मुंबई साखळी स्फोट मालिकेतील मुख्य आरोपी दाऊद इब्राहिमचा साथीदार सलीम कुत्ता पॅरोलवर असताना त्याच्याबरोबर पार्टी कोणी केली आणि त्याला कोणाचा वरदहस्त होता, या गोष्टींची चौकशी एसआयटी नेमून केली जाईल आणि दोषींवर कडक कारवाई केली जाईल, अशी घोषणा उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेन्द्र फडणीस यांनी शुक्रवारी विधानसभेत केली. त्याआधी मविआ सरकारच्या काळात पेग, पेंग्विन आणि पार्टी यांना महत्त्व आले होते, असा आरोप भारतीय जनता पार्टीचे आशिष शेलार यांनी केला.
मुंबईतील १९९३च्या बॉम्ब ब्लास्टशी संबंधित सलीम कुत्ताबरोबर शिवसेनेच्या उबाठा गटाचे नाशिकचे शहरप्रमुख सुधाकर बडगुजर पार्टी करत असतील तर आम्ही सुरक्षित आहोत काय, असा सवाल भाजपाचे नितेश राणे यांनी शून्य प्रहरामध्ये माहितीच्या मुद्द्याद्वारे केला. या पार्टीचे रंगीत फोटो विधानसभेत दाखवत राणे यांनी सांगितले की या पार्टीची व्हिडियो फीतही मी पेन ड्राईव्हच्या माध्यमातून अध्यक्षांकडे पाठवत आहे.
सलीम कुत्ता याला अटक करून याचा गॉडफादर कोण याची चौकशी करा. मंत्री दादा भुसे यांनीही चर्चेत भाग घेतला. दाऊद इब्राहिमचा शार्प शूटर सलीम कुत्ता याच्यासह या लोकांचा शिवसेना भवनही उडवण्याचा कट होता. अशा देशद्रोहीबरोबर नाचगाणी पार्टी करतात. अतिरेक्यांना पैसा कोण पुरवतो, बडगुजर हा छोटा मासा आहे, हे देशद्रोही कृत्य आहे. गृहमंत्री महोदय या क्षणालाही काही पुरावे नष्ट होण्याची शक्यता आहे. देशाला धोका आहे, असा हा गंभीर विषय आहे. तेव्हा याप्रकरणी तातडीने चौकशी होण्याची गरज आहे, असे ते म्हणाले.

आमदार आशिष शेलार म्हणाले की, हा निळ्या रेंज रोव्हरमधे बसून आला. मविआ सरकार आल्यानंतर पेग, पेंग्विन आणि पार्टी यांना महत्त्व आले. त्या कुत्त्याबरोबर डान्स करायचा, त्याच्याबरोबर पार्टी करायची, अजय चौधरीसाहेबांनी खूप वर्षे आमच्याबरोबर काम केले आहे. पेग, पेंग्विन, पार्टी प्रकरणाची चौकशी करून या कुत्त्याला संरक्षण देणारी बिल्ली कोण आहे, याच्यावर कारवाई करावी.
त्यावर अजय चौधरी उभे राहिले. पण त्यांना हा विषय संपवायची विनंती अध्यक्षांनी केली.
त्यानंतर फडणवीस म्हणाले की, हा विषय गंभीर आहे. देशाचा शत्रू असलेल्या दाऊद इब्राहिमचा सहकारी असलेला कुत्ता याच्याबरोबर पार्टी करायची. पॅरोलवर असताना पार्टी करता येत नाही. पण त्याच्याबरोबर पार्टी करायची. हे बरोबर नाही. हे तपासून बघितले जाईल. पार्टीत कोण कोण होते, त्यांच्यावर कोणाचा वरदहस्त होता का, पार्टीपेक्षा महत्त्वाचे हे आहे की काय संकेत जातो. याचा अर्थ संवेदना मेल्या आहेत, अशा प्रकारचा हा विषय आहे. त्यामुळे एसआयटीच्या माध्यमातून कालबद्ध पद्धतीने चौकशी करून दोषींवर कारवाई केली जाईल.