधळली तर त्याने दंड लावण्याची सूचना त्याच काळात केली होती. अपवाद फक्त बैल पागल झाला असेल किंवा कासरा (बैलाची दोरी) तुटली असेल!
हे वाचून तुम्ही म्हणाल यात काय प्रक्षोभक? आहे ते तर आहेच! उदाहरण पाहू! नंद राजाचे राज्य जिंकून चंद्रगुप्त मौर्य चक्रवर्ती सम्राट होतो. चाणक्याच्या मदतीने भारतातील सर्वात मोठे साम्राज्य निर्माण करतो. ते साम्राज्य म्हणजे मौर्य साम्राज्य जे की मगध प्रदेशात! हा मगध प्रदेश चक्क महाभारत काळापासून प्रचंड शक्तिशाली आहे. महाभारत काळातील जरासंध असो की गुप्तकाळात राजा बिंबिसार सर्व शक्तिशाली! कारण या प्रदेशाची सुपिकता आणि तेथील लोह!
आजोबा सम्राट चंद्रगुप्त याने निर्माण केलेले राज्य नातू सम्राट अशोकाच्या (उत्तरकाळात) अंमलाखाली खिळखिळे झाले. आपण सम्राट अशोकाने राज्यत्याग केला असे वाचतो. पण लेखक लिहितो, “अशोकाने इ.पू. २३२मध्ये वयाच्या ७२व्या वर्षी मृत्यू येईपर्यंत राज्य केले. शेवटी शारीरिक दौर्बल्यामुळे कार्यक्षमता कमी होऊनसुद्धा त्याने सत्तापदाचा त्याग केला नाही. साम्राज्याची स्थापना करणारे त्याचे आजोबा व चाणक्य यांच्या अगदी विरुद्ध त्याचे वर्तन होते. जराजर्जर राज्यकर्त्यांच्या प्रश्नाने भारताचा अनेक शतके पिच्छा पुरवला आहे.”

याच पुस्तकात कधीही ज्याचा उल्लेख टाळला जातो त्या वात्सायनने लिहिलेल्या कामसूत्र ग्रंथाचा हवाला देऊन त्याकाळची सामाजिक स्थिती सांगितली आहे. गुलछबू लोकांचे जीवन सुखी व्हावे म्हणून त्यात त्याकाळी काही सामाजिक टिप्ससुद्धा होत्या. गमंत नाही हो, त्याच ग्रंथात सुखी, चैनीत जीवन जगण्यासाठी शहरात राहण्याचा सल्ला दिलेला आहे. वाढत्या नागरीकरणामुळे हा विषय पुन्हा चर्चेत आला तर नवल नाही.
धार्मिक वाद हे केवळ विद्वानांपुरते मर्यादित होते असे लेखक लिहितो. सामान्य जनता सर्व उत्सव एकत्र पार पाडत असे. एकत्र राहत असे. वैदिक गुरू चाणक्य यांचे शिष्य चंद्रगुप्त मौर्य हे आयुष्याच्या शेवटच्या काळात जैन धर्म स्वीकारून वानप्रस्थ झाले. कर्नाटकात ज्या टेकडीवर त्यांनी उर्वरित आयुष्य काढले ती टेकडी आजही चंद्रगिरी नावाने प्रसिद्ध आहे. तर सम्राट चंद्रगुप्त मौर्य यांचे नातू सम्राट अशोक महात्मा बुद्धांचे अनुयायी झाले होते. त्यांनी बौद्ध धर्माचा प्रसार केला.
गुप्त काळातील पाटलीपुत्रमधील रथयात्रेसंदर्भात फा – हीयान लिहितो की, “चारचाकी गाड्या तयार केल्या होत्या. त्यावर पाच मजली इमारत असावी इतके उंच मनोरे केले होते. (लोकांनी त्याला सजवले होते.) लोकांनी पूज्य देवतांच्या मूर्ती गाड्यांच्या मध्यभागी व बुद्धाच्या मूर्ती चारी कोपऱ्यात ठेवल्या होत्या. लोक हे रथ ओढत असत. राजघराण्यांपासून अगदी गरिबांपर्यंत सर्व भक्तजन या समारंभात भाग घेत. याचाच अर्थ त्याकाळी धार्मिक भेद हे केवळ विद्वान लोकांच्या विद्वत चर्चेमध्ये असतील!
