मुंबई महापालिका क्षेत्रातील कृत्रिम तलावांपैकी एक महत्त्वाचा तलाव असणारा पवई तलाव आज, १२ जून २०२१ रोजी दुपारी तीन वाजण्याच्या सुमारास पूर्ण भरून वाहू लागला आहे.
हाच तलाव गेल्या वर्षी दिनांक ५ जुलै २०२० रोजी पहाटे ६ वाजताच्या सुमारास पूर्ण भरून वाहू लागला होता. ही बाब लक्षात घेतल्यास गेल्या वर्षापेक्षा यंदा हा तलाव सुमारे २४ दिवस आधीच भरून वाहू लागला आहे.
५४५ कोटी लीटर एवढी जलधारण क्षमता असणाऱ्या या तलावाचे पाणी मानवाला पिण्यायोग्य नसल्याने प्रामुख्याने औद्योगिक वापरासाठी वापरले जाते. गेल्या काही दिवसांत या तलावाच्या पाणलोट क्षेत्रात झालेल्या पावसामुळे हा तलाव भरून वाहू लागला आहे, अशी माहिती महापालिकेच्या जल अभियंता खात्याद्वारे देण्यात आली आहे.
मुंबई महापालिका मुख्यालयापासून साधारणपणे २७ किलोमीटर (सुमारे १७ मैल) अंतरावर हा तलाव आहे. या कृत्रिम तलावाचे बांधकाम सन १८९०मध्ये पूर्ण झाले. या तलावाच्या बांधकामासाठी सुमारे ४० लाख रुपये एव्हढा खर्च तेव्हा आला होता. या तलावाचे पाणलोट क्षेत्र सुमारे ६.६१ किलोमीटर असून तलाव पूर्ण भरलेला असल्यास पाण्याचे क्षेत्रफळ सुमारे २.२३ चौरस किलोमीटर एवढे असते.
तलाव पूर्ण भरलेला असताना तलावामध्ये ५४५.५ कोटी लीटर (५४५५ दशलक्ष लिटर) पाणी असते. हा तलाव पूर्ण भरून वाहू लागल्यानंतर या तलावाचे पाणी मिठी नदीला जाऊन मिळते.