पालघर जिल्ह्याच्या वाडा तालुक्यातील रस्त्यांची ही स्थिती आहे. वाड्यातील एसटी थांब्याच्या आसपास सर्वत्र असेच रस्ते आहेत. मधला रस्ता सिमेंट काँक्रिटचा व बाजूच्या दोन्ही बाजूस कच्चा रस्ता. वास्तविक ज्या कंत्राटदाराने काँक्रिटचा रस्ता बांधला त्यानेच बाजूचा भागही व्यवस्थित डांबरी रस्ता करायचे बंधनकारक असते. खरेतर तालुका पंचायत समितीने त्यावर लक्ष ठेवणे गरजेचे असते. परंतु संपूर्ण वाडा तालुक्यात असेच अर्धवट रस्ते बांधलेले दिसतात.

एका औषध दुकानदाराने सांगितले की, गेली सुमारे २० वर्षे रस्ते असेच अर्धवट अवस्थेत आहेत. वाडा ग्रामपंचायत समितीच्या आजूबाजूचा रस्ताही असाच आहे. इतकेच नव्हे तर बाजूला एक बांधकामाचे साहित्य विक्रीचे दुकान असून त्या दुकानात विक्रीला आणलेली माती वा वाळूही हा दुकानदार बाजूच्या रस्त्यावरच ठेवतो, अशी नागरिकांची तक्रार आहे. तसेच शासकीय विश्रामगृहाच्या आजूबाजूलाही बरेच टेम्पो उभे करून ठेवलेले असतात. एसटी आगाराच्या समोरच सरकारी रुग्णालय आहे. आसपास बाजारपेठही आहे. सकाळ-संध्याकाळ येथे वाहतूकही मोठ्या प्रमाणावर असते. अनेकवेळा या चौकात वाहतूककोंडी होते. मी जवळजवळ दोन दिवस या परिसरात होतो. पण साधा पोलीस हवालदारही येथे दिसला नाही. लवकरच जिल्हा परिषदेच्या निवडणुका आहेत. या परिसरातील उमेदवारांनी रस्त्याच्या परिस्थिती तसेच वाहतूककोंडीबाबत ठोस निर्णय घ्यावेत ही अपेक्षा!
(लेखक विजयकुमार काळे ज्येष्ठ पत्रकार आहेत.)