या पुस्तकात नगरांची माहिती घेताघेता अनेक अज्ञात मजेशीर गोष्टी वाचायला मिळतात. जसे की, श्रीलंकेत लोक स्वतःला सिंह समजून घेतात. त्यांची भाषा सिंहली! पण श्रीलंकेत एकही सिंह नाही! त्यापुढे त्यांचे विरोधक मात्र स्वतःला वाघ (तामिळ वाघ) मानतात. पण ते ज्या भारतातून गेले आहेत त्या भारतात वाघ आणि सिंह हे दोन्ही प्राणी आहेत. हा एकच देश आहे जेथे वाघ आणि सिंह आहेत. पण सिंह प्राण्याचा वेदांमध्ये फारसा उल्लेख नाही. पण भारतीयांना सिंहाचे फार आकर्षण आहे. म्हणून अनेकांच्या शेवटी सिंह किंवा सिंघ लावले जाते. सिंह हा राजा! वाघासारखा जंगलात लपून नाही राहत. तो उघड्यावर राहतो. कुटुंबात राहतो. त्यामुळे भारतात राज्याच्या राजगादीला सिंहासन असेही म्हटले जाते! मग हा सिंह वेदांमध्ये का नाही? कारण त्याकाळात त्या भागात जंगल आणि पाणी मुबलक होते. सिंह यापासून दूर राहतो.
पुस्तकाचा आवाका इतका मोठा आहे की त्याचा परिचयदेखील तसाच मोठा होत गेला आहे. असो.
जेरुसलेममधून भारतात ज्यू आले. त्यांचे भारतीयांनी स्वागत केले. पण पोर्तुगिजांनी भारतात त्यांना बळजबरीने धर्मांतरित केले.. तसेच एक माहिती अशीही वाचायला मिळते की क्लिओपात्रा भारताकडे निघाली होती, पण रस्त्यात तिची हत्त्या झाली.
भारताविषयी आकस-आकर्षण असलेले देशी-विदेशी विद्वान भारतीयांच्या उगमाचे सिद्धांत सांगत आले. अनेक वाद निर्माण केले गेले. काही झाले. सिंधू संस्कृती ही वैदिक संस्कृती नव्हती! आर्य-अनार्य! आर्य आणि द्रविड असे हे वाद! पण लेखकाने अतिशय अनोख्या शैलीत या सगळ्यांना कमजोर ठरवले आहे. म्हणून हे पुस्तक प्रत्येकाने वाचावे. त्यातील तथ्य शोधावेत. खरं की खोटं स्वतः ठरवावं…
डाव्या वळणाच्या अर्ली इंडियन्सपेक्षा हे पुस्तक नक्की वाचायला उजवे आहे हे पक्के! कारण हे पुस्तक वाद वाढवत नाही तर एकोपा कसा होता हे सांगते. उत्तर-दक्षिण वेगळे नाहीत हे सिद्ध करते. ऋग्वेदातील त्या प्रसिद्ध युद्धाचेही वर्णन लेखक करतो, ज्यात दहा जमातींच्या युतीविरुद्ध भारतीय एक जमात लढली.
लेखक संजीव संन्याल हे निश्चितच इतिहासकार किंवा त्या विषयातील पदवीधर नाहीत. ते आहेत आंतरराष्ट्रीय पातळीवर काम करणारे अर्थतज्ज्ञ! पण त्यांनी एक नव्हे, दोन नव्हे, चक्क अडीच वर्षे या विषयासाठी सुट्टी घेऊन अभ्यास आणि प्रवास करून हा लेखनप्रपंच केला. शेवटी या पुस्तकाची मूळ इंग्रजी प्रत पेंग्विन प्रकाशनाने हिसकावून घेऊन मुद्रित केली. कारण लेखक या विषयात आणखी अभ्यास करू इच्छित होते. जगभर लाभलेला प्रचंड प्रतिसाद हा पुस्तकाला नव्हे तर भारतीय संस्कृती व इतिहासाला लाभला असा नम्र भाव लेखकाने व्यक्त केला आहे.
वरील विवेचन केवळ एका प्रकरणातील आहे. हे लहानसे पण फार महत्त्वपूर्ण माहिती असलेलं पुस्तक आहे. पुढील प्रकरणात पुरातत्वीय पुरावे दिलेले आहेत. विविध ठिकाणचे उत्खनन आणि त्यात सापडलेल्या पुरातन वस्तू, त्यांचे फोटो आणि त्यांचे वर्णन यात वाचायला, पाहायला मिळते. पुस्तकात या प्रकारच्या पुराव्यांचा मोठा भरणा आहे. या पुस्तकाची भाषा अतिशय सोपी आणि सुटसुटीत आहे. विवेकानंद केंद्रद्वारा संचालित शाळांमध्ये हे अभ्यासक्रमात समाविष्ट केलं गेलेलं पुस्तक आहे.
पुस्तक: सप्त सरितांचा प्रदेश
लेखक: संजीव संन्याल
मराठी अनुवाद: संजीव जोशी
प्रकाशन: भारतीय विचार साधना
पृष्ठ: ३२६ मूल्य: ४००/-
टपाल खर्च: ४५/-
टिप: प्रकाशकांनी वाढवलेली किंमत छपाईमध्ये राहून गेल्याने स्टिकर लावून वाढवलेली आहे.

वितरणः ग्रंथ संवाद वितरण (8383888148)