महाराष्ट्रात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आता कोणत्याही क्षणी जाहीर होऊ शकतील. बऱ्याच मोठ्या प्रमाणात निवडणुका होत असल्याने त्या टप्प्याटप्प्याने घेण्याशिवाय निवडणूक आयोगाला पर्याय नाही. राज्य निवडणूक आयोग या निवडणुका घेत असतो. त्यांनी राज्य सरकारकडे लागणाऱ्या कर्मचाऱ्यांची मागणी केली आहे. जिल्हा परिषदा तसेच मनपा, नगरपालिका यांचे कर्मचारी निवडणूक कामासाठी घेतले जातातच. त्या-त्या ठिकाणचे जिल्हाधिकारी वा मनपा आयुक्त यांच्याकडे निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून जबाबदारी असते. राज्यात सर्व मिळून सुमारे एक लाख मतदान केंद्रे ठेवावी लागतील. तिथे लागणारा कर्मचारीवर्ग हा पाच लाखांच्या घरात जातो. शिवाय सुरक्षाव्यवस्थेसाठी पोलीस दलाचे दोन लाख कर्मचारी लागतील. या सर्वांसंबंधीचे प्रस्ताव राज्य निवडणूक आयुक्त दिनेश वाघमारे यांनी राज्य सरकारच्या मुख्य सचिवांकडे पाठवले आहेत. अर्थातच या निवडणुका एका टप्प्यात होणार नाहीत. त्यामुळे सर्व सात-आठ लाख कर्मचारी एकाच दिवशी लागणार नाहीत. या सर्व प्रक्रियेतच विरोधकांनी एक नवा नरेटिव्ह सेट करण्याचा प्रयत्न केला आहे.
पंचायत समित्यांची संख्या 336 आहे. जिल्हा परिषदा 32 आहेत. तिथल्या निवडणुका एकदम व्हाव्या लागतील. नगरपालिका 246 व नगरपंचायतील 42 आहेत त्या निवडणुका एका टप्प्यात पार पडतील. महानगरपालिकांची संख्या 29 आहे. त्या निवडणुका सर्वात शेवटी म्हणजे जानेवारी 2026मध्ये पार पडतील. सर्वात आधी नागरी व अर्धनागरी म्हणजे नगरपंचायती व नगरलपालिकांच्या निवडणुकांचा पहिला टप्पा पार पडेल. त्यानंतर ग्रामीण म्हणजेच, जिल्हा परिषदा व पंचायत समित्यांच्या निवडणुका पार पडतील. आणि नंतर मनपांचे निकाल येतील. गेल्या महिन्या, दीड महिन्यात पावसाने धुमशान घातले होते. अडीचशे तालुक्यांतील चाळीस-पन्नास लाख एकर शेतजमिनींना हा तडाखा बसला आहे. अनेक गावे व शहरे पुराच्या पाण्याने नुकसानग्रस्त झाली आहेत. त्यामुळे तिथली सारी महसुली, नागरी व ग्रामीण यंत्रणा सध्या नुकसानीचे सर्वेक्षण व पंतनामे, नुकसानभरपाईची गणिते व रक्कमांचे वाटप अशा मदतीच्या कामात व्यग्र आहे. बहुतेक साराच ग्रामीण महाराष्ट्र पाऊस, पाण्याने प्रभावग्रस्त असल्याने तिथल्या निवडणुका थोड्या लांबवल्या पाहिजेत, असा मतप्रवाह निवडणूक आयोग व राज्याच्या प्रशासनात आहे. तो विचार योग्यही आहे.

या साऱ्या निवडणुकीच्या वातावरणात सरत्या सप्ताहात अचानक मोठी खळबळ उडाली. काँग्रेस, शरद पवार राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना उबाठा आणि मनसेसह कम्युनिस्ट, जनता दल, समाजवादी पार्टी, शेतकरी कमगार पक्ष… अशा तमाम विरोधी पक्षांच्या नेत्यांनी, वरिष्ठ प्रतिनिधींनी एकाच दिवशी राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी चोक्कलिंगम यांची भेट मंत्रालयात तर राज्य निवडणूक आयुक्त वाघमारे यांची भेट नवीन प्रशासकीय भवन म्हणजे मंत्रालयासमोरच्या इमारतीतील आयोगाच्या कार्यालयात जाऊन घेतली. चोक्कलिंगम हे केंद्रीय निवडणूक आयोगाचे महाराष्ट्राचे प्रतिनिधी म्हणून कार्यरत असतात. त्यांना भेटायला शरद पवार, जयंत पाटील, बाळासाहेब थोरात, उद्धव ठाकरे असे थोर नेते पोहोचले होते. तर त्यांच्याच पक्षांचे उपाध्यक्ष, प्रवक्ते अशी मंडळी वाघमारेंच्या भेटीला गेली होती.
