Thursday, November 21, 2024
Homeन्यूज अँड व्ह्यूजवाचा एका सामान्य...

वाचा एका सामान्य शिक्षिकेचे शाळेतले प्रयोग!

‘माझे शाळेतले प्रयोग’ हे पहिली ते चौथीच्या वर्गास शिकवणाऱ्या एका सामान्य शिक्षिकेचे शैक्षणिक प्रवासवर्णन आहे. या पुस्तकाच्या लेखिका स्मिता गौड यांनी जिल्हा परिषद शाळेत २४ वर्षे अध्यापनकार्य केले.‌ त्यानंतर त्या प्रशासकीय सेवेत अधिकारी पदावर रुजू झाल्या. त्यांचा हा प्रवास प्रेरणादायी आणि वाचनीय आहे. या पुस्तकात त्यांनी ३१ प्रकरणांद्वारे आपली शैक्षणिक सेवा, त्यात केलेले विविध प्रयोग उत्तमरीत्या मांडले आहेत. त्यांनी मांडलेल्या मनोगताचा हा काही भाग-

‘माझे शाळेतले प्रयोग’ हे पहिली ते चौथीच्या वर्गास शिकवणाऱ्या एका सामान्य शिक्षिकेचे शैक्षणिक प्रवासवर्णन आहे. पुण्यापासून तीनशे किलोमीटर अंतरावरील एका शाळेत शिक्षिका म्हणून रुजू झाल्यापासून माझा हा प्रवास सुरू होतो आणि महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून शिक्षणाधिकारीपदी निवड झाल्यानंतर मी पुन्हा पुण्यात परतले, तेथे तो संपतो. दरम्यानच्या पंधरा वर्षांत घडलेली शिक्षणापासून शिक्षणापर्यंतची ही गोष्ट.

गोष्टीची सुरुवात होते पंचवीस वर्षांपूर्वी. गडहिंग्लज तालुक्यात कर्नाटक सीमेलगत असलेली ‘विद्या मंदिर, नांगनूर’ ही शाळा. येथील वर्गात बसलेले छोटेछोटे विद्यार्थी हे माझे सहप्रवासी. शिक्षणाचा सोपान चढण्यासाठी त्यांनी टाकलेले पहिले पाऊल अडखळणार नाही, थकणार नाही याची दक्षता घेत आमची शिक्षणवारी सुरू झाली. मुलांमध्ये दडलेल्या उपजत क्षमतांना  संधी देत त्यांच्या बुद्धीचा, मनाचा आणि शरीराचा महत्तम विकास घडवृन आणणे, हे माझे लक्ष्य होते. मात्र ते अजिबात सोपे नव्हते. भविष्य घडणे किंवा बिघडणे हे पूर्णतः माझ्या कार्यकुशलतेवर अवलंबून होते. उच्चतम नैतिकता असलेल्या व्यवसायात आपण पदार्पण केले आहे, या जाणिवेने माझ्या मनात शिक्षकी पेशाबद्दल प्रतिष्ठेची भावना जागृत झाली. तीच माझी सर्वोच्च प्रेरणा बनली.

मी हा पेशा मनापासून स्वीकारला, मग बाकीच्या गोष्टी आपोआप घडत गेल्या. अभ्यास, वाचन, चिंतन, मनन, शिक्षण, प्रशिक्षण, निरीक्षण, पर्यटन अशा विविध माध्यमांतून मी स्वतःस सक्षम बनवत गेले. वाढत्या अनुभवातून शहाणपण येत गेले. शिक्षणाचा नेमका अर्थ उमगत गेला. विद्यार्थ्यांशी, सहकारी शिक्षकांशी, पालकांशी, ग्रामस्थांशी जोडल्या गेलेल्या आत्मीय नात्यातून परस्परांवरील विश्वास दृढ झाला. मग शिक्षक असणे ही फक्त नोकरी उरली नाही, ते सेवाभावी व्रत बनले. शाळा ही परिवर्तनाची प्रयोगशाळा बनली. या अनोख्या प्रयोगशाळेत माझा संपर्क निर्जीव रसायनाशी नव्हे, तर सजीव चैतन्याशी होता. पुढे जिल्ह्याचे शैक्षणिक प्रशासन करतानाही माझी अध्यापनातील ही प्रयोगशील पार्श्वभूमी मला पथदर्शी ठरली.

