कर्डेलिया क्रूझ ड्रग्ज कांडातला फुटलेला एक पंच प्रभाकर साईल यांचा काल हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला. प्रसिद्ध अभिनेता शाहरूख खान याचा मुलगा आर्यन खान याच्यावर झालेल्या कारवाईमुळे या विषयाला जरा जास्तच महत्त्व आले होते. तब्बल २८ दिवस तो गजाआड होता. मुंबईहून गोव्याकडे निघालेल्या एका क्रूझवर राष्ट्रीय अंमली पदार्थ नियंत्रण संचालनालय म्हणजेच एनसीबीने भरसमुद्रात कारवाई केली आणि अंमली पदार्थांच्या व्यवहारात आर्यनसह १३ जणांना अटक केली.
आर्यनच्या अटकेनंतर खळबळ उडणे स्वाभाविकच होते. संपूर्ण माध्यमांचे त्या प्रकरणावर लक्ष होते. समाजमाध्यमातून मोठ्या प्रमाणात उलटसुलट प्रतिक्रियांना ऊत आला होता. त्यातच डोके भादरलेल्या, पीळदार शरीरयष्टीच्या, सावळ्या वर्णाच्या एका व्यक्तीचा आर्यन खानबरोबरचा सेल्फी समाजमाध्यमांवर आदळला. ही सेल्फी ज्या व्यक्तीची होती ती व्यक्ती होती किरण गोसावी. हे किरण गोसावी कोण आहेत, याची बहुतांश लोकांना माहितीच नव्हती. परंतु, एनसीबीच्या कारवाईत तब्बल आठ महिन्यांपासून कारागृहात राहिलेल्या आपल्या जावयामुळे व्याकूळ झालेल्या नवाब मलिक यांनी एका पत्रकार परिषदेच्या माध्यमातून या किरण गोसावींवर प्रकाश टाकला.
राज्याचे अल्पसंख्याक विकास मंत्री नवाब मलिक यांनी या पत्रकार परिषदेपूर्वी ट्विटरच्या माध्यमातून याला वाचा फोडली. काही चित्रफिती त्यांनी जारी केल्या आणि त्यात हे किरण गोसावी एनसीबीमध्ये कार्यरतच नसल्याचा दावा करत ते एनसीबीच्या अधिकाऱ्यांसोबत कारवाईत कसे, असा सवाल केला. आर्यनबरोबर गोसावी चालत असल्याचे दृष्यही या चित्रफितींतून जनतेसमोर आले. हे किरण गोसावी खंडणीबहाद्दर आहेत, फसवणूक-अफरातफरीचे काही गुन्हे त्यांच्याविरोधात नोंदविण्यात आले आहेत. थोडक्यात काय तर ही किरण गोसावी नावाची व्यक्ती सरळमार्गी नाही, असा खुलासा झाला.
मग, या किरण गोसावींचा या प्रकरणाशी काय संबंध, असा प्रश्न पडण्याआधीच किरण गोसावी फरार असल्याच्या बातम्या झळकू लागल्या. जी व्यक्ती फरार होते, याचा अर्थ ती सरळमार्गी नाही, हे सांगण्यासाठी कोणा ज्योतिषाची गरज नव्हती. त्यातच हे किरण गोसावी या प्रकरणातले एक पंच असल्याचे स्पष्ट झाले. मग पंच म्हणजे काय आणि या प्रकरणात त्याची गरज ती काय, असा प्रश्न डोकावला. तेव्हा समजले की पंच म्हणजे साक्षीदार. एनसीबीने केलेल्या या कारवाईतले साक्षीदार म्हणजेच पंच होते किरण गोसावी. घडलेली घटना पाहणारे ते प्रत्यक्षदर्शी होते. त्यामुळे ते या कारवाईच्या वेळी हजर असणे क्रमप्राप्तच होते. पण, सेलिब्रिटीबरोबर सेल्फी काढण्याचा मोह त्यांना आवरला गेला नाही. सेलिब्रिटीबरोबरची छबीच किरण गोसावींच्या मुळावर उठली.
