ऍड. उज्ज्वल निकम यांनी लोकसभेच्या निवडणुकीत भारतीय जनता पार्टीचे उमेदवार म्हणून निवडणुक लढवलेली असताना त्यांची सरकारी वकील म्हणून पुन्हा नेमणूक करून, राजकीय पक्षाच्या एका कार्यकर्त्याची सरकारी वकीलपदावर नियुक्ती करुन भाजपा सरकार चुकीचा पायंडा पाडत आहे. उज्ज्वल निकम यांच्या सरकारी वकीलपदाच्या नियुक्तीस काँग्रेसचा तीव्र विरोध असून सरकारने त्याचा फेरविचार करावा, अशी मागणी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी आज मुंबईत एका पत्रकार परिषदेत केली.
भारतीय जनता पक्षाचे सरकार विद्यार्थी व तरुणांची परीक्षा पाहत आहे. नीटमध्ये पेपरफुटी झाली असतानाही सरकार त्याकडे गांभिर्याने पाहत नाही. सरकारची भूमिका वेळकाढूपणाची व विद्यार्थ्यांवर अन्याय करणारी आहे. केंद्रीय मंत्र्यांनी आधी पेपर फुटला नाही असे सांगितले होते. आता पेपरफुटी झाल्याचे उघड होताच गुजरात व बिहारमध्ये पेपर फुटल्याचे सांगत आहेत. पण या दोन राज्यात तर भाजपाचेच सरकार आहे. सरकारने नीट परीक्षाच रद्द करावी अशी काँग्रेसची मागणी आहे, असे ते म्हणाले.
राज्यात पोलीस भरतीसाठी शारीरिक परिक्षा घेतल्या जात आहेत. पावसाळा सुरु झाला असताना शारीरीक परिक्षा घेणे विद्यार्थ्यांवर अन्याय करणारे आहे. पावसाळ्यात मैदानात चिखल असतो. त्यामुळे अनेक उमेदवारांना त्याचा त्रास होतो. दुखापत होण्याचीही शक्यता असते. हे सरकार व पोलीस प्रशासन यांनी लक्षात घ्यायला हवे होते. पोलीस भरतीच्या शारीरीक परीक्षांबाबत सरकारने फेरविचार करावा, असेही नाना पटोले म्हणाले.
राज्यात बोगस बियाणे व खतांचा सुळसुळाट
राज्यात आजही दुष्काळाची परिस्थिती गंभीर आहे. खरीप हंमाग सुरु झाला आहे. पण राज्यात बि-बियाणे, खते व औषधांचा पुरेसा साठा उपलब्ध नाही. जी खते, बियाणे बाजारात आहेत ती बोगस आहेत. बोगस बियाणे विकून व्यापारी शेतकऱ्यांची फसवणूक करत आहेत. ही बोगस खते, बियाणे व औषधे गुजरात व आंध्र प्रदेशातून महाराष्ट्रात येत आहेत. राज्य सरकारने या बोगस बियाणे व खतविक्रेते आणि कंपन्यांवर कठोर कारवाई करून शेतकऱ्यांची फसवणूक व लूट थांबवावी. आचारसंहितेचे कारण देऊन शेतकऱ्यांना कर्जपुरवठा केला जात नव्हता. आता आचारसंहिता संपलेली आहे. राज्य सरकारने लक्ष घालून तातडीने विनाअडथळा कर्जपुरवठा होईल याची तजवीज करावी अथवा सरकाने निधी उपलब्ध करुन द्यावा, असेही ते म्हणाले.