Homeडेली पल्सराणी मुखर्जीने उलगडले...

राणी मुखर्जीने उलगडले ‘खिळवून ठेवण्याचे’ रहस्य!

गोव्यात इफ्फीच्या 54व्या महोत्सवादरम्यान आज हिंदी चित्रपट अभिनेत्री राणी मुखर्जी यांच्यासमवेत ‘खिळवून ठेवणाऱ्या भूमिका करताना’ या विषयावरील संवादसत्र चांगलेच रंगले. राष्ट्रीय पुरस्कार विजेते चित्रपट समीक्षक आणि गलत्ता प्लसचे मुख्य संपादक बरद्वाज रंगन यांनी सूत्रसंचालन केलेल्या या कार्यक्रमात राणी मुखर्जी यांचे जीवन आणि यशस्वी कारकीर्द उलगडली.

आपल्या चित्रपटांच्या प्रवासाबद्दल बोलताना त्यांनी, भारतीय स्त्रियांना कणखर व्यक्तिरेखा म्हणून साकारण्याचा सदैव प्रयत्न केल्याचे सांगितले. चित्रपट आणि त्यांतील व्यक्तिरेखा म्हणजे भारतीय संस्कृतीचे अवलोकन करण्याचा झरोका म्हणून परदेशात त्यांचा विचार केला जातो असेही त्यांनी सांगितले.

कलेशी इमान राखण्याच्या महत्त्वावर या यशस्वी अभिनेत्रीने भर दिला. कणखर चित्रपटांच्या आणि भूमिकांच्या समर्थनासाठी उभे राहणे महत्त्वाचे आहे. कधीतरी असे होऊ शकते, की त्या त्या वेळी तुम्हाला प्रेक्षकांची पसंती मिळणारही नाही. परंतु चित्रपटांच्या इतिहासात मात्र अशा चित्रपटांना आणि भूमिकांना निश्चितपणे स्थान मिळेल, असे त्यांनी आवर्जून सांगितले.

अभिनेत्याने वैविध्यपूर्ण भूमिका करण्याचे महत्त्व मुखर्जी यांनी अधोरेखित केले. अभिनेते अष्टपैलू असतील तर ते जीवनाचे विभिन्न पैलू समर्थपणे साकारू शकतात. मी माझ्या व्यक्तिरेखांमध्ये जेवढे वैविध्य आणेन तेवढे ते प्रेक्षकांसाठी आणि माझ्यासाठी रुचीपूर्ण ठरेल. व्यक्तिरेखांमधील या विविधतेतून मला स्फूर्तीही मिळते, असे त्यांनी स्पष्ट केले.

व्यक्तिरेखा साकारतानाच्या बारकाव्यांबद्दलही त्यांनी आपले विचार मांडले. काही विशिष्ट भूमिका करताना, वास्तव लकबी समजून घेण्यासाठी अभिनेते वास्तवातील व्यक्तींना भेटतात. परंतु त्याचबरोबर त्यांच्या खऱ्या-खुऱ्या भावभावनाही समजून घेणे महत्त्वाचे आहे. चित्रपटातील एखादा प्रसंग उठावदार ठरतो, तो त्यामागील भावनांमुळे. प्रेक्षकांच्या काळजापर्यंत पोहोचण्याच्या दृष्टीने भावना चितारणे महत्त्वाचे असते, असे त्या म्हणाल्या.

सिने-इंडस्ट्रीत वयपरत्वे मिळणाऱ्या दुय्यम वागणुकीबद्दल या ख्यातनाम अभिनेत्रीने, अभिनेत्यांनी आपल्या वयाची जाण ठेवून त्यानुसार भूमिका स्वीकारल्या पाहिजेत, म्हणजे मग प्रेक्षक त्यांचा स्वीकार करतील असे मत मांडले. वयपरत्वे मिळणाऱ्या दुय्यम वागणुकीवर तसेच इतर अडथळ्यांवरही मात करण्यास प्रेक्षकांनी त्यांना वेळोवेळी मदत केल्याचेही त्या म्हणाल्या.

मी वयाला फारसे महत्त्व देत नाही. माझ्या भूमिकांना न्याय देण्याचा मी नेहमी प्रयत्न करत आले आहे. प्रेक्षकांनी तुमच्या व्यक्तिरेखेवर विश्वास ठेवण्याची अर्धी लढाई, तुम्ही तसे दिसलात की जिंकली जाते, असे सांगत राणी मुखर्जी यांनी वयाविषयी स्वतःचा दृष्टिकोन सांगितला.

