कविता, ही कविच्या हृदयातून कागदावर उतरते. त्याला जे सांगायचं ते तो कवितेच्या माध्यमातून सांगतो. कविता आईच्या हातच्या जेवणासारखी असते तर, गाणं लिहितांना ते लोकांसाठी लिहिलेलं असल्यानं त्याला सजवून लिहावं लागतं. ते एखाद्या शेफनं बनवलेल्या कुझीनप्रमाणे असावं लागतं. मात्र त्यात आईच्या हातासारखी चवदेखील असावी लागते, असे प्रतिपादन गीतकार स्वानंद किरकिरे यांनी केले.
विमल गाडेकर यांच्या स्मृतीप्रित्यर्थ मुंबई विद्यापीठात नुकत्याच आयोजित करण्यात आलेल्या तृतीय ‘विमल दिवस’ कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी अभिनेते भारत गणेशपुरे यांच्या अभिनय क्षेत्रातील योगदानाबद्दल आणि कवि, रंगकर्मी व शिक्षणतज्ज्ञ डॉ. मंगेश बनसोड यांचा ‘विमलताईंचा अभिमान- गौरवोल्लेख सन्मान’ या पुरस्काराने विशेष सत्कार करण्यात आला. विविध क्षेत्रातले मान्यवर यावेळी उपस्थित होते.
ज्येष्ठ संपादक शाम पेठकर यांच्यासोबत चाललेल्या रंगतदार गप्पांमध्ये स्वानंद किरकिरे यांनी त्यांचा साहित्यप्रवास उलगडवून दाखविला. ते म्हणाले की, गाणं लिहिताना ते लोकांना आवडावं यासाठी लोकांच्या भाषेत लिहावं लागतं. पद्य साहित्यामुळे रंजकता कायम राहते. जगातील धर्मग्रंथ काव्यात्मक स्वरुपात लिहिले आहेत म्हणून ते सगळ्यांना लक्षात राहतात. नव्या पिढीला मार्गदर्शन करताना किरकिरे यांनी दुसऱ्याची नक्कल करण्यापेक्षा तुम्ही कोण आहात हे ओळखून स्व:ताची शैली तयार करण्याचा सल्ला दिला.

डॉ. मंगेश बनसोड यांनी आपल्या आतापर्यंतच्या प्रवासात लाभलेल्या विविध लोकांच्या मार्गदर्शनाचा उल्लेख केला. राष्ट्रीय नाट्य विद्यालयात प्रवेश मिळवण्यासाठी चार वेळा प्रयत्न केले. पण, अपुऱ्या मार्गदर्शनामुळे आणि सोईसुविधांमुळे शेवटच्या फेरीत जाऊनही प्रवेश मिळवता आला नाही. याची खंत न बाळगता त्यांनी विद्यार्थ्यांना विविध दिग्दर्शकांच्या हाताखाली शिक्षण घेता यावे, यासाठी विजय केंकरे, सई परांजपे, नादिरा बब्बर, पुरुषोत्तम बेर्डे, रणजित कपूर, असील रईस यासारख्या मराठी-हिंदी रंगभूमीवर काम करणाऱ्या, मातब्बर मंडळींना अॅकडमीत आणून विविध विषय आणि शैलीतील नाटकांची निर्मिती विद्यार्थ्यांसाठी केली. विमलताई गाडेकर यांचे साहित्य महाविद्यालयात असल्यापासून वाचनात आले. आपल्याला डॉ. बाबासाहेब आंबेडकरांमुळे शिक्षणाची संधी मिळाली.
आपल्या खुमासदार आणि मिश्किल भाषणाने भारत गणेशपुरे यांनी उपस्थितांची मने जिंकली. सत्काराला उत्तर देताना ते म्हणाले की, अभिनयाचे तंत्रशुद्ध प्रशिक्षण न घेता या क्षेत्रात आलो. समोर कितीही ताकदीचा नट असला तरी केवळ जबरदस्त आत्मविश्वास असल्याने कॅमेरासमोर बोलता येतं आणि यातूनच एकामागून एक कामं मिळत गेली. जयंत गाडेकर यांच्यासोबत विद्यापीठात शिकत असतानापासून मैत्री आहे. विमलताई गाडेकरांना आपण भेटलेलो असल्याने हा गौरव स्वीकारताना आनंद होत आहे.
विमलताईंच्या आठवणींना उजाळा देताना, त्यांचे पती भगवान गाडेकर यांनी आपल्या चौपन्न वर्षांच्या यशस्वी साथीतील कडूगोड आठवणींचा खजिना उघडला. तू नसलीस तरी तुझी प्रेरणा आहे आणि मला तुझ्या आठवणींचा आधार अशी भावनिक साद त्यांनी घातली.

