Homeमाय व्हॉईस'ऑपरेशन सिंदूर'मुळे शस्त्रास्त्रांचे...

‘ऑपरेशन सिंदूर’मुळे शस्त्रास्त्रांचे चिनी मार्केट बोंबलले!

पहलगाममध्ये विधवा झालेल्या बहिणींचा बदला ऑपरेशन सिंदूरने घेतला तेव्हा दोनच दिवसांत पाकिस्तान गुडघ्यावर आला. खाली बसून दयेची भीक मागण्याच्या पवित्र्यात पाकला आणण्याचे काम भरातीय लष्कराच्या तीन्ही सेवांनी एकत्रितपणाने सुरु केलेल्या लष्करी मोहिमेने केले. जमिनीवरील, हवेतील आणि समुद्रातील अशा तीन्ही भारतीय सैन्यदलांनी हा जो त्रिशूल उगारला त्याने पाकिस्तानचे छाताड फोडले. पाकने खोट्या माहित्या पसरवण्याचे उद्योग करून पाहिले. आम्हीच भारतियांचे महत्त्वाचे लष्करी तळ बाँब फेकून उद्ध्वस्त केले असाही दावा करण्याचा प्रयत्न त्यांनी केला. पण भारतीय लष्कराला कारवाईचे पूर्ण स्वातंत्र्य देताना त्यांच्यामागे ठाम उभे असणारे राजकीय नेतृत्त्व या खोट्या माहितीच्या चिंधड्या उडवण्यासाठीही तितकेच ठाम उभे ठाकले. पंतप्रधान नरेंद्र मोदी मंगळवारी सकाळी 7 वाजता दिल्लीतून निघाले आणि त्यांचे व्हीव्हीआयपी विमान थेट पाक सीमेपासून जवळ असणाऱ्या पंजाबमधील आदमपूर या हवाईदलाच्या ठाण्यात उतरले. त्यांचे विमान तिथल्या रनवेवर सुखरूप उतरले आणि ते सैनिकांशी बोलत असताना मागील बाजूला एस 400, सुदर्शनचक्र प्रणाली स्पष्ट दिसत होती. या दोन बाबींमुळे पंजाबमधील हा विमानतळ आणि तिथली एस 400 सुरक्षाप्रणाली आमच्या वैमानिकांनी नष्ट केली, हा पाकचा दावा सपशेल खोटा ठरला.

गेले दोन दिवस पाकडे, याच तळाचे खोटे, मॉर्फ केलेले फोटो नाचवत आपलीच पाठ थोपटून घेत होते. तिथे वायुदल सैनिकांशी बोलताना मोदींनी बजावले की, जेव्हाजेव्हा पाकिस्तान दुःसाहस करेल, तेव्हातेव्हा त्यांची अशीच गत केली जाईल. दहशतवाद्यांना लपण्यासाठी आता पाकची कुठलीच भूमी सुरक्षित नाही, हेच ऑपरेशन सिंदूरने दाखवून दिले आहे, असेही मोदींनी ठणकावले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी वारंवार आपल्या प्रत्येक कृतीतून आणि बोलण्यातून अधिक गहिरा अर्थ प्रकट करून दाखवला आहे. आदमपूरला स्वतः जाणे व तिथून भारतीय वायुसेनेच्या वीरांचे कौतुक करणे यालाही मोठा अर्थ लाभला आहे. आमचे सर्व सीमावर्ती विमानतळ, सर्व लष्करी ठाणी सुखरूप आहेत. सुरक्षित आहेत. मात्र पाकिस्तानातील कोणताही विमानतळ सुरक्षित नाही, सुखरूप नाही, हे भारताने मोदीभेटीने अधोरेखित केले आहे. एका अंदाजानुसार पाकिस्तानी  विमानतळांचे तसेच पाक हवाईदलाचेही फार मोठे नुकसास ऑपरेशन सिंदूरच्या तीन दिवसांत झाले आहे. विशेषतः त्यांच्या लढाऊ विमानांचेही मोठे नुकसान झाले आहे. ज्या तळांवर भारतीय वायुदलाने व लष्कराने अचूक लक्षवेधी क्षेपणास्त्रांचा मारा केला तिथले नुकसान मोठे झाले आहे आणि त्याची आता कुठे जगाला जाणीव होत आहे.