नवाब मलिक एव्हढ्यावरच थांबले नाहीत. रोजच्या रोज समाजमाध्यमांच्या माध्यमातून, प्रत्यक्ष पत्रकार परिषदांच्या माध्यमातून त्यांनी एनसीबीच्या या कारवाईबद्दल तसेच येथील प्रमुख समीर वानखेडे यांच्यावरच प्रश्नचिन्ह उपस्थित केले. रोजच्या रोज नवनवे आरोप डागले जात होते. त्यातच भर पडली ती प्रभाकर साईल या व्यक्तीची. हे प्रभाकर साईल या कारवाईतले आणखी एक पंच. त्यांनी प्रसिद्धीमाध्यमांपुढे येत या कारवाईदरम्यान घडलेल्या काही तथाकथित घटनांची माहिती देत विविध स्वरूपाचे आरोप केले. यात खंडणी मागण्यापासून खोटा दस्तावेज तयार करण्यापर्यंतच्या अनेक आरोपांचा समावेश होता. या कारवाईतले फरार पंच किरण गोसावी यांचा आपण बॉडीगार्ड असल्याचा दावा या प्रभाकर साईल यांनी केला. या कारवाईदरम्यान किरण गोसावींनी शाहरूख खानच्या मॅनेजरशी संवाद साधून २५ कोटींची खंडणी मागितली. १८ कोटींवर सौदा नक्की झाला. त्यातले ५० लाख रूपये सॅम नावाच्या व्यक्तीने दिलेही. ते आपण स्वीकारून गोसावींकडे पोहोचवले. दुसऱ्या दिवशी पुन्हा ही रक्कम सॅमला परत करण्यात आली. मात्र, त्यावेळी त्यात १२ लाख रूपये कमी असल्याचे आढळले. या १८ कोटींमधले ८ कोटी समीर वानखेडे यांना देण्यात येणार होते. जवळजवळ १० कोऱ्या कागदांवर माझ्या सह्या घेण्यात आल्या, असे काही ठळक आरोप साईल यांनी आपल्या निवेदनात केले. तसे प्रतिज्ञापत्रही त्यांनी सहार पोलीसठाण्यात दिले व त्याआधारे तेथे गुन्हाही दाखल झाला.

महाराष्ट्र सरकारला अशा काहीतरी घटनेची प्रतीक्षाच होती. केंद्र सरकारने त्यांच्या विविध तपासयंत्रणांच्या माध्यमातून कारवाया करत राज्य सरकारमधल्या बड्याबड्या धेंडांना मेटाकुटीला आणले आहे. या कारवायांना कसे तोंड द्यायचे या प्रश्नाने सरकारला ग्रासले आहे. राज्य सरकारच्या पूर्वपरवानगीशिवाय सीबीआयला महाराष्ट्रात कारवाई करता येणार नाही, असा आदेश राज्य सरकारने जारी केला. त्यामुळे सीबीआयच्या कारवाईला बऱ्यापैकी चाप लागला असला तरी एनसीबी, आयकर, ईडी, अशा वेगवेगळ्या तपासयंत्रणांच्या कारवायांनी महाविकास आघाडीतल्या नेत्यांची झोप उडाली. अशा स्थितीत प्रभाकर साईलची भूमिका राज्य सरकारला पर्वणीच ठरली आणि कोणताही विलंब न लावता त्यांनी याच्या तपासासाठी एसआयटी गठित केली. परंतु ही एसआयटी गठित होण्याआधीच एनसीबीच्या दक्षता पथकाने समीर वानखेडेंवरील आरोपांची तसेच या कारवाईतल्या सत्या-सत्यतेची चौकशी सुरू केली व ती चालू आहे. त्यामुळे आता केंद्र व राज्य सरकार, अशा दोन सरकारांकडून ही चौकशी होत आहे.
प्रभाकर साईल यांनी खंडणी तसेच कारवाईदरम्यानच्या काही घटनांबद्दल विविध आरोप केले असले तरी माझ्यासाठी त्यांनी केलेल्या कोऱ्या कागदांवर सह्यांचा आरोप महत्त्वाचा आहे. तपासयंत्रणांच्या कोणत्याही कारवाईच्या वेळी तेथील साक्षीदारच संपूर्ण कारवाईचा मूळ गाभा असतो. त्यामुळे संपूर्ण कारवाईत पंचांची भूमिका अनन्यसाधारण असते. मग, अशा साक्षीदारांच्या सह्याच जर कोऱ्या कागदांवर घेतल्या जात असतील तर कारवाई कशी केली जात असेल याची कल्पना केलेली बरी..
