Homeटॉप स्टोरीपंतप्रधान नरेंद्र मोदी...

पंतप्रधान नरेंद्र मोदी आज साईचरणी…

पंतप्रधान नरेंद्र मोदी आज गुरुवार, २६ ऑक्टोबरला शिर्डी (जि. अहमदनगर) येथे भेट देणार आहेत. या भेटीत ते प्रथम श्री साईबाबा समाधी मंदिरात दर्शन आणि पूजा करतील. यावेळी मंदिरातील नवीन दर्शन रांग संकुलाचे उद्घाटनही ते करतील.

मोदी अकोले तालुक्यातील निळवंडे धरणाच्या डाव्या कालव्याचे जलपूजन करून निळवंडे धरण प्रकल्प देशाला समर्पित करणार आहेत. त्यानंतर काकडी विमानतळालगतच्या मैदानात शेतकरी मेळाव्यात शेतकरी व नागरिकांशी संवाद साधतील. यावेळी आरोग्य, रेल्वे, रस्ते, गॅस आणि तेल क्षेत्रातील सुमारे ७५०० कोटी रुपयांच्या बहुविध विकास प्रकल्पांचे उद्घाटन व लोकार्पण करून ते राष्ट्राला समर्पित करतील. 

शिर्डीत येणाऱ्या देश-विदेशातील भाविकांना सुलभ आणि सुरक्षित दर्शन घेता यावे. म्हणून साई संस्थानने १०९ कोटी रुपये खर्चून वातानुकूलित तीन मजली दर्शन रांग प्रकल्प तयार केला आहे. या दर्शन रांगेच्या माध्यमातून दिवसभरात एक लाख भाविकांना दर्शन घेता येणार आहे. १९ ऑक्टोबर २०१८ रोजी या प्रकल्पांचे भूमीपूजन पंतप्रधानांनी केले होते. त्यानंतर चार वर्षांत हा प्रकल्प पूर्ण करण्यात आला आहे. दर्शन रांग प्रकल्पाचे बांधकाम क्षेत्रफळ २ लाख ६१ हजार ९२० चौरस फूट आहे. घडीव दगडाची वातानुकूलित दर्शन रांग, प्रवेशासाठी ३ प्रवेशद्वार, एकाचवेळी सुमारे ४५ हजार भाविकांना मौल्यवान वस्तू, मोबाईल ठेवण्यासाठी लॉकर्सची व्यवस्था, ४८ बायोमेट्रिक पास काऊंटर, २० लाडू प्रसाद काऊंटर, २ साईंची विभूती काऊंटर, २ साईंचे कापड कोठी काऊंटर, २ बुक स्टॉल्स, १० देणगी कांऊटर, ६ चहा, कॉफी काऊंटर व बॅग स्कॅनर, २५ सुरक्षा तपासणी केंद्र, पहिल्या आणि दुसऱ्या मजल्यावर भाविकांसाठी १० हजार क्षमतेचे १२ वातानुकूलीत सभागृह, आरओ प्रक्रियेचे शुद्ध पिण्याचे पाणी, प्रथमोपचार केंद्र, अशी या दर्शन रांगेची वैशिष्ट्ये आहेत.

पंतप्रधान नरेंद्र मोदी

निळवंडे (उर्ध्व प्रवरा प्रकल्प) धरण जिल्ह्यातील दुष्काळी व जिरायत भागाला सुजलाम्-सुफलाम् करणारा प्रकल्प ठरणार आहे. डावा, उजवा, उच्चस्तरीय पाइप कालवा व उपसा सिंचन योजनेच्या माध्यमातून अकोले, संगमनेर, राहाता, श्रीरामपूर, कोपरगाव व सिन्नर (नाशिक) या तालुक्यातील १८२ गावांमधील ६८,८७८ हेक्टर (१ लाख ७० हजार २०० एकर) शेतजमीन ओलिताखाली येणार आहे. सिन्नर तालुक्यातील ६ गावांमधील २६१२ हेक्टर शेतजमीन वगळता अहमदनगर जिल्ह्यातील ६६,२६६ हेक्टर शेतजमीन सिंचनाखाली येणार आहे.

