Homeपब्लिक फिगरपंतप्रधान मोदींनी केले...

पंतप्रधान मोदींनी केले पुण्यात मेट्रोसह विविध प्रकल्पांचे लोकार्पण

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पुणे मेट्रोच्या टप्पा २च्या पूर्ण झालेल्या दोन मार्गिकांचे हिरवा झेंडा दाखवून लोकार्पण केले. शिवाजीनगर येथील पोलीस मुख्यालय येथे आयोजित या कार्यक्रमात मेट्रो लोकार्पणासह पिंपरी-चिंचवड महानगरपालिका अंतर्गत कचऱ्यापासून ऊर्जा निर्माण करणाऱ्या (वेस्ट टू एनर्जी) संयंत्राचे उद्घाटन, पुणे आणि पिंपरी चिंचवड महानगरपालिकेद्वारे प्रधानमंत्री आवास योजनेंतर्गत बांधण्यात आलेल्या घरांचे लाभार्थ्यांना हस्तांतरण, पिंपरी-चिंचवड मनपा आणि पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणामार्फत प्रधानमंत्री आवास योजनेंतर्गत बांधण्यात येणाऱ्या घरांचे भूमिपूजनही पंतप्रधानाच्या हस्ते करण्यात आले.

यावेळी राज्यपाल रमेश बैस, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार, पालकमंत्री चंद्रकांत पाटील, सहकारमंत्री दिलीप वळसे पाटील, विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे, आमदार चंद्रशेखर बावनकुळे आदी उपस्थित होते.

पुणे शहर हे युवकांची स्वप्ने पूर्ण करणारे शहर

पुणे शहर हे देशाच्या अर्थव्यवस्थेला गती देणारे, युवांची स्वप्ने पूर्ण करणारे शहर आहे, असे सांगून पंतप्रधान मोदी म्हणाले की, या पाच वर्षात पुण्यात सुमारे २४ कि.मी. मेट्रोचे जाळे सुरू झाले आहे. पुण्यासारख्या शहरात प्रदूषण कमी करण्यासाठी मेट्रो रेल्वे आवश्यक असून हे जाळे वाढविण्यासाठी आम्ही प्रयत्न करत आहोत. २०१४ पर्यंत देशात २५० कि.मी. पेक्षा कमी मेट्रोचे जाळे होते. आता देशात ८०० कि.मी. पेक्षा अधिक मेट्रोचे जाळे तयार झाले असून आणखी 1 हजार किलोमीटरचे काम सुरू आहे. २०१४ मध्ये फक्त ५ शहरांत असलेली मेट्रो आज देशातील २० शहरांत संचालित आहे. महाराष्ट्रात मुंबई, पुणे आणि नागपूर येथे मेट्रो कार्यरत आहेत. मेट्रो ही आधुनिक भारतातील शहरांची नवी ‘जीवनरेषा’ बनत आहे, असेही मोदी म्हणाले.

‘वेस्ट टू वेल्थ’ संकल्पनेवर भर

जीवनाची गुणवत्ता सुधारण्यासाठी स्वच्छता महत्त्वाची आहे. आम्ही स्वच्छ भारत अभियान केवळ शौचालयांच्या निर्म‍ितीपुरते मर्यादित ठेवले नाही, तर कचरा व्यवस्थापनावर भर देत आहोत. कचऱ्याचे डोंगर हटविण्यासाठी प्रयत्न करत आहोत. ‘वेस्ट टू वेल्थ’ या संकल्पनेवर भर देत आहोत. पिंपरी चिंचवडचा ‘वेस्ट टू एनर्जी’ खूप उत्कृष्ट प्रकल्प असून यातून कचऱ्यापासून वीज बनणार आहे. यामुळे प्रदुषणाची समस्या नष्ट होण्यासह महानगरपालिकेची आर्थिक बचतही होणार आहे, असेही ते म्हणाले.

महाराष्ट्राने देशाच्या औद्योगिक विकासाला गती दिली

स्वातंत्र्यानंतर महाराष्ट्राच्या औद्योगिक विकासाने देशाच्या औद्योगिक विकासाला गती दिली आहे. म्हणून येथे औद्योगिक विकासाला अधिक गती देण्यासाठी पायाभूत सुविधांवर अधिक भर देण्यात येत आहे.  रेल्वेच्या विकासात २०१४ च्या तुलनेत १२ पट अधिक खर्च केला जात आहे. महाराष्ट्राच्या विविध शहरांना आसपासच्या इकॉनॉमिक हबशी जोडले जात आहे. मुंबई- अहमदाबाद हायस्पीड रेल्वे, दिल्ली-मुंबई इकॉनॉमिक कॉरिडॉरमुळे औद्योगिक विकास होणार आहे. वेस्टर्न डेडिकेटेड फ्रेट कॉरिडॉर मुळे महाराष्ट्राची उत्तर भारतासोबत रेल्वे जोडणी वाढणार आहे. महाराष्ट्र, तेलंगणा आणि छत्तीसगड यांच्यादरम्यान बनविण्यात आलेल्या पारेषण वाहिनी जाळ्यामुळे महाराष्ट्रातील उद्योगांना नवी गती मिळणार आहे. त्याचबरोबर ऑईल गॅस लाईन, औरंगाबाद इंडस्ट्रियल सिटी, नवी मुंबई विमानतळ, सेंद्रा बिडकीन औद्योगिक पार्क यांच्यात महाराष्ट्राच्या अर्थव्यवस्थेला नवी गती देण्याची क्षमता आहे, असेही पंतप्रधान मोदी म्हणाले.

