राज्यात प्रथमच कांद्याची महाबँक स्थापन केली आहे. कालच या प्रकल्पाचा शुभारंभ करण्यात आला आहे. ज्येष्ठ अणुशास्त्रज्ञ डॉ. अनिल काकोडकर यासाठी मदत करत आहेत. न्यूक्लिअर तंत्रज्ञानाचा वापर करून कांदा इरॅडिशनचा हा पथदर्शी प्रकल्प कांदा उत्पादकांच्या समस्येवर कायमस्वरुपी उपाय ठरेल, असा विश्वास व्यक्त करीत समृद्धी महामार्गालगत 13 कृषी समृद्धी केंद्रांच्या उभारणीचं काम सुरू असल्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी नागपूरला विधानसभेत आज सांगितले.

तत्पूर्वी राज्यातील अणुऊर्जा आधारित कांदा महाबँक, कांदा प्रक्रिया व साठवणुकीबाबत मुख्यमंत्री शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली विधानभवनातील मंत्रिमंडळ सभागृहात बैठक झाली. या बैठकीस उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, मदत व पुनर्वसन मंत्री अनिल पाटील, महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील, वन मंत्री सुधीर मुनगंटीवार, राज्य उत्पादन शुल्क मंत्री शंभूराज देसाई, ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन, सार्वजनिक बांधकाम मंत्री दादाजी भुसे, मुख्य सचिव मनोज सौनिक यांच्यासह प्रशासनातील वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
साठवण क्षमतेच्या अभावामुळे कांदा व इतर पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे. अणुऊर्जा आधारित कांदा महाबँक, कांदा प्रक्रिया व साठवणुकीमुळे पिकाची नासाडी होणार नाही. हा प्रकल्प राज्यासाठी महत्त्वाचा आहे. या प्रकल्पामुळे कांदा पिकाचे उत्पादन वाढेल आणि शेतकऱ्यांच्या पिकास चांगला भाव मिळेल. शेतकऱ्यांचा दृष्टीने हा प्रकल्पही महत्त्वाचा आहे, असे मुख्यमंत्री शिंदे यांनी सांगितले. प्रारंभी सादरीकरणातून या प्रकल्पाची माहिती देण्यात आली.