ऑस्ट्रेलिया आणि अमेरिकेतील, सरकारबाह्य लष्करी अभ्यासकांनी या ऑपरेशनमध्ये भारतीय लष्करी सामर्थ्य निर्विवादपणाने सिद्ध झाल्याचे निरिक्षण नोंदवले आहे. टॉम कूपर हे ऑस्ट्रेलियातील लष्करी  सामर्थ्याचा अभ्यास करणारे नामवंत लष्करी इतिहासतज्ज्ञ आहेत. त्यांचा ब्लॉग संरक्षण व युद्ध क्षेत्रातील लक्षणीय लेखनासाठी जगभरात वाचला जातो. परवाच्या संघर्षात भारताने अतिशय स्पष्ट विजय नोंदवला आहे असे त्यांनी परवाच्या ब्लॉगमध्ये नमूद केले आहे. पाकिस्तानी लष्करी अधिकाऱ्यांनी गेल्या शनिवारी दुपारी भारतीय लष्करी कारवाई महासंचालकांकडे शस्त्रसंधीची विनंती केली, तेव्हाच हे स्पष्ट झाले की पाकला भारताचा मुकाबला करणे जमलेले नाही. भारताने स्वतः निर्माण केलेली आणि जगाच्या विविध भागांतून काळजीपूर्वक व योग्य व्युहात्मक विचार करून आणलेली शस्त्रास्त्रसामग्रीही पाकला मात देण्यात यशस्वी ठरल्याचे अनुमान जागतिक तज्ज्ञांनी काढले आहे. विशेषतः अमेरिकन लष्करी अभ्यासक व माजी लष्करी अधिकारी जॉन स्पेन्सर यांनी असे निरिक्षण नोंदवले आहे की, भारतीय क्षेपणास्त्रांपुढे चिनी शस्त्रास्त्रे फिकी पडली आहेत. स्पेन्सर हे अमेरिकन लष्कराचे माजी अधिकारी असून निवृत्तीनंतर ते मॉडर्न वॉर इन्स्टिट्यूटमध्ये अर्बन वॉरफेअर स्टडीज या विद्याशाखेचे प्रमुख आहेत. त्यांनी म्हटले आहे की, भारताने स्वतः उभ्या केलेल्या संरक्षण प्रणालींनी उत्तम कामगिरी बजावली. चिनी अस्त्रे कुचकामी ठरली. यातील चीनचा संदर्भ अत्यंत महत्त्वाचा आहे व त्यांच्या व्यापारासाठीही धोकादायक आहे.

जगभरातील लष्करी तज्ज्ञ या मुद्दयाचा आता अभ्यास करत आहेत. चीनने पाकिस्तानसह अनेक देशांना अशाप्रकारची घातक क्षेपणास्त्रे, ड्रोन तसेच शस्त्रप्रणाली पुरवल्या आहेत. ते सारेच देश आता विचारात पडले आहेत, असाही निष्कर्ष अभ्यासक काढत आहेत. कारण जेव्हा कोणतेही युद्ध पेटते, तेव्हा शस्त्र निर्यातदार देश व शस्त्रास्त्रे निर्मिती कंपन्या त्या युद्धाकडे बारकाईने पाहत असतात. भांडणाऱ्या दोन्ही देशांना दोन स्वतंत्र देशांनी शस्त्र पुरवले असतील तर कोणाची शस्त्रे प्रभावी ठरली हे पाहिले जाते. त्यादृष्टीने चिनी क्षेपणास्त्रे व ड्रोन, भारतीय क्षेपणास्त्रांपुढे निष्प्रभ ठरल्याने यापुढे चीनकडून शस्त्रांस्त्रांची होणारी निर्यात संकटात सापडणे शक्य आहे, हाही संदेश ऑपरेशन सिंदूरने दिला आहे. सहाजिकच चीन आता घाईघाईने खुलासे करत आहे की, आम्ही पाकला शस्त्रे पुरवलेलीच नाहीत. पण त्यावर विश्वास कोण ठेवणार हाही प्रश्नच आहे. कारण भारताने रणभूमीत अचूक मारा करून पाडलेल्या क्षेपणास्त्रांवरचे चिनी ठसे पुसता येण्यासारखे नाहीत!