डिजिटल क्षेत्रातील पायाभूत सुविधांच्या विकासात पुण्याचा मोठा वाटा

महाराष्ट्राचा विकास होईल तेव्हा भारताचा विकास होईल आणि भारताचा विकास होईल त्याचा तेवढाच लाभ महाराष्ट्राला होईल. गेल्या ९ वर्षांत इनोव्हेशन आणि स्टार्टअपच्या बाबतीत भारताने जगात नवी ओळख मिळवली आहे. आज स्टार्टअपची संख्या १ लाखाच्या वर झाली आहे. ही इकोसिस्ट‍िम डिजिटल इन्फ्रास्ट्रक्चरच्या विस्तारामुळे तयार झाली आहे. भारतात डिजीटल इन्फ्रास्ट्रक्चरचा पाया घालण्यात पुण्याचा मोठा वाटा आहे. स्वस्त स्मार्टफोन, गावोगावी पोहोचलेल्या इंटरनेट सुविधेमुळे हे शक्य झाले आहे. जगभरात सर्वाधिक वेगाने ५ जी इंटरनेट सुविधा पोहोचवणारा आपला देश बनला आहे. फिनटेक, बायोटेक, ॲग्रीटेक आदी सर्वच क्षेत्रात आपले युवा उत्कृष्ट काम करत आहेत, असेही पंतप्रदान म्हणाले.

गरिबांसाठी ४ कोटीपेक्षा अधिक घरांची निर्मिती

गेल्या ९ वर्षांत गाव आणि शहरात गरिबांसाठी ४ कोटीपेक्षा अधिक पक्क्या घरांची निर्मिती केली आहे. त्यातही शहरी गरिबांसाठी ७५ लाखांपेक्षा अधिक घरे बनविली आहेत. नवीन घरांच्या निर्मितीमध्ये पारदर्शकता आणली असून गुणवत्ताही सुधारली आहे. त्यातील जास्तीत जास्त घरे महिलांच्या नावावर करण्याचे काम आम्ही केले आहे. पहिल्यांदाच महिलांच्या नावावर काही संपत्ती नोंदणीकृत झाली आहे. पुणे आणि पिंपरी – चिंचवड शहरात प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत बांधलेल्या घरांमुळे नागरिकांसाठी येणारे सण विशेष आनंदाचे ठरतील, असेही मोदी म्हणाले.

Continue reading

‘बीएमसी’त इतिहास घडविणाऱ्या ‘मेट्रो वुमन’!

बीएमसीच्या म्हणजेच मुंबई महापालिकेच्या १३८ वर्षांच्या प्रदीर्घ इतिहासात आजपर्यंत आयुक्तपदावर कधीही महिला बसली नव्हती. मात्र, ३१ मार्च २०२६ हा दिवस त्या इतिहासाला कलाटणी देणारा ठरला. महाराष्ट्र सरकारने वरिष्ठ आयएएस अधिकारी अश्विनी भिडे यांची बीएमसी आयुक्तपदी नियुक्ती जाहीर केली. या...

श्रद्धा और सबुरी! दिल्लीहून शिर्डीला निघालेल्या विमानाचे इमर्जन्सी लँडिंग!!

दिल्लीहून शिर्डीच्या दिशेने निघालेल्या इंडिगो एअरलाइन्सच्या विमानाला मंगळवारी खराब हवामानामुळे गुजरातमध्ये सूरत विमानतळावर आपत्कालीन लँडिंग करावी लागली. विमानात १५०पेक्षा जास्त प्रवासी होते. शिर्डी विमानतळावर जोरदार वारे आणि अत्यंत कमी दृश्यमानता असल्याने लँडिंग अशक्य झाल्यावर पायलटने विमान सुमारे एक तास...

अश्विनी भिडे झाल्या मुंबई महापालिकेच्या पहिल्या महिला आयुक्त!

देशातील सर्वात मोठी आणि सर्वात श्रीमंत महापालिका म्हणून ओळखल्या जाणाऱ्या बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या (बीएमसी) आयुक्तपदी 'मेट्रो वुमन' म्हणून ओळख असलेल्या अश्विनी भिडे यांची नियुक्ती मंगळवारी जाहीर करण्यात आली. निवृत्त होत असलेले आयुक्त भूषण गागराणी यांच्याकडून भिडे यांनी पदभार स्वीकारला आहे....
Skip to content