या शाळेशी, विद्यार्थ्यांशी आणि गावाशी जोडले गेलेले ऋणानुबंध हा कथानकाचा पाया असला, तरी वर्गात प्रत्यक्ष घडलेली अध्ययन-अध्यापन प्रक्रिया हा विषयाचा गाभा आहे. शिकणे आनंददायी व्हावे, यासाठी वर्गात वापरलेली तंत्रे, क्लृप्त्या व उपक्रम पुस्तकात जागोजागी आपणास सापडतील. विविधांगी शिक्षकभान जोपासताना केलेले चिंतनही अधूनमधून डोकावेल. स्वतःचे शिक्षण पूर्ण करण्यासाठी कराव्या लागलेल्या तडजोडी, प्रसंगी दाखवलेला खंबीरपणा असे काही व्यक्तिगत प्रसंगही पुस्तकात ओघाने येतील. थोडक्यात सांगायचे तर; विद्यार्थी दशेत मी कणाकणाने वेचले ते शिक्षण, शिक्षकी पेशा स्वीकारून विद्यार्थ्यांसोबत जगले ते शिक्षण, मुलींसोबत पालक म्हणून अनुभवले ते शिक्षण आणि शिक्षणाधिकारी म्हणून प्रशासकाच्या नजरेने परीक्षले ते शिक्षण; अशा विविध भूमिकांतून शिक्षणाकडे तटस्थपणे पाहताना माझ्या अल्पमतीस जे उमगले, ते मांडण्याचा हा छोटासा प्रयत्न आहे.

प्रत्येक शिक्षक त्याला सोपवलेले ज्ञानदानाचे पवित्र कार्य मनोभावे पार पाडतच असतो. मी काही वेगळे केले असे नाही. परंतु यानिमित्ताने शिक्षणातील साचलेपण जाऊन ते प्रवाही व्हावे, प्रत्येक विद्यार्थ्यासाठी गुणवत्तापूर्ण शिक्षणाची पाऊलवाट तयार व्हावी आणि अशा अनेक पाऊलवाटा एकत्र येऊन तिची चळवळ व्हावी, यासाठी हा खटाटोप.

माझे शाळेतले प्रयोग

लेखिका: स्मिता गौड

प्रकाशक: राजहंस प्रकाशन

मूल्य: २४०/- रुपये / पृष्ठे: १३९

टपालखर्च- ४०/- रुपये

प्रयोग

पुस्तक खरेदीसाठी संपर्क: ग्रंथ संवाद वितरण- (8383888148, 9404000347)

Continue reading

श्री महालक्ष्मीचा महिमा सांगणारी ‘नारायणी’..

नारायणी, हा लेखक किशोर दीक्षित यांनी लिहिलेला लघुग्रंथ नुकताच हाती पडला आणि जाणून घेतले त्याविषयी.. आद्यन्तरहितेदेवी ह्यादिशक्ती खगोचरे।  योगिनी योगसंभूते महालक्ष्मी नमोऽस्तु ते।।  लेखक किशोर दीक्षित आपल्या मनोगतात लिहितात- आज 'नारायणी' हा लघुग्रंथ आपल्या हाती देताना मनास खूप आनंद व समाधान वाटत...

तुम्ही सर्वोत्तम जीवन जगत आहात का?

तुम्ही सर्वोत्तम जीवन जगत आहात का? तुम्ही तुमच्या उद्देशाच्या दिशेने यात्रा करत आहात की त्यापासून दूर जात आहात? तुम्ही ज्या पद्धतीने जगत आहात ते तसंच चालू ठेवून तुम्हाला स्वतःविषयीची हीच कथा चालू ठेवायची आहे की तुम्हाला वेगळ्या भवितव्याची अपेक्षा...

जाणून घ्या इस्रोची विस्मयजनक अवकाशयात्रा!

इस्रोची विस्मयजनक अवकाशयात्रा, हे लेखक सुरेश नाईक यांचे विज्ञान पुस्तक. सचित्र वाचनीय असलेले हे पुस्तक  आर्ट पेपरवर छापलेले आहे. लेखक सुरेश नाईक यांनी या पुस्तकाबद्दल आपली भूमिका मांडली आहे. त्यातील काही भाग इथे देत आहोत. 'चंद्रयान-३'चे यश अतिशय गौरवास्पद होते आहे. याची...
Skip to content