एखादा कलाकार एखाद्या चित्रपटात फारफार तर दुहेरी भूमिका साकारताना दिसतो. पण आगामी सुशीला-सुजीत, या चित्रपटामध्ये प्रसाद ओक एक, दोन नव्हे तर तब्बल पाच भूमिका साकारताना दिसणार आहे. प्रसाद ओक या चित्रपटाचं दिग्दर्शन तर करणार आहेच, पण सोबतीने बाकी काही खास भूमिकादेखील निभावताना दिसणार आहे.

आजवर प्रसादने मराठी चित्रपटसृष्टीला अनेक सुपरहिट, दमदार चित्रपट तर दिले आहेतच, पण आगामी सुशीला-सुजीतची प्रेक्षकांना अधिक उत्सुकता आहे. या चित्रपटात प्रसाद करत असलेल्या तब्बल पाच भूमिका नक्की कोणत्या? तर प्रसाद या चित्रपटाचा कॅप्टन ऑफ द शीप म्हणजे दिग्दर्शक आहे. सोबतीला तो या चित्रपटात एक अतरंगी भूमिका साकारतोय! चित्रपटाची कथा प्रसादचीच आहे. या चित्रपटाचा निर्मातासुद्धा तोच आहे आणि लास्ट बट नॉट लिस्ट, या चित्रपटात प्रसादने एक सुंदर गाणंदेखील गायलं आहे.

एवढ्या सगळ्या भूमिका आणि त्यासुद्धा एकाच चित्रपटासाठी निभावणं ही खरंतर तारेवरची कसरत म्हणावी. पण प्रसादने या सगळ्या भूमिका एकदम चोख पार पाडल्या आहेत, ज्या तुम्हा सगळ्यांना येत्या 18 एप्रिलला सिनेमागृहात बघायला मिळतील. प्रसाद प्रत्येक सिनेमात काही न काहीतरी वेगळा प्रयत्न करून प्रेक्षकांना मोहित करण्याचा प्रयत्न करत असतो. त्यामुळेच आता प्रेक्षकांना सुशीला-सुजीतमध्ये काय वेगळं बघायला मिळणार याची उत्सुकता लागली आहे.