खरेतर शरद पवार या सर्वांचे दादा आहेत. जयंत पाटील, बाळासाहेब थोरात यांनी राज्याच्या निवडणुकीचे कायदे बदलण्याची विधेयके काँग्रेस सरकारच्या काळात विधिमंडळात मांडून मंजूर करवून घेतेली होती. या सर्वांना पूर्ण कल्पना होती व आहे की ते ज्या निवडणुकीची चर्चा करू पाहतात, त्याचे सर्वाधिकार वाघमारे साहेबांच्या आयोगाकडेच आहेत. चोक्कलिंगम यांचा या निवडणुकांशी अर्थाअर्थी काहीही संबंध नाही. चोक्कलिंगम यांच्याकडील बैठकीत सर्वाधिक आक्रमकता दाखवणे व बोलणे करणे राज ठाकरेंनी केले, असे सांगितले जाते. त्यांचा स्वभाव आक्रमक तर आहेच, पण बोलणे बाळासाहेब ठाकरेंसारखे मार्मिक आहे. माध्यमांना नेमका बाईट देण्यात तर सध्याच्या विरोधी पक्षांच्या नेत्यांमध्ये कोणीच राज ठाकरेंचा हात, खरेतर तोंड, धरू शकणार नाही. साहजिकच नंतर झालेल्या पत्रकार परिषदांमध्ये राज ठाकरेच चमकले. दुसऱ्या दिवशीच्या बैठकीला शरद पवार नव्हते. फडणवीसांनी टिप्पणी केली की चोक्कलिंगम यांना भेटण्यात अर्थ नाही याची कल्पना असल्यानेच पवारसाहेब दूर झाले. केंद्रीय निवडणूक आयोगाकडे चोक्कलिंगम यांच्या माध्यमातून या नेत्यांची तक्रारवजा सूचना ही होती की, स्थानिक स्वराज्य निवडणुका घेण्याआधी बिहारप्रमाणे महाराष्ट्रातही मतदारयाद्यांच्या शुद्दीकरणाची तीव्र मोहीम (एसआयआर) राबवा. दुबार नावांची, नावे व पत्ते योग्य नसल्याची, एकाच पत्त्यावर एकाच खोलीत चारशे लोक राहतात अशी मतदारयादीतल्या त्रुटींची, दोषांची उदाहरणे या नेत्यांनी नंतर पत्रकार परिषदेत मांडली.

वाघमारेंचीही भेट या नेत्यांनी दुसऱ्या दिवशी पुन्हा घेतली. त्याला चोक्कलिंगम हेही हजर होते. नेत्यांच्या ज्या तक्रारी होत्या, त्या या टटप्प्यावर निरर्थक ठरतात. कारण 1 जुलै 2025 रोजी असणारी राज्याची मतदारयादी स्थानिकसाठी ग्राह्य धरली जाईल हे आदेश सहा महिन्यांपूर्वीच निघालेले आहेत. त्यावेळी, कोणीही कसलीही हरकत घेतली नव्हती. शरद पवार, थोरात, जयंतराव अशा नेत्यांना या सर्व प्रक्रियेची पूर्ण जाणीव आहे. कल्पना आहे. किंबहुना त्यांच्याच कार्यकाळात याबाबतचे कायदे विधिमंडळाने केलेले आहेत. पण आता ते केवळ आणि केवळ राजकारणासाठी हरकती घेत आहेत हे उघड आहे. उद्धव आणि राज ठाकरेंनी निवडणुका लढवल्या. पण राज्य निवडणूक आयोगाशी संबंधित कायदे करण्यात त्यांचा सहभाग कधीच नव्हता. खरेतर त्यांनी निवडणुका लढवण्यासठी उमेदवारांच्या निवडी केल्या व नंतर मोठमोठ्या सभा घेतल्या यापलिकडे निवडणुकीच्या ज्या प्रक्रिया कायदेशीर बाबी, मतदारयाद्यांची निरिक्षणे, असले काही ठाकरे बंधुनी कधी केलेलेच नाही. त्यांनी समजा वाघमारेंच्याऐवजी चोक्कलिंगम यंची भेट घेतली तर ते एकवेळ समजू शकण्यासारखे आहे. पण शरद पवार, थोरात, पाटील अशांनी तेच का बरे करावे हा प्रश्न पडतो.
सुनिल तटकरे यांचा विरोधकांना टोला महत्त्वाचा आहे. ज्यांनी कधी निवडणूक लढली नाही, त्यांना टिकाटिपण्णी करणं सोपं… राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष खासदार सुनिल तटकरे यांनी ठाकरे बंधू आणि मविआच्या नेत्यांवर जोरदार टीका करताना म्हटलं की, ज्यांनी प्रत्यक्ष निवडणुका लढल्या नाहीत आणि बुथलेवलवर मतदानप्रक्रिया समजत नाही, त्यांना टिकाटिपण्णी करणं सोपं आहे. आम्ही सर्व निवडणुका लढलो आहोत, पोलिंग एजंट म्हणून काम केले आहे, मतदार स्लिपा वाटल्या आहेत आणि काऊंटिंग एजंटची भूमिकाही पार पाडली आहे. प्रत्येक पक्षाचा डीएलओ निवडणूक आयोगाकडून अधिकृतपणे नेमला जातो, जो मतदानप्रक्रियेची छाननी करतो. मतदानावेळी ओळखपत्र अनिवार्य असतं आणि खोटं मतदान सहज ओळखले जाऊ शकते. ते पुढे म्हणाले, निवडणूक प्रक्रियेदरम्यान सर्व पक्षांचे पोलिंग एजंट मतदान केंद्रात उपस्थित असतात. विरोधी पक्षाचे नेते दोनदोन दिवस निवडणूक आयोगाला भेटत आहेत, परंतु त्यांनी स्वतः ही प्रक्रिया दीर्घकाळ अनुभवली आहे. तरीही त्यांना नॅरेटिव्ह सेट करायचे असेल तर करू द्या. तटकरेंनी टोला लगावताना मांडलेले मत वास्तव आहे. विरोधकांनी आका निवडणुकीआधी भाजप संविधान बदलणार असा नरेटिव्ह सेट करू पाहात होते. त्यात त्यांना राज्यात बऱ्यापैकी यश आले. आता मतचोरी आणि मतदारयादीतला घोळ.. हा आणखी एक नरेटिव्ह…