रोमन कॅथोलिक ख्रिश्चन समाजाचे सर्वोच्च धर्मगुरू पोप फ्रन्सिस यांचे २१ एप्रिलला वयाच्या ८८व्या वर्षी निधन झाले. काल रोममधल्या व्हॅटिकन सिटीत त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले. भारताच्या राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यावेळी व्हॅटिकन सिटीमधील सेंट पीटर स्क्वेअर येथे पोप फ्रान्सिस यांच्या अंत्यसंस्काराच्या प्रार्थनेत सहभागी झाल्या. पोप यांच्यावरील अंत्यसंस्कारासाठी गेलेल्या अधिकृत भारतीय शिष्टमंडळाचा भाग असलेले केंद्रीय संसदीय कार्य आणि अल्पसंख्याक व्यवहार मंत्री किरेन रिजिजू, अल्पसंख्याक व्यवहार राज्यमंत्री जॉर्ज कुरियन आणि गोवा विधानसभेचे उपाध्यक्ष जोशुआ डिसुझा हेही यावेळी उपस्थित होते.

पोप फ्रान्सिस यांची समाजसेवा कायम स्मरणात राहील – पंतप्रधान मोदी
दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पोप फ्रान्सिस यांच्यावरील अंत्यसंस्काराच्या निमित्ताने एक्सवर पोस्ट करत आपल्या भावना व्यक्त केल्या. ते म्हणाले की, भारतीय जनतेच्या वतीने राष्ट्रपतीजींनी परमपूज्य पोप फ्रान्सिस यांना आदरांजली वाहिली आहे. पोप फ्रान्सिस यांनी समाजासाठी केलेली सेवा, जगाच्या कायम स्मरणामध्ये राहील. जग त्यांच्या समाजसेवेचे कायम स्मरण करेल.