उद्योग, जनसंपर्क, साहित्य, पत्रकारिता अशा विविध क्षेत्रात रविंद्र आवटी यांचा वावर राहिला. त्यांनी माणसांचे प्रेम मिळवले. यापुढील काळातदेखील त्यांनी आपल्या प्रदीर्घ अनुभवाचे समाजासाठी योगदान देत राहवे, असे विचार महाराष्ट्राचे शालेय शिक्षण मंत्री आणि मुंबई शहराचे पालकमंत्री दीपक केसरकर यांनी व्यक्त केले.
मुंबईच्या दादर माटुंगा सांस्कृतिक केंद्रात रविंद्र आवटी यांच्या जेंटल (इंग्रजी कविता संग्रह), प्रकल्प व्यवस्थापनाचे तंत्र आणि जनसंवाद, या तीन पुस्तकांचे तसेच डॉ. प्रमोद बेजकर यांच्या शरीराचे विलक्षण विज्ञान, या पुस्तकांचे प्रकाशन केसरकर यांच्या हस्ते शनिवारी झाले. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी नाटककार सुरेश खरे, ज्येष्ठ पत्रकार विजय कुवळेकर आणि श्रीकांत बोजेवार, गीतकार प्रवीण दवणे, उद्योगपती नीलकंठ श्रीखंडे आणि विठ्ठल कामत तसेच विविध क्षेत्रातील मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.

रविंद्र आवटी ज्या क्षेत्रात गेले तिथे त्यांना आंतरिक प्रेम जाणवत गेले आणि त्या ठिकाणी ते आपला ठसा उमटवत गेले. नव्या माध्यमात प्रवेश करताना त्यांनी त्यांचा दृष्टीकोन बदलला. तिथे संवाद साधला. त्यामुळेच ते यशस्वी झाले. त्यांच्या कार्यावर नजर टाकली असता आपल्याला नक्कीच ऊर्जा मिळते, असे प्रशंसोद्गार विजय कुवळेकर यांनी काढले.
प्रकल्पाच्या कार्यात अडथळे येत असताना ते वेळीच कुशलतेने सोडवले नाही तर प्रकल्पाची येणाऱ्या काळात किंमत तर वाढतेच शिवाय वेळदेखील वाया जातो. अशावेळी उत्तम प्रशासन, जनसंपर्क, लोकांच्या सवयी यांची पुरेपूर जाण असणे गरजेचे आहे. रविंद्र आवटी यांच्या पुस्तकामुळे प्रकल्प कशाप्रकारे पूर्ण करावे, या ज्ञानात भर पडते. त्याचबरोबर त्यांनी काही विघ्न आणणाऱ्यांच्या अनिष्ट सवयींबाबतही येणाऱ्या काळात लिहावे, असे मत विठ्ठल कामत यांनी व्यक्त केले.

जनसंपर्क क्षेत्रातील विविधांगे तसेच प्रकल्पांच्या उभारणीच्या वेळी येणाऱ्या विविध प्रकारच्या आव्हानांना सामोरे जाण्यासाठी कोणकोणते व्यवहार्य निर्णय घ्यावे लागतात, याचे मार्गदर्शन करण्याचा प्रयत्न आपण केल्याचे रविंद्र आवटी यांनी आपल्या मनोगतात सांगितले.
जनसंवाद आणि प्रकल्प व्यवस्थापनाचे तंत्र या पुस्तकांतून वाचकांना अनेक गोष्टी नव्याने समजू लागतात. त्यामुळेच ही पुस्तके इंग्रजीत अनुवादित करून भारतभर वाचली जावीत, अशा शब्दांत सुरेश खरे यांनी आपल्या सदिच्छा व्यक्त केल्या तर स्वतःचे मोठेपण इतरांना कळू न देणे, हेच त्यांचे मोठेपण आणि साधेपण राहिले तसेच त्यांनी सतत इतरांसाठी आधारवडाची भूमिका बजावली, असे विचार प्रविण दवणे यांनी व्यक्त केले.

श्रीकांत बोजेवार यांनी शरीराचे विलक्षण विज्ञान याविषयी तर नीलकंठ श्रीखंडे यांनी उद्योग उभारणीच्या कामात भारतात येत असलेल्या आव्हानांबाबत विचार व्हावा, असे आपल्या भाषणात सांगितले. डॉ. प्रमोद बेजकर यांनी गुगल किंवा समाजमाध्यमावर उपलब्ध नसलेल्या माहितीच्या स्वरुपात तसेच रंजक पद्धतीने शरीराचे विलक्षण विज्ञान हे पुस्तक लिहण्याचा प्रयत्न केल्याचे सांगितले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक अद्वैत ऐनापुरे यांनी तर सूत्रसंचालन प्रसिद्ध निवेदिका शिबानी जोशी यांनी केले. जनसंपर्क क्षेत्रात लौकिक असलेले निलय वैद्य यांनी उपस्थितांचे आभार मानले. प्रारंभी विजय कदम यांनी रविंद्र आवटी यांच्या मराठी तर प्रीती पवार यांनी त्यांच्या इंग्रजी अनुवादाचे वाचन केले. कार्यक्रमास अनिल कालेलकर, विसुभाऊ बापट, अभिनेत्री फैयाझ, निर्मात्या अमृता राव, चंद्रकांत लिमये आदी मान्यवर उपस्थित होते.