सिंदूर

ऑस्ट्रेलियाचे लष्करी इतिहासाचे तज्ज्ञ टॉम कूपर म्हणतात की, भारतीय क्षेपणास्त्रांनी पाकचे मोठे नुकसान तर केलेच पण त्यांनी ज्या नेमकेपणाने पाकच्या  हद्दीत खोलवर लपलेले दहशतवादी तळ उद्ध्वस्त केले त्यातून भारताची आकाशावरील हुकूमत दिसली. त्याचवेळी हेही स्पष्ट झाले की, भारताच्या हवाई आक्रमणाची तोड पाककडे नाही. उलट पाकने सोडलेल्या ड्रोनच्या लाटा भारतीय हवाई संरक्षणप्रणालीने वेळेतच शोधल्या व नष्टही केल्या, हेही त्या तीन दिवसांत दिसून आले. कूपर तसेच स्पेन्सर यांची ही निरिक्षणे शस्त्रसंधी जाहीर झाल्यानंतर आलेली आहेत. कूपर यांनी असेही नमूद केले आहे की, या संघर्षावरील पाश्चात्य माध्यमांतील टिप्पण्या प्रत्यक्षात जमिनीवरील स्थितीची माहिती न घेताच केलेल्या दिसतात. ते असेही म्हणतात की, जेव्हा एक बाजू दुसऱ्या देशाकडील आण्विक क्षेपणास्त्र साठवलेल्या तळावरच अचूक मारा करते आणि दुसरी बाजू त्याचा कोणताही प्रतिकार करू शकत नाही तेव्हा माझ्या मते पहिल्या देशाने संपूर्ण विजय मिळवलेलाच असतो. भारताकडील ब्राह्मोस तसेच स्काल्प ईजी अशा सक्षम मिसाईलना टक्कर देण्याचे सामर्थ्य पाक हवाई संरक्षणप्रणालीकडे नसल्याचेही स्पष्ट झाले आहे. पाककडे उत्तम क्षेपणास्त्रे आहेत असे सांगितले जात होते. पण ती सामग्री कुठे दिसलीच नाही. नूरखान व सरगोधासारखे पाकचे व्यूहात्मक रचनेतील महत्त्वाचे हवाईतळ वापरण्यायोग्य उरलेले नाहीत. त्यामुळेच पाकिस्तानी लष्करी संचालन महासंचालकांनी, डीजीएमओने भारतीय डीजीएमओशी संपर्क साधला. पाकने विनंती केली व भारताने ती मान्य केली. त्यातून गोळीबार थांबला आहे. क्षेपणास्त्रे व ड्रोनची उड्डाणे थांबलेली आहेत. पण भारताने पाकला आधीच दम भरला आहे की, जर तुमच्याकडून एक गोळी डागली गेली, तर आमच्याकडून गोळीला गोळीने नव्हे तर तोफगोळ्याने उत्तर दिले जाईल! हे लक्षात ठेवा!!

Continue reading

अजितदादांनी माळेगावमधली लढाई तर जिंकली, पुढे काय?

पुण्याच्या बारामतीतल्या माळेगाव साखर कारखान्यावर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी नुकताच निर्विवाद ताबा मिळवला. महाराष्ट्राची स्थापना झाली त्याआधीपासून राज्यातील सहकार चळवळीची सुरूवात झाली आणि त्यातही शेतमाल प्रक्रिया उद्योगात राज्यातील सहकाराचा पाया चांगला रोवला गेला. ऊस हे पश्चिम महाराष्ट्राच्या सहा-सात जिल्ह्यातील...

थोरल्या पवारांनी आपणच फुगवलेल्या फुग्याला लावली टाचणी!

शरद पवार महाराष्ट्राच्या राजकारणात नित्य नव्या गुगलीचा मारा करण्यासाठी प्रसिद्ध आहेत. ते केव्हा काय बोलतील याचे गणित फक्त त्यांनाच माहिती असते. एकीकरणाच्या अपेक्षेने दादा आणि साहेब गटाच्या राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी बरेच फुगे फुगवले होते. साहेबांनी त्यांना सहज टाचणी लावली. गंमत...

यंदा मेमध्येच का व कसा सुरू झाला पावसाळा?

ज्या बातम्या आणि शीर्षके जून अखेरीकडे वा खरेतर जुलैच्या मध्यावर अपेक्षित असतात, ती यंदा बरीच आधी झळकू लागली. “मुंबईत संततधार, पुण्यात पावसामुळे वाहतूककोंडी, पावसाने दाणादाण, मुंबई-पुणे आणि मुंबई-गोवा महामार्गांवर कोंडी, जगबुडी दुथडी भरून वाहू लागल्याने गावात पाणी, झाडं कोसळली,...
Skip to content