अभिनेते सुशील बौंठीयाल यांनीही विमलताईंच्या आठवणी सांगितल्या. इतर मित्रांकडे गेल्यावर त्यांच्या आईसोबत साधारण गप्पा होतात. मात्र जयंताची आई ही अनेक विषयात जाणकार होती. तिच्यासोबत बोलताना आपल्या कामाबद्दल, भविष्याबद्दल,चालू घडामोडींबद्दल चर्चा करता येत होती. हिंदी चित्रपटसृष्टीत कार्यरत असलेल्या सुशील यांनी विमलताईंची मराठीतील एक कविता आजही स्मरणात असल्याचे सांगितले.
कार्यक्रमाची सुरुवात दीपप्रज्ज्वलाने झाली. विमलताईंच्या कार्यकर्तृत्वाचा आढावा घेणारी चित्रफीत दाखविण्यात आली. सर्व उपस्थितांना विमल गाडेकर लिखित पुस्तकं तसेच विमलताईंच्या आवाजातील ललित लेखांची लिंक असलेले स्मृतीचिन्ह यावेळी देण्यात आले.
विदर्भातील प्रसिद्ध कवयित्री प्रा. विमलताई गाडेकर चंद्रपूर येथील जनता महाविद्यालयात समाजशास्त्र विषयाच्या प्राध्यापक होत्या. त्यांचे आतापर्यंत अनेक कवितासंग्रह आणि कथासंग्रह प्रकाशित झालेले आहेत. त्यांच्या साहित्यावर गोंडवाणा विद्यापिठातील काही विद्यार्थी पीएचडी करत आहेत. आंबेडकरी साहित्यात त्यांच्या साहित्याचा आणि कार्याचा नेहमीच आदराने उल्लेख केला जातो. महिलांच्या आर्थिक, सामाजिक आणि शैक्षणिक उत्थानासाठी त्यांनी आपले आयुष्य खर्ची घातले.

प्रा. विमलताई गाडेकर यांच्या स्मृतीप्रित्यर्थ दरवर्षी ‘विमल दिवस’ आयोजित करण्यात येतो. त्यांची मुलं आणि त्यांच्यावर प्रेम करणारे राज्यातील चाहते यांच्या पुढाकाराने विमलताईंच्या आठवणी जपण्याचा हा कार्यक्रम साजरा करण्यात येतो. तृतीय विमल दिवस कार्यक्रमासाठी मुंबई विद्यापीठाचे जनसंवाद विभाग प्रमुख डॉ. सुंदर राजदीप यांचे विशेष सहकार्य लाभले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. मृण्मयी भजक यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी अनिल अंजारा, आशिष कुलकर्णी, प्रकाश शंभरकर, रिची शंभरकर व अभिनेत्री गीता अगरवाल यांनी विशेष परिश्रम घेतले.
प्रा. विमलताई गाडेकर यांची कन्या अर्चना शंभरकर पालघर येथे जिल्हा माहिती अधिकारी आहे आणि मुलगा जयंत गाडेकर सिने अभिनेता आहे. मोठा मुलगा डॉ. हेमंत भोपाळ येथे वैद्यकीय महाविद्यालयात अधिष्ठाता आहेत तर छोटी मुलगी डॉ.मोना या ‘अर्गोक्युअर’ या व्यवसायिक आरोग्य क्षेत्रात काम करणाऱ्या संस्थेच्या संस्थापक संचालक आहेत.