माझ्या माहितीप्रमाणे सीबीआय, अँटी करप्शन ब्युरो अशा काही निवडक तपासयंत्रणा वगळता सर्व तपासयंत्रणांमध्ये सर्वसामान्य व्यक्ती पंच म्हणून वापरल्या जातात. सीबीआय तसेच अँटी करप्शन ब्युरो, फक्त सरकारी कर्मचाऱ्यांविरूद्ध कारवाई करणारी यंत्रणा असल्यामुळे तेथे फक्त सरकारी कर्मचारीच पंच म्हणून वापरले जातात. सरकारी कर्मचारी असल्यामुळे त्यांच्या नोकरीचा प्रश्न असतो आणि ते फुटत नाहीत. त्यामुळे या यंत्रणांच्या कारवाईला न्यायालयीन लढ्यातही बऱ्यापैकी यश येते. याऊलट इतर तपासयत्रणांच्या कारवाईतले बहुतांशी आरोपी न्यायालयात सुटतात. कारण, त्यांच्याविरूद्धचा खटलाच कित्येक वर्षांनी बोर्डावर येतो. त्यावेळी गुन्ह्यातले पंच न्यायालयात हजर होत नाहीत. काही जण तर इहलोकच सोडून जातात. काहींना घटनाक्रमच आठवत नसतो. अशा वेगवेगळ्या कारणांमुळे केवळ तांत्रिक आणि कायद्याच्या कलमांनुसार चालणाऱ्या न्यायालयात आरोपींना झुकते माप मिळते आणि ते खटल्यातून सहीसलामत सुटतात.
मग तुम्ही म्हणाल की, पंचांना इतके महत्त्व असेल तर तपासयंत्रणा धडके म्हणजेच जेन्युईन पंच का घेत नाहीत. तर मला सांगा, आपल्यापैकी किती जण, किती वेळा आपल्या हद्दीतल्या पोलीसठाण्यात तरी गेले आहात का? जर पासपोर्ट काढायला दिला असेल, किंवा तशाच स्वरूपाचा एखादा महत्त्वाचा दस्तावेज बनवायचा असेल तर सर्वसामान्य पोलिसांकडे जातात. कोणाची तरी ओळख काढून, कोणाकडे एखादा ‘गांधी’ सरकवून आपले काम लवकरात लवकर उरकून तो बाहेर पडण्याच्या मनःस्थितीत असतो. एरव्ही कोण सरळमार्गी व्यक्ती पोलिसांकडे जातो का? हीच परिस्थिती इतर तपासयंत्रणांचीही आहे. कोणी सरळमार्गी व्यक्ती या तपासयंत्रणांकडे जात नाहीत. इतर ‘उद्योग’ करणाऱ्या व्यक्तीच अशा यंत्रणांच्या दरबारी फिरत असतात व सहाजिकच ते विविध कारवायांमध्ये साक्षीदार म्हणजेच पंच होतात.
या अशा डागाळलेल्या व्यक्तींचा एक फायदा तपासयंत्रणांना असा होतो की, ते फुटण्याची शक्यता कमी असते. त्यांच्याकडून हवे ते लिहून घेता येते. सर्वसाधारणपणे तपासयंत्रणा अशा पंचांच्या कोऱ्या कागदांवर किंवा आधीच लिहिलेल्या कागदांवर सह्या घेतात. पोलिसांमध्ये तर हे सर्रास चालते. त्यामुळेच पोलीस एखाद्या प्रकरणाचा खऱ्या अर्थाने तपास करत असतील किंवा एखाद्या प्रकरणात पोलिसांना पीडित व्यक्तीला न्याय मिळवून देण्याची इच्छा असल्यास ते पीडित व्यक्तीच्या जवळच्या नातेवाईकांनाच पंच म्हणून उभे करतात. त्यामुळे प्रभाकर साईलने जे काही सांगितले ती युज्युअल प्रॅक्टिस होती. त्यामुळे क्रूझ प्रकरणात त्यांनी दिलेल्या माहितीच्या आधारावर प्रकरणाची दिशा कुठवर बदलेल याबद्दल साशंकताच होती. आता तर साईलच हृदयविकाराच्या झटक्याने गेल्याचे बोलले जाते. साईलचा मृत्यू, हा घातपात असावा, अशी शक्यता वर्तवित राष्ट्रवादी काँग्रेसचे मुख्य प्रदेश प्रवक्ते महेश तपासे यांनी या मृत्यूची राज्य सरकारच्या सीआयडीकडून चौकशी करण्याची मागणी केली आहे. भारतीय जनता पार्टीचे नेते आमदार अतुल भातखळकर यांनी प्रभाकर साईलचा ‘मनसुख हिरेन’ तर झाला नाही ना, अशी शंका व्यक्त केली आहे. गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी प्रभाकर साईल यांच्या मृत्यूची चौकशी पोलीस महासंचालकांकडे सोपवली आहे. या चौकशीत काय निघते हे लवकरच स्पष्ट होईल. पण, एनसीबी आणि राज्य पोलिसांच्या साठमारीत प्रभाकर साईलचा जीव गेला हे त्रिवार सत्य मात्र कायम राहील!!