काकडी येथील शेतकरी मेळाव्यात ‘नमो शेतकरी महासन्मान निधी योजने’ची सुरूवात पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते करण्यात येणार आहे. या योजनेते महाराष्ट्रातील प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेच्या ८६ लाखांहून अधिक लाभार्थ्यांना दरवर्षी ६ हजार रुपयांची अतिरिक्त रक्कम देऊन त्यांना लाभ दिला जाणार आहे. यामुळे शेतकऱ्यांना आता वर्षाला १२ हजार रुपयांची मदत मिळणार आहे. यावेळी महाराष्ट्रातील ८६ लाख शेतकऱ्यांना १७१२ कोटी रुपयांच्या पहिल्या हप्त्याचे पंतप्रधानांच्या हस्ते ऑनलाईन वितरण केले जाणार आहे.

अहमदनगर येथील आयुष हॉस्पिटलचे उद्घाटन, महिला व बाल रुग्णालयाचे भूमीपूजन, शिर्डी विमानतळाजवळ नवीन टर्मिनल इमारतीचे भूमीपूजन मोदी यांच्या हस्ते होणार आहे. कुर्डूवाडी-लातूर रोड रेल्वे विभागाचे विद्युतीकरण (१८६ किमी), जळगाव ते भुसावळला जोडणारा तिसरा आणि चौथा रेल्वे मार्ग (२४.४६ किमी); एनएच-१६६ (पॅकेज-१) च्या सांगली ते बोरगाव विभागाचे चौपदरीकरण; इंडियन ऑईल कॉर्पोरेशन लिमिटेडच्या मनमाड टर्मिनलवर अतिरिक्त सुविधांचे लोकार्पणही पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते होणार आहे. कार्यक्रमादरम्यान, त्यांच्या हस्ते आयुष्मान कार्ड आणि स्वामित्व कार्डचे लाभार्थ्यांना वाटप करण्यात येणार आहे.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, महसूलमंत्री तथा अहमदनगरचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील, राज्य मंत्रिमंडळातील अन्य मंत्री, खासदार सदाशिवराव लोखंडे, डॉ. सुजय विखे पाटील व स्थानिक लोकप्रतिनिधी यावेळी उपस्थित राहणार आहेत.

Continue reading

‘जय श्रीराम’ ठाकरेंच्या शिवसेनेसाठी ‘सभागृहाचे अवमूल्यन’!

महाराष्ट्र विधानसभेत बुधवारी एक अनोखे राजकीय नाट्य घडले. भाजपाच्या आमदार देवयानी फरांदे यांनी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे ज्येष्ठ नेते व माजी मंत्री भास्कर जाधव यांना सभागृहात उघडपणे "जय श्रीराम" म्हणण्याचा आग्रह केला. या अनपेक्षित घटनेमुळे सभागृहात खळबळ उडाली...

भारताचा इराणबरोबर सौदा? वैद्यकीय मदतीच्या मोबदल्यात जहाजे??

युद्धाने होरपळलेल्या इराणला भारताने मानवतावादी मदतीचा हात पुढे केला आहे. इराणमधील भारतीय दूतावासाने जाहीर केले की, भारताकडून आलेली वैद्यकीय साहित्याची पहिली खेप इराण रेड क्रेसेंट सोसायटीकडे सुपूर्द करण्यात आली आहे. इराणने भारताच्या या मदतीबद्दल कृतज्ञता व्यक्त करत सांगितले, "भारताच्या...

न्यायालयच म्हणते- ‘मेलेला’ खटला ‘जगवणे’ आमचे काम नाही!

मुंबई उच्च न्यायालयाने दिवाणी न्यायशास्त्रात एक महत्त्वाचा निर्णय दिला आहे- दिवाणी न्यायालय सीपीसीच्या कलम 151 अंतर्गत आपल्या अंतर्भूत अधिकारांचा वापर करून एखादा खटला 'निरर्थक' (Infructuous) म्हणून फेटाळू शकते, जेव्हा त्यानंतरच्या घडामोडींमुळे मूळ वाद कारण (Cause of Action) अस्तित्त्वातच राहत...
Skip to content