काँग्रेसमध्ये महिलांना नेहमीच दुययम दर्जाची वागणूक मिळत असून रामटेक लोकसभा मतदारसंघातील काँग्रेसच्या उमेदवार रश्मी बर्वे यांचा जाणूनबुजून गेम केला गेला असल्याचा आरोप शिवसेनेच्या प्रवक्त्या डॉ. मनीषा कायंदे यांनी काल केला.
विदर्भ दौऱ्यावर आलेल्या पूर्व विदर्भ महिला संपर्क नेत्या व शिवसेना सचिव आमदार डॉ. मनीषा कायंदे यांनी काँग्रेसवर खरमरीत टीका केली. रश्मी बर्वे यांच्या जातवैधता प्रमाणपत्राबाबत जातपडताळणी समितीकडे सुनावणी सुरु होते तसेच उच्च न्यायालयात याचिकाही दाखल केली होती. असे असूनही काँग्रेसच्या नेते मंडळींनी जाणूनबुजून बर्वे यांना तिकीट दिले. रामटेक हा लोकसभा मतदारसंघ अनुसूचित जातीच्या उमेदवारांसाठी राखीव ठेवला गेला आहे. परंतु रश्मी बर्वे यांचे जातवैधता प्रमाणपत्र रद्द झाल्यामुळे त्यांची उमेदवारी धोक्यात आली आहे. जातपडताळणी प्रमाणपत्रावरून आपल्या अडचणी वाढू शकतात हे ओळखूनच रश्मी बर्वे यांचा उमेदवारीचा अर्ज दाखल करताना त्यांना दिल्या जाणाऱ्या एबी फॉर्मवर दुसऱ्या क्रमांकावर त्यांचे पती श्याम कुमार बर्वे यांचे नाव टाकण्यात आले होते, असे त्या म्हणाल्या.

काँग्रेस नारीशक्तीचा पुकारा देऊन मतपेटीचे राजकारण करते. त्यांना रश्मी बर्वे यांच्या जागेवर दुसरी महिला उमेदवार मिळू शकत नाही हेच दुर्दैव आहे. रामटेक लोकसभा मतदारसंघातील काँग्रेसच्या उमेदवार रश्मी बर्वे यांचे जातवैधता प्रमाणपत्र रद्द करण्यात आले आहे. जातपडताळणी समितीने हा निर्णय जाहीर केला. त्यामुळे विदर्भात महाविकास आघाडीसाठी हा मोठा झटका मानला जात आहे. लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महिलांचे खच्चीकरण करण्याचे हे महाराष्ट्रातील एकमेव उदाहरण असेल, असेही त्या म्हणाल्या.
प्रतिभा धानोरकर करतात फक्त आणि फक्त अश्रूंचे राजकारण
चंद्रपूरमध्ये महायुतीचे उमेदवार सुधीर मुनगंटीवार यांच्या प्रचारातही डॉ. मनीषा कायंदे यांनी काँग्रेसवर हल्लाबोल केला. काँग्रेसची उमेदवारी मिळवल्यापासून चंद्रपूर येथील लोकसभेच्या उमेदवार प्रतिभा धानोरकर फक्त आणि फक्त अश्रूंचे व सहानुभूतीचे राजकारण करीत असल्याची टीका त्यांनी केली. माझे अश्रू पहा आणि मतदान करा, हे राजकारण विकासाच्या झंझावातासमोर फिके पडणार आहे, असेही त्या म्हणाल्या.

आम्ही कधीच कोणाच्याही अश्रूंचा अनादर केला नाही. पण अश्रूंचा वापर मतदान मिळविण्यासाठी कोण करीत असेल तर मात्र महायुती गप्प बसणार नाही. ही निवडणूक देशाला दिशा देणारी असून मोदी सरकारने केलेल्या दहा वर्षांच्या कामाच्या भांडवलावर आम्ही जनतेकडे मत मागत आहोत. परंतु काही उमेदवार भावनिक राजकारणाला पाठीशी घालत आहेत. जनतेला अश्रूंचे राजकारण व विकासाचे राजकरण यातील फरक चांगलाच कळत असून या निवडणुकीत चंद्रपूर येथील महायुतीचे उमेदवार सुधीर मुनगंटीवार मोठ्या मताधिक्याने निवडून येतील, असेही कायंदे म्हणाल्या.