आपल्या प्रवासाबद्दल समाधानाची भावना व्यक्त करताना मुखर्जी यांनी, आजवर साकारलेल्या कोणत्याही भूमिकेबद्दल पश्चात्ताप वाटला नसल्याचे मोकळेपणाने सांगितले. मात्र, आमिर खान यांच्या पहिल्या निर्मितीच्या म्हणजे लगानच्या बाबतीत तारखा जुळत नसल्यामुळे मी दुर्दैवाने त्या चित्रपटाचा भाग होऊ शकले नाही, असेही त्या म्हणाल्या.

‘कुछ कुछ होता है’ मधील ‘टीना मल्होत्रा’ पासून, ‘कभी अलविदा ना कहना’ मधील ‘माया तलवार’ आणि ‘मिसेस चटर्जी व्हर्सेस नॉर्वे’ मधील ‘देबिका चटर्जी’पर्यंत रानी मुखर्जी यांच्या शेकडो सुंदर-सुंदर भूमिकांनी प्रेक्षकांच्या मनात घर केले आहे. त्यांनी वठवलेल्या भूमिकांपैकी त्यांची सर्वात आवडती भूमिका कोणती असे विचारले असता त्यांनी, ‘ब्लॅक’ चित्रपटातील भूमिका त्यांना त्यांच्या अंतःकरणाच्या जवळची वाटत असल्याचे सांगितले. त्या व्यक्तिरेखेने त्यांच्यात परिवर्तन घडवून आणले आणि एक माणूस म्हणून स्वतःला अधिक चांगले घडवण्यासाठी मदत केली, असे त्यांनी सांगितले. ब्लॅक मधील मिशेल मॅकनालीच्या व्यक्तिरेखेने एकाच वेळी मला प्रेरणाही दिली, आणि आव्हानही! ‘मेहंदी’मधील व्यक्तिरेखेनेही मला सक्षम केले, असेही त्या म्हणाल्या.

Continue reading

आता विद्यार्थ्यांना शाळा-महाविद्यालयांतच मिळणार एसटीचे पास

महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळातर्फे शिक्षण घेणाऱ्या लाखो विद्यार्थी-विद्यार्थिनीसाठी “एसटी पास थेट तुमच्या शाळेत” ही मोहिम राबविण्यात येणार असून त्यामुळे आता एसटीचे पास थेट त्यांच्या शाळा-महाविद्यालयात वितरित करण्यात येणार आहेत. राज्याचे परिवहन मंत्री तथा महाराष्ट्र राज्ये रस्ते परिवहन महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांनी...

रत्नागिरी, रायगड जिल्हयाला पुढच्या २४ तासांसाठी पावसाचा रेड अलर्ट

भारतीय हवामान खात्याकडून देण्यात आलेल्या अंदाजानुसार पुढच्या २४ तासांसाठी महाराष्ट्रातल्या रत्नागिरी, रायगड जिल्ह्यांना रेड अलर्ट तर पालघर, ठाणे, पुणे घाट, सातारा घाट, कोल्हापूर घाट आणि सिंधुदूर्ग यांना ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. प्रशासनातर्फे राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दल (एनडीआरएफ) व राज्य आपत्ती प्रतिसाद दल (एसडीआरएफ) पथकांना आपत्कालीन परिस्थितीकरीता सतर्क राहण्याच्या...

पंतप्रधान मोदी 4 दिवसांच्या परदेशवारीसाठी रवाना

पाकिस्तानवरच्या लष्करी कारवाईनंतर पहिल्यांदाच पंतप्रधान नरेंद्र मोदी आज तीन देशांच्या दौऱ्याकरीता रवाना झाले. या दौऱ्यात पंतप्रधान सायप्रस प्रजासत्ताक, कॅनडा आणि क्रोएशिया या तीन देशांना भेटी देतील. येत्या ते 19 जूनला पंतप्रधान मोदी मायदेशी परततील. सायप्रसचे राष्ट्राध्यक्ष निकोस ख्रिस्तोदौलिदीस यांच्या निमंत्रणावरुन...
Skip to content