‘उमेदवारी मिळाली नाही म्हणून कोणीही नाराज होऊ नका. पक्ष हे एक कुटूंब आहे, ही भावना जोपासा आणि कामाला लागा’, असे भावनिक आवाहन राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते नरहरी झिरवाळ यांनी शनिवारी केले. स्थानिक स्वराज्य संस्थेची निवडणूक ही पूर्णपणे कार्यकर्त्यांची आहे. पक्षाला मोठे करण्यात कार्यकर्त्यांचा वाटा सर्वात महत्त्वाचा आहे. कार्यकर्त्यांना संधी देणे ही सर्व नेत्यांची जबाबदारी आहे आणि सर्वांना टप्प्याटप्प्याने संधी मिळणारच आहे, असेही ते म्हणाले.
राष्ट्रवादी काँग्रेसच्या महत्त्वाच्या आढावा बैठकीत ते बोलत होते. यंदाच्या निवडणुकीत केवळ ‘इच्छा’ नव्हे, तर उमेदवाराची समाजातील प्रतिमा कशी आहे, याला महत्त्व दिले जाणार आहे. ज्यांना आता संधी दिली आहे, त्यांच्यासाठी आपण सर्वांनी अंग झटकून कामाला लागायचे आहे. राज्यात आपला पक्ष पहिल्या क्रमांकावर राहील, यासाठी एकजुटीने काम करा, असे आवाहन त्यांनी केले. सर्व कार्यकर्ते एकसमान असले तरी, स्थानिक परिस्थिती पाहून उमेदवारीचा निर्णय घ्यावा लागणार आहे. पक्षश्रेष्ठी जो निर्णय देतील, तो अंतिम राहील, असे सांगत त्यांनी पक्षाचे अध्यक्ष व उपमुख्यमंत्री अजित पवार यांना दिलेल्या शब्दाप्रमाणे राज्यात राष्ट्रवादीला यश आणण्याचा संकल्प बोलून दाखवला.
नगराध्यक्षपदासाठी चार नावांचा प्रस्ताव
हिंगोली नगराध्यक्षपदासाठी चार इच्छुकांच्या नावांचा प्रस्ताव स्थानिक स्तरावर विचारविनिमय करून पक्षाचे अध्यक्ष, राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे अंतिम निर्णयासाठी पाठवला जाईल, अशी माहिती पालकमंत्री झिरवाळ यांनी दिली. नगरपालिकेच्या सर्व ३४ जागा स्वबळावर लढवण्याचा कार्यकर्त्यांचा विचार असून, कोणाला सोबत घ्यायचे याचा निर्णय स्थानिक पदाधिकाऱ्यांच्या सल्ल्याने घेतला जाईल, असेही त्यांनी स्पष्ट केले.

