नॅशनल अर्काइव्हज ऑफ इंडिया (एनएआय), म्हणजेच भारतीय राष्ट्रीय अभिलेखागाराने दिवंगत रफी अहमद किडवई यांच्या खासगी कागदपत्रांच्या संग्रहाचे नुकतेच अधिग्रहण केले. यामध्ये किडवई यांचा पंडित नेहरू, सरदार पटेल, श्यामा प्रसाद मुखर्जी, पी. डी. टंडन आदी प्रमुख नेत्यांबरोबरचा पत्रव्यवहार समाविष्ट आहे. कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्रालयाचे अतिरिक्त सचिव फैज अहमद किडवई यांनी एनआयएच्या महासंचालकांकडे ही कागदपत्रे सुपूर्द केली. दिवंगत हुसेन कामिल किडवई यांची मुलगी ताजीन किडवई, धाकटा भाऊ रफी अहमद किडवई आणि सारा मनाल किडवई यावेळी उपस्थित होते.
नॅशनल आर्काइव्ह्ज ऑफ इंडिया हे भारत सरकारच्या भूतकाळातील नोंदींचे जतन करते. सार्वजनिक नोंदी कायदा 1993च्या तरतुदीनुसार प्रशासक आणि संशोधकांच्या वापरासाठी या नोंदी सुरक्षित ठेवते. एक प्रमुख अभिलेखागार संस्था म्हणून, भारतीय राष्ट्रीय अभिलेखागार, अभिलेखीय जाणीवेला मार्गदर्शन करण्यात आणि आकार देण्यात महत्त्वाची भूमिका बजावते.
सार्वजनिक नोंदींच्या विशाल संग्रहाव्यतिरिक्त, एनएआयकडे आपल्या देशासाठी महत्त्वाचे योगदान देणाऱ्या विविध क्षेत्रांतील प्रख्यात भारतीय व्यक्तींच्या संग्रहातील खासगी कागदपत्रांचा समृद्ध आणि वाढता संग्रह आहे. रफी अहमद किडवई हे चैतन्यमय, तेजस्वी आणि प्रभावी व्यक्तिमत्व होते. आपल्या देशाच्या स्वातंत्र्यासाठी त्यांनी केलेले अखंड प्रयत्न आणि जातीयवाद आणि सर्व प्रकारच्या अंधश्रद्धांचे खंडन करण्यासाठी घेतलेले परिश्रम, यासाठी त्यांचे स्मरण केले जाते.
भारताला परकीय जोखडातून मुक्त करण्यासाठी आणि देशाला बळकट करण्यासाठी किडवई यांचे समर्पण त्यांच्या संपूर्ण राजकीय कारकिर्दीत अढळ राहिले. भारतीय कृषी संशोधन परिषदेने 1956मध्ये रफी अहमद किडवई पुरस्कारांची स्थापना करून, त्यांच्या योगदानाचा सन्मान केला. किडवई यांना त्यांच्या दळणवळण मंत्रीपदाच्या कार्यकाळात नवोन्मेश आणि परिणामकारकतेसाठी प्रतिष्ठा मिळाली, तर अन्न मंत्रालयातील त्यांच्या नेतृत्त्वाला प्रतिकूलतेवरील विजय म्हणून गौरवण्यात आले, ज्यामुळे त्यांना एक जादुगार आणि चमत्कार घडवणारे व्यक्तिमत्व म्हणून ओळख मिळाली.
रफी अहमद किडवई यांनी भारतीय स्वातंत्र्याचा पाठपुरावा करताना आणि नंतर आपल्या प्रशासकीय भूमिकांमध्ये कृती आणि समर्पणाला मूर्त रूप दिले. दळणवळणापासून ते शेतीपर्यंतच्या विविध क्षेत्रातील त्यांच्या योगदानाचा देशाच्या विकासावर कायमस्वरूपी प्रभाव पडला. एक वचनबद्ध स्वातंत्र्यसैनिक आणि कुशल प्रशासक म्हणून त्यांचा वारसा पुढील पिढ्यांना प्रेरणा देत आहे.