ईव्हीएमशिवाय पंतप्रधान नरेंद्र मोदी निवडणूक जिंकूच शकत नाहीत. ईव्हीएममध्ये मशीनमध्ये काही नाही. त्यातल्या कागदावर मते असतात. या कागदाची मोजणी होत नाही. आम्ही निवडणूक आयोगाला या कागदांची मोजदाद करायला सांगितली तर ते तयार नाहीत. इथेच सारी गोम आहे, अशी टीका काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी आज मुंबईतल्या शिवाजी पार्कवरील जाहीर सभेत केली.
राहुल गांधी यांच्या भारत जोडो न्याय यात्रेच्या समापनानिमित्त इंडिया आघाडीच्या सभेत ते बोलत होते. आमची लढाई नरेंद्र मोदींशी नाही तर त्यांना चालवणाऱ्या शक्तीच्या विरोधात आहे. ही शक्ती मोदींना रोज काय करायचे ते सांगते. आज हे बोला, उद्या ते करा, परवा पाण्याखाली बसा.. तसे ते करतात. या शक्तीविरोधात आपल्याला एकजुटीने लढायचे आहे, असे ते म्हणाले.
इलेक्ट्रोलर बॉण्ड म्हणजे मुंबईतल्या रस्त्यांवरील फेरीवल्यांकडून गोळा करण्यात येणाऱ्या हफ्तावसुलीचे राष्ट्रीय स्वरूप आहे. चार प्रकारे ही खंडणीवसुली केली जाते. कंत्राटे द्या आणि मग खंडणी गोळा करा. ईडी, सीबीआय, इन्कम टॅक्स मागे लावा आणि खंडणी गोळा करा. बोगस कंपन्या तयार करून खंडणी जमवा आणि खंडणी गोळा करा व नंतर कंत्राटे द्या, अशा या पद्धती आहेत, असे ते म्हणाले.
या सभेत बोलताना शिवसेनेच्या ठाकरे गटाचे नेते उद्धव ठाकरे यांनी अब की बार भाजपा तडीपारचा नारा दिला. नरेंद्र मोदींना ते व त्यांच्या खुर्चीपलीकडे परिवार आहे कुठे? कशाला हवेत ४०० पार? त्यांना घटना बदलायची आहे. भारत सरकार म्हणण्याऐवजी ते आता म्हणतात मोदी सरकार.. का देशाचे नावही आता बदलणार आहात का, असा सवालही त्यांनी केला.
प्रकाश आंबेडकर यांनी आपल्या भाषणात इलेक्ट्रोलर बॉण्डमध्ये बोगस कंपन्यांचा वापर झाल्याबद्दल जाब विचारण्याचे आवाहन केले. ज्या कंपनीचा फायदाच २०० कोटींचा आहे ती कंपनी भाजपाला १३०० कोटींचा निधी देऊ कसा शकते, असा सवाल त्यांनी केला.
शरद पवार, तेजस्वी यादव, मेहबुबा मुफ्ती, फारूख अब्दुल्ला, कल्पना सोरेन, एम. के. स्टॅलिन आदींची यावेळी भाषणे झाली.