Skip to content
Wednesday, January 22, 2025
Homeन्यूज अँड व्ह्यूजपंतप्रधान मोदींची झारखंडला...

पंतप्रधान मोदींची झारखंडला 35,700 कोटींच्या प्रकल्पांची भेट

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काल झारखंडमधील धनबाद शहरातल्या सिंद्री येथे 35,700 कोटी रुपये खर्चाच्या बहुविध विकास प्रकल्पांची पायाभरणी आणि राष्ट्र समर्पण केले. या विकास प्रकल्पांमध्ये खते, रेल्वे, वीज आणि कोळसा या क्षेत्रांचा समावेश आहे. मोदींनी एचयूआरएल प्रारुपाची तसेच सिंद्री सयंत्राच्या कंट्रोल नियंत्रण कक्षाची पाहणीदेखील केली.

पंतप्रधानांनी सिंद्री खत संयंत्र सुरू करण्याच्या त्यांच्या संकल्पाची आठवण करून दिली “ही मोदी की गॅरंटी’ होती आणि आज ही गॅरंटी पूर्ण झाली आहे”, असे ते म्हणाले.  2018मध्ये पंतप्रधानांनी या खत निर्मिती संयंत्राची पायाभरणी केली होती. हे संयंत्र सुरू झाल्याने स्थानिक तरुणांना रोजगाराचे नवीन मार्ग खुले झाले आहेत, असे पंतप्रधान म्हणाले.

भारताला दरवर्षी 360 लाख मेट्रिक टन युरियाची आवश्यकता असते आणि 2014मध्ये भारत फक्त 225 लाख मेट्रिक टन युरियाचे उत्पादन करत होता. मागणी आणि उपलब्धतेतील या मोठ्या तफावतीमुळे  मोठ्या प्रमाणात युरिया आयात करणे आवश्यक होते. आमच्या सरकारच्या प्रयत्नांमुळे गेल्या 10 वर्षात युरियाचे उत्पादन 310 लाख मेट्रिक टनांपर्यंत वाढले आहे, अशी माहिती त्यांनी दिली.

रामागुंडम, गोरखपूर आणि बरौनी खत संयंत्रांच्या पुनरुज्जीवनाबद्दल पंतप्रधानांनी सांगितले.  या यादीत सिंद्रीचादेखील समावेश करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. येत्या दीड वर्षात तालचर येथील खत संयंत्र देखील सुरू होईल. ते संयंत्रही आपणच राष्ट्राला समर्पित करू असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. या 5 संयंत्रामधून 60 लाख मेट्रिक टन युरियाचे उत्पादन होईल आणि भारत या महत्त्वपूर्ण क्षेत्रात वेगाने आत्मनिर्भरतेकडे जाईल, अशी अपेक्षा पंतप्रधानांनी व्यक्त केली. 

नवीन रेल्वे मार्गांचा प्रारंभ, विद्यमान रेल्वे मार्गांचे दुपदरीकरण आणि इतर अनेक रेल्वे प्रकल्पांच्या प्रारंभासह झारखंडमधील रेल्वे क्रांतीच्या नव्या अध्यायाचीदेखील ही सुरुवात असल्याचे पंतप्रधान मोदी यांनी अधोरेखित केले. या प्रदेशाला नवीन रूप देणाऱ्या धनबाद-चंद्रपुरा रेल्वे मार्गाचा आणि बाबा बैद्यनाथ मंदिर आणि माता कामाख्या शक्तीपीठ यांना जोडणाऱ्या देवघर-दिब्रुगढ रेल्वे सेवेचा त्यांनी उल्लेख केला.

वाराणसीमध्ये, वाराणसी-कोलकाता-रांची द्रुतगती मार्गाची पायाभरणी केल्याची आठवण करून देत पंतप्रधान म्हणाले की, यामुळे चतरा, हजारीबाग, रामगढ आणि बोकारो यासारख्या जोडल्या गेलेल्या ठिकाणांना चालना मिळेल. संपूर्ण झारखंडमधील प्रवासाचा वेळ कमी होईल तसेच संपूर्ण पूर्व भारताबरोबरच्या मालवाहतूक संपर्क व्यवस्थेला चालना मिळेल. या प्रकल्पांमुळे झारखंडशी प्रादेशिक संपर्क वाढेल आणि या प्रदेशातील आर्थिक विकासालाही गती मिळेल, असे ते म्हणाले.

झारखंडचे राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन, मुख्यमंत्री चंपई सोरेन आणि केंद्रीय मंत्री अर्जुन मुंडा आदी यावेळी उपस्थित होते.

पार्श्वभूमी

सिंदरी इथला हिंदुस्थान खत आणि रसायन लिमिटेडच्या (एच. यू. आर. एल.) प्रकल्पाचे पंतप्रधानांनी राष्ट्रार्पण केले. या प्रकल्पासाठी 8900 कोटी रुपयांहून अधिक खर्च आला असून युरिया क्षेत्रातील स्वयंपूर्णतेच्या दिशेने टाकलेले हे एक पाऊल आहे. यामुळे देशातील स्वदेशी युरिया उत्पादनात दरवर्षी सुमारे 12.7 लाख मेट्रिक टनाची भर पडेल. देशातील शेतकऱ्यांना याचा खूप फायदा होईल. गोरखपूर आणि रामागुंडम येथील खत प्रकल्पांनंतर पुनरुज्जीवित होणारा हा देशातील तिसरा खत प्रकल्प आहे. आधीचे दोन प्रकल्प अनुक्रमे डिसेंबर 2021 आणि नोव्हेंबर 2022 मध्ये पंतप्रधानांनी राष्ट्राला समर्पित केले होते.

पंतप्रधानांनी झारखंडमध्ये 17,600 कोटी रुपयांहून अधिक किमतीच्या अनेक रेल्वे प्रकल्पांचे लोकार्पण आणि पायाभरणी केली. या प्रकल्पांमध्ये सोननगर-अंदालला जोडणारे तिसरे आणि चौथे मार्ग, तोरी-शिवपूर पहिला आणि दुसरा आणि बिराटोली-शिवपूर तिसरा रेल्वे मार्ग (तोरी-शिवपूर प्रकल्पाचा भाग), मोहनपूर-हंसदिहा नवीन रेल्वे मार्ग, धनबाद-चंद्रपुरा रेल्वे मार्ग यांचा समावेश आहे. या प्रकल्पांमुळे राज्यातील रेल्वे सेवांचा विस्तार होईल आणि या प्रदेशातील सामाजिक-आर्थिक विकासाला चालना मिळेल. या कार्यक्रमादरम्यान पंतप्रधानांनी तीन रेल्वे गाड्यांना हिरवा झेंडा दाखवला. यामध्ये देवघर-दिब्रूगड रेल्वे सेवा, टाटानगर आणि बदमपहार (दैनिक) दरम्यान मेमू रेल्वे सेवा आणि शिवपूर स्थानकापासून लांब पल्ल्याच्या मालगाडीचा समावेश आहे.

चतरा येथील उत्तर करणपुरा सुपर औष्णिक ऊर्जा प्रकल्पाच्या (एसटीपीपी) एकक 1 (660 मेगावॅट) सह झारखंडमधील महत्त्वाच्या ऊर्जा प्रकल्पांचे पंतप्रधानांनी राष्ट्रार्पण केले. 7500 कोटी रुपयांहून अधिक खर्चून विकसित करण्यात आलेल्या या प्रकल्पामुळे या भागातील वीजपुरवठा सुधारेल. यामुळे रोजगार निर्मितीला चालना मिळेल आणि राज्याच्या सामाजिक-आर्थिक विकासाला हातभार लागेल. झारखंडमधील कोळसा क्षेत्राशी संबंधित प्रकल्पाचेही पंतप्रधानांनी राष्ट्रार्पण केले.

Continue reading

अजित घोष ट्रॉफी महिला क्रिकेटः साईनाथ स्पोर्ट्सला विजेतेपद

सेजल विश्वकर्मा (६४), श्रावणी पाटील (नाबाद ४७) यांच्या शानदार प्रदर्शनाच्या बळावर साईनाथ स्पोर्ट्स क्लबला ५व्या अजित घोष ट्रॉफी महिला टी-२० क्रिकेट स्पर्धेचे विजेतेपद पटकवण्यात यश आले. त्यांनी यजमान स्पोर्टिंग युनियन क्लबचा ३५ धावांनी पराभव केला. सेजल आणि श्रावणीच्या दुसऱ्या विकेटच्या...

पं. कान्हेरे, पं. द्रविड, संजय मोने आदींना ‘दादर-माटुंगा’ पुरस्कार!

मुंबईतल्या दादर माटुंगा सांस्कृतिक केंद्राचे वार्षिक पुरस्कार २०२५ जाहीर करण्यात आले असून येत्या रविवारी, २६ जानेवारीला सकाळी दहा वाजता केंद्रात होणाऱ्या शानदार सोहळ्यात मान्यवरांच्या हस्ते त्याचे वितरण करण्यात येणार आहे. या पुरस्कारप्राप्त मान्यवरांमध्ये पं. विश्वनाथ कान्हेरे, पं. अरुण द्रविड,...

घोष ट्रॉफी क्रिकेटः डॅशिंग आणि स्पोर्टिंग युनियनही उपांत्य फेरीत

गतविजेत्या डॅशिंग क्रिकेट क्लबसह भामा सी. सी., साईनाथ आणि स्पोर्टिंग युनियन या संघांनी ५व्या अजित घोष ट्रॉफी महिला टी-२० स्पर्धेची उपांत्य फेरी गाठली आहे. स्पर्धेतील शेवटच्या दोन साखळी लढतींमध्ये भामा सी. सी.ने डॅशिंगवर २५ धावांनी मात करत गटामध्ये